थिंक टँक स्पेशलराजकारण

आबासाहेब, ह्या गलिच्छ राजकारणात तुमची आठवण येतेय

भाई गणपतराव देशमुखांच्या नातवाने व्यक्त केली खंत

Spread the love

सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
भाई गणपतराव देशमुख म्हटले की आदर्श , एकनिष्ठ, तत्वनिष्ठ राजकारणाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तब्बल अकरा पंचवार्षिक निवडणुकात एकच पक्ष, एकच झेंडा, एकच मतदारसंघ असे तत्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांनी देशात नवा इतिहास रचला आहे. भाई गणपतराव देशमुख आज हयात नाहीत. मात्र, त्यांचे राजकारण पुढील पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक राहील असेच आहे. रविवारी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभुमीवर भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नेमके काय म्हटले आहे हे पाहण्याअगोदर डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याबाबत थोडेसे ..

डॉ. बाबासाहेब देशमुख हे भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर ते सांगोला तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून भाई गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू तथा डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे चुलत बंधू डॉ. अनिकेत देशमुख हे उमेदवार होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच पराभवाचा सामना करावा लागल्याने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

अशातच भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे पक्षीय राजकारणात सक्रिय झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाची युवक आघाडी असलेल्या महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखी साधी राहणी, अभ्यासपूर्ण मांडणी आणि तत्वनिष्ठ राजकारण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब देशमुख करत असतात. त्यांच्या या कार्यशैलीमुळे सांगोला तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील यांना टक्कर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख हे नेटाने काम करत असल्याचे दिसून येते.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“आज पुन्हा आबासाहेब, तुमच्या एकनिष्ठ राहण्याचं, तत्वनिष्ठ जगण्याचं मोल
आम्हाला जाणवलं, तुमची ही शिकवण कधीच वाया जाणार नाही!

प्रिय स्व.आबासाहेब,
आजचं हे चाललेलं गलिच्छ राजकारण पाहिलं की, तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुमची पक्षाप्रती-जनतेप्रती ५५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे निभावलेलं एकनिष्ठेच वचन, प्रामाणिकपणाचे बंधन आणि समाजसेवेसाठी वाहिलेले जिवन आठवते..

पूर्ण निष्ठेने , बुद्धीने , ताकदीने पक्षासाठी, जनतेसाठी गोरगरिब कामगारांसाठी जे काही केलं, उभं आयुष्य संघर्षात घालवलं त्याची आज प्रचिती येतेय. उभा मतदारसंघच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आबासाहेब तुमचीच आठवण काढतो आहे..

निष्ठा, चारित्र्य, सचोटी या बाबी तुम्ही स्वत: अंगिकारल्याच. परंतु मतदारांवरही त्याचे संस्कार केले. म्हणून फक्त आपले नेतेच नव्हे तर मतदारसंघातील तिसरी पिढी ही आपल्यासोबत एकनिष्ठ आहे..

आबासाहेब, तुमच्या नावाचं गारूड जिल्हाभर इतकं अफाट पसरलंय की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला सांगोल्याचं देशमुख घराणं आज ही आपलं वाटतं. जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायमस्वरूपी निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्तेही अवघ्या जिल्ह्यात तुम्हीच निर्माण केले आहेत आणि ते कार्यकर्ते, नेते आजही आमच्या सोबत आहेत..

आदर्श राजकारण्याकडे कोणते पैलू असावेत, या प्रश्नाचे उत्तर जर हवं असेल तर आबासाहेब तुमच्याकडे पाहिलं की उत्तर आपोआप मिळतं…”

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका