चंद्र मकर राशीत, सूर्य वृश्चिक, तर गुरु वृषभ राशीत असल्याने देवेंद्र फडणवीसांचे सरकार निर्विघ्नपणे ५ वर्षे टिकेल
महंत सुधीरदास महाराज यांचे भाकीत
मुंबई : डॉ. बाळासाहेब मागाडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्रिकोणी सरकार निर्विघ्नपणे पाच वर्षे टिकावे यासाठी देशातील साधूसंत मंडळी सरसावली आहे. या सरकारला दृष्ट लागू नये, हे सरकार निर्विघ्नपणे पुढील पाच वर्षे टिकावे यासाठी गुरुवार, ५ रोजी सायंकाळी ५ वाजून ५७ मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी पंचमीचा मुहूर्त आहे. चंद्र मकर राशीत आहे, सूर्य वृश्चिक राशीत आहे, गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. सायंकाळी ०५ वाजून ५७ मिनिटांनंतर श्रवण नक्षत्र लागत आहे. याचे वृषभ लग्न नावाचे जे स्थिर लग्न आहे आणि ध्रुव नावाचा अढळ योग आहे. जसा ध्रुव तारा हा अढळ आहे, तसे पाच वर्षे हे सरकार अढळ राहील, असा साधूंना विश्वास आहे.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. सत्ता स्थापनेचा दावा केला. गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा होणार आहे.
धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग
भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात मार्गशीर्ष मास हा माझा अत्यंत आवडता आहे, असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. तत्त्ववेत्त्यांच्या भूमिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रात बजावत आहेत. ०५ डिसेंबर रोजी गुरुवार, पंचमीचा मुहूर्त आहे. चंद्र मकर राशीत आहे, सूर्य वृश्चिक राशीत आहे, गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. ०५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५ वाजून ५७ मिनिटांनंतर श्रवण नक्षत्र लागत आहे. याचे वृषभ लग्न नावाचे जे स्थिर लग्न आहे आणि ध्रुव नावाचा अढळ योग आहे.
जसा ध्रुव तारा हा अढळ आहे, तसे पाच वर्षे हे सरकार अढळ राहील, कुठल्या पद्धतीचे वादविवाद किंवा कोणती क्लेषात्मक भूमिका कुठली मांडली जाणार नाही. निर्विघ्नपणे हे सरकार चालेल. असे ०५ वाजून ५७ मिनिटांच्या कुंडलीचे वैशिष्ट्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही सूचना पोहोचवण्यात आली आहे की, तुम्ही ०५ वाजून ५७ मिनिटांनंतर शपथ ग्रहण करावी. तसेच ०६ वाजून ५० मिनिटांपर्यंत हा योग आहे. त्यावेळात हा सर्व विधी व्हावा, अशी धर्मशास्त्रीय रचना सांगते, अशी माहिती नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली.
पंतप्रधान उपस्थित राहणार
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्यासह ९ ते १० केंद्रीय मंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही उपस्थित राहतील. १९ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधीला येणार आहेत. याबरोबरच सर्वधर्मीय गुरुवर्य, साधु-संत-महंत आशीर्वाद देण्यासाठी शपथविधीला येणार आहेत.
५ ते १० हजार लाडक्या बहिणी, २ ते अडीच हजार शेतकरी येणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हेही उपस्थित राहतील. वारकरी पंथाचे लोक, डबेवाले येणार आहेत. ४० ते ५० हजार कार्यकर्ते त्या सभास्थळी दिसतील, असा दावा करण्यात आला. याशिवाय २ हजार व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांची व्यवस्था केली आहे. हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात जिथे एलईडी स्क्रीन आहेत, तिथे सगळ्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा लाइव्ह दाखवला जाणार आहे.