
सरत्या वर्षाला निरोप / डॉ.नाना हालंगडे
2024 हे वर्ष लोकसभा, विधानसभा, सांगोला महिला सूतगिरणी या निवडणुकीमुळे तसेच महागाई, भ्रष्टाचार, अब की बार चारशे पार या राजकीय घडामोडी व विचारामुळे चर्चेचे ठरले आहे. मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर, ओबीसी आंदोलन, छगन भुजबळ व लक्ष्मण हाके तर त्यापेक्षाही संविधान, ईव्हीएम मशीन, तसेच महिलांसाठी महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहीण योजना, मंजुरी त्याचा निवडणुकीतील परिणाम, अनुदानाला विलंब यामुळे वैशिष्ट्यपूर्ण हे वर्ष असल्याने जास्त चर्चेचे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील लोकसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचा सिंह पराभूत झाला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सिंह विजयी झाला. विधानसभा निवडणुकीत काय झाडी काय डोंगर फेम आम.शहाजी पाटील व दीपक साळुंखे-पाटील यांचा दारुण पराभव हा शिवसेना शिंदे तसेच ठाकरे गटाला तसेच सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विजयामुळे तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. महिला सूतगिरणीत शेकापच्या विजयामुळे शेकापला ऊर्जा मिळाली.
जानेवारी 24 या वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पहिले चार महिने लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले. त्यामध्ये भ्रष्टाचार, अबकी बार 400 पार, संविधान बदलाचा डाव, शेतीतील उत्पादित मालाला भाव नाही, खते बियाणे महागडी, सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महागाई याची चर्चा मोठ्या प्रमाणात गावोगावी होत होती.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून महागाई अदानी तसेच भ्रष्टाचार याची चविष्ट चर्चेने पहिले सहा महिने गेले.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाला जबरदस्त पराभवला सामोरे जावे लागले. युतीचे खासदार 17 विजयी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला विधानसभा निवडणुकीत टिकाव लागणार नाही,या भीतीने काठावरचे राजकीय पक्षांचे नेतेनी आघाडीत उडी मारण्यास सुरुवात झाली. त्याची चर्चा सुरू झाली तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान देण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्या संदर्भात अर्ज करणे त्यासाठी महा-ई-सेवा केंद्रासमोर व ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका जवळ महिलांच्या लांबच्या लांब रांगा दिसून येऊ लागल्या.
सर्वर डाऊन यामुळे दररोज गर्दी वाढू लागली. ग्रामीण भागात व शहरात महिला कामधंदा सोडून अर्ज भरण्यासाठी गर्दी करू लागली.एकच चर्चा माझी लाडकी बहीण योजना अर्ज स्वीकारणे चालू याबाबत होती. दुसरीकडे दिपवाळीपूर्वी पैसे देणे सुरू झाल्याने व विशेषता आचारसंहिता लागणार असल्याने नोव्हेंबर महिन्याची रक्कम ही दिपवाळी पूर्वी महिलांच्या खात्यात जमा झाल्याने पुन्हा महिलांची बँकेत गर्दी वाढली. त्यानंतर निवडणुकीप्रसंगी प्रचार सभेत महिलांची गर्दी, मतदानादिवशी मोठ्या प्रमाणात रात्री दहा वाजेपर्यंत मतदानासाठी महिलांची मोठी गर्दी, निकाला दिवशी युतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने अपेक्षित नसताना देखील विजयी झाले. त्यावेळी महिलांच्या मतदानाचा परिणाम याची चर्चा,हा सर्व चमत्कार महिला मुळे घडला अशी खात्री होऊ लागली व युतीला विधानसभेत मोठे यश मिळाले.
आघाडीने ईव्हीएम मशीन मुळेच पराभव झाला चर्चा सुरू केली. ईव्हीएमची चर्चा कमी होत नाही.तोपर्यंत महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. याची पुन्हा चर्चा, म्हणजे 2024 या वर्षात जून महिन्यापासून डिसेंबर पर्यंत महिला व ईव्हीएम मशीन याच्यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण वर्ष गाजले.
त्यानंतर संविधान बाबत परभणीतील व बीड जिल्ह्यातील सरपंचाचा खून या चर्चेतच व तसेच अधिवेशन मंत्रिमंडळ, खातेवाटप व पालकमंत्री या चर्चेतच डिसेंबर महिना संपत आलेला आहे. जरांगे यांचा मराठा व हाके यांचा ओबीसी फॅक्टरची चर्चा मागे पडली आहे. सांगोला नगरपालिकेची प्रशासकीय नवीन इमारतीला अनुदान आले. परंतु बांधण्यास परवानगी नाही तोपर्यंत मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेची चांगल्या सुस्थितीत असलेली इमारत पाडून जमीनदोस्त केली. भुयारी गटारीचे निकृष्ट कामे व त्यामुळे शहरातील रस्त्याची चाळण, नागरिकांना चालता येणे मुश्किल,धुळीचे साम्राज्य त्यामुळे सर्दी खोकल्याचे रुग्णाच्या संख्येत वाढ, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कर्मचाऱ्यांची संख्या कमी त्यामुळे रुग्णाची गैरसोय, चालू वर्षी डाळिंबाला चांगला दर असल्याने पुन्हा शेतकरी सेंद्रिय पद्धतीने डाळिंब लागवडीकडे वळलेला आहे.
नद्यातील बंधाऱ्यात जलसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने व पाऊस काळ चांगला झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार मात्र दूध उत्पादक शेतकरी दुधाला अनुदान मिळाले नसल्याने व दुधाला दर नसल्याने तर 65 वर्षांपुढील आजोबा वर्षाला तीन हजार रुपये अनुदान मिळते म्हणून नाराज असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालय, पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असल्याचा आरोप होत आहे. गुन्हेगारीचे व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्याचा तपास लागत नाही शासकीय कार्यालयात लोकांची कामे होत नाही त्यामुळे 2024 मध्ये नागरिकाचचा संताप दिसून आला.