सांगोला : विशेष प्रतिनिधी
शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च होवूनही वेळेत लाभार्थ्यांना शिलाई मशीन, जिम साहित्य, प्राथमिक शाळांना संगणक व प्रिंटर, शाळकरी मुलींना सायकली आदी विविध साहित्य वाटप न केल्याने शासन निधीचा विनियोग झाला नाही. त्यामुळे सरपंच यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून घेरडी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा यशवंत पुकळे यांच्या सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यपद रद्द केल्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घेरडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा यशवंत पुकळे यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून शिलाई मिशन, मुलींना कराटे प्रशिक्षण, विधवा महिलांना शिलाई मशीन, जिम साहित्य, शाळकरी मुलांना सायकली वाटप, मुस्लिम दफनभूमीस तार कंपाउंड बांधण्यासाठी ग्रामसभेच्या २६ ऑगस्ट २०२२ च्या ठरावनुसार मंजुरी घेतली होती.
पुरवठा ठेकेदार येडगे यांनी सायकलचा पुरवठा केला. परंतु सायकलीचे वाटप न करता समाज मंदिरात सायकली ठेवल्या होत्या. सायकल वाटपाबाबत अद्याप नियोजन केले नाही. जिम साहित्यही वितरीत केले नाही.
१५ व्या वित्त आयोगातंर्गत २०२०-०२१ सालात प्राथमिक शाळांना संगणक आणि प्रिंटर देण्यासाठी मासिक सभेच्या ठेवानुसार २७ जुलै २०२२ रोजी मान्यता घेतली होती. ठेकेदार येडगे यांनी १८ ऑगस्ट ०२२ रोजी साहित्य पुरवठा केला होता. मात्र आजपर्यंत साहित्य वाटप न केल्याने ते पडून राहिले.
तसेच १४ व्या वित्त आयोगातर्गत ९ लाख १३ हजार ५६ रुपये इतका शिल्लक निधी दीर्घ कालावधी प्रलंबित ठेवला गेला. मासिक सभेचा अजेंडा वेळेवर दिला नाही. गणातील अतिक्रमणांची नोंदही अद्यावत ठेवलेली नाही. १५ व्या वित्त आयोगअंतर्गत ग्रामपंचायतीला २०६.७७ लक्ष प्राप्त अनुदानापैकी १३७.७० लक्ष अनुदान खर्च केले गेले आणि ६९.०७ लक्ष अनुदान आजपर्यंत शिल्लक आहे.
१४ व्या वित्त आयोगातंर्गत वार्षिक विकास आराखड्यामध्ये प्राधान्याने ८५ योजना, कामे, उपक्रम हाती घेताना सामूहिक स्वरूपाच्या कामांचा समावेश करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
अनुसूचित जाती जमाती कल्याणासाठी खर्च करणे, महिला व बालकल्याणासाठी १० टक्के निधी खर्च करणे, शिक्षण व उपजीविकेसाठी २५ टक्के निधी प्राधान्याने सामूहिक स्वरूपाची कामे करणे. ग्रामपंचायतीच्या व्याजाच्या रकमेतून खर्च करतेवेळी समतोल साधला नाही व सामूहिक स्वरूपाच्या कामांना प्राधान्य न देता वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना प्राधान्य दिले गेले. याबाबत वरील तक्रारीचे अवलोकन केले असता व प्रत्यक्ष भेट देऊन सखोल तपासणी केली असता खरेदी केलेले साहित्य ग्रामपंचायतीच्या अधिकारात नसलेल्या खाजगी जागेत ठेवले आहेत.
तसेच संबंधित वाटप व स्थापित केले नाही. सरपंच सुरेखा पुकळे यांनी सदर खरेदी केलेल्या वस्तूचे वाटपाचे कोणतेही नियोजन न करता कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले याबाबत, सरपंच सुरेखा पुकळे यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक आहे. त्यांनी पदाच्या कर्तव्याप्रती हलगर्जीपणा व आर्थिक अनियमितता केल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत कलम ३९ (१) प्रमाणे त्या कारवाईस पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सरपंच सुरेखा पुकळे यांना सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य पदावरून निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे.
विभागीय आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.