ताजे अपडेट

हरी नरकेंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीवर शोककळा

Spread the love

समतेच्या चळवळीत काम करताना आमच्या असंख्य आठवणी आहेत. दलित-शोषितांच्या प्रश्नांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. शोषित समुहाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ते आग्रही असायचे. त्यांच्या निधनाने फुल्यांचा विचार मानणाऱ्या समस्त पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या

मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील Asian Heart Hospital मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. (Hari Narake Passed away)

क्रांतीबा महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. हरी नरके यांचं निधन झालंय. ते ७० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं विशेष राहिलं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे हरी नरके संपादक होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा ही दोन पुस्तके त्यांची लोकप्रिय होती.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केलं. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करणारे संशोधक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात हरी नरके यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

भुजबळांचा कंठ दाटला
सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय, जवळचे मित्र मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

समतेच्या चळवळीत काम करताना आमच्या असंख्य आठवणी आहेत. दलित-शोषितांच्या प्रश्नांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. शोषित समुहाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ते आग्रही असायचे. त्यांच्या निधनाने फुल्यांचा विचार मानणाऱ्या समस्त पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका