
सांगोला/ नाना हालंगडे
इंडियन नेव्हीमध्ये माझ्या ओळखीचे मोठे साहेब आहेत, तुमच्या मुलांना नोकरी लावतो असे म्हणून सातजणांची ३५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रभाकर राजाराम पोळ रा. घेरडी ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विष्णू लक्ष्मण गेजगे रा. घेरडी ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रभाकर राजाराम पोळ रा. घेरडी ता. सांगोला यांचा मुलगा महेश याचे १४ वी पर्यत शिक्षण झाले असून त्यांची गावातील विष्णू लक्ष्मण गेजगे रा. घेरडी ता. सांगोला यांच्याशी ओळख असून दोन्ही मुलांना नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करत असलेबाबत त्यांना माहिती होते. सन २०२१ मध्ये इंडियन नेव्हीमध्ये माझे ओळखीचे मोठे साहेब आहेत, तेथे पैसे दिले की बारावी पास मुलांना नोकरीला लावतात असे गेजगे यांनी पोळ यांना सांगितले होते.
नोकरीसाठी पाच ते साडेपाच लाख रूपये भरावे लागतील असे सांगितल्याने पोळ यांनी गेजगे यांना २० ऑक्टोंबर २०३१ रोजी दहा हजार रुपये रोख दिले होते. त्यानंतर प्रभाकर पोळ यांनी विष्णू गेजगे यांना १ लाख ९० हजार रुपये, १ लाख १० हजार रुपये रक्कम दिली.
दरम्यान विष्णू गेजगे याने महेश प्रभाकर पोळ याचे नावाचे इंडीयन नेव्हीचे पत्र दिले. त्यानंतर पोळ यांनी १ लाख ५० हजार रुपये, १ लाख रुपये असे एकूण ५ लाख ६०हजार रुपये दिले. त्यानंतर महेश यास चेन्नई येथे जीपी रेटींग हा कोर्स करून घेतला. तुमच्या मुलाला काही दिवसातच नोकरीवर बोलावतील असे सांगितले.
पोळ यांच्या शेजारी राहणारे सुरेश वामन कोकाटे, रावसाहेब विष्णू सुरवसे, धनंजय बंडा खुळे यांनीही आमच्या मुलांना नोकरी लावायची असे सांगितल्याने पोळ यांनी विष्णू गेजगे यांनी ओळख करून दिली. त्यांनीही विष्णू गेजगे यांना व त्यांच्या सांगण्यावरून कृष्णा गेजगे यांना एकूण १३ लाख ५० हजार रुपये दिले. पैसे देवूनही विष्णू गेजगे हा मुलांना नोकरी लावण्याबाबत विचारले असता काहीही कारणे देत होता.

दरम्यान, विष्णू गेजगे यांनी घेरडी गावातील सचिन गजानन सुर्यवंशी, नितीन गजानन सुर्यवंशी, करण दगडु सुर्यवंशी यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख ५० हजार रुपये त्यांनाहो नोकरीला लावले नसल्याची माहिती प्रभाकर पोळ यांना मिळाली. त्या सर्वांनी विष्णू गेजगे यास तू मुलांना नोकरीला लाव नाहीतर आमचे घेतलेले पैसे परत दे असे सांगितले. परंतु त्याने आमचे घेतलेले पैसे ही परत दिले नाहीत व मुलांना नोकरीला लावले नाही.
विष्णू लक्ष्मण गेजगे रा. घेरडी ता. सांगोला यांनी मुलांना इंडियन नेव्ही नोकरी लावतो असे म्हणून सात जणांकडून ३५ लाख ६० हजार रुपये घेऊन मुलांना नोकरीला लावले नाही तसेच पैसे परत देण्यास टाळाटाळ केली अशी फिर्याद प्रभाकर राजाराम पोळ यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे.