थिंक टँक स्पेशल

सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ

आबासाहेबांच्या राजकीय झंझावाताची कहाणी

Spread the love

सोलापूर (डॉ. बाळासाहेब मागाडे) : 2014 साली देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक प्रचारसभांचा धडाका लावला होता. या ‘मोदी लाटे’त विधानसभेला भल्याभल्यांचे डिपाॅझिट जप्त झाले. अनेक वर्षे निवडून येणा-या उमेदवारांनाही घाम फुटला होता. मात्र, सांगोला तालुक्यात परिस्थिती वेगळीच होती. ‘शेकापची त्सुनामी’ ही ५० वर्षांपासून सांगोला तालुक्यात कायम होती. परिणाम असा झाला की, मोदी लाटेचा कोणताही इफेक्ट सांगोल्यात झाला नाही. भाई गणपतराव देशमुख नेहमीप्रमाणे विक्रमी मतांनी सांगोल्यात विजयी झाले.

सांगोल्यात असं नेमकं का घडत होतं..?
त्याचं एकमेव कारण म्हणजे गणपतराव तथा आबासाहेब यांची मतदारांवर व मतदारांची आबासाहेबांवर असणारी निष्ठा. गणपतराव तथा आबासाहेबांचं वय २०१४ सालच्या निवडणुकीवेळी ८७ होतं. आजकाल आमदारकीच्या दोन किंवा तीन टर्म पूर्ण करता करता नेतेमंडळी घायकुतीला येतात. वयाचा मुद्दा हा नंतरची गोष्ट. २०१४ च्या निवडणुकीत ८७ वर्षांचा हा म्हातारा उमेदवार कसा काय निवडून येऊ शकतो? असे अंदाज विरोधी गटातील नेतेमंडळी उपस्थित करीत होती. दुसरे संकट होते ते ‘मोदी लाटेचे’. लोकसभेला देशभरात घवघवीत यश संपादन करून पाशवी बहुमत कमावणा-या भाजपचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी आत्मविश्वास दुणावला होता. विधानसभेलाही मोदी लाट महाराष्ट्रात चालली. मात्र सांगोला तालुका त्याला अपवाद होता. मोदी लाटेची चिंता शेकाप कार्यकर्त्यांना थोडीफार भेडसावत असली तरी आबासाहेब मात्र निर्धास्त होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा कार्यकर्त्यांवर, मतदारांवर असलेला अढळ विश्वास. हा विश्वास कमावायला त्यांनी उभे आयुष्य सांगोला तालुकावासियांना समर्पित केले होते. याच विश्वासातून आबासाहेब हे २०१४ च्या निवडणुकीला सामोरे गेले. शेकापच्या त्सुनामीपुढे कोणत्याही लाटेचा निभाव लागला नाही. आबासाहेब हे विक्रमी मतांनी निवडून आले.

२०१४ च्या उमेदवारीची गोष्ट
वयाची ८७ वर्षे पूर्ण झाल्याने आबासाहेब हे राजकीय निवृत्तीकडे पावले टाकत होते. एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी तसे स्पष्टपणे सूतोवाचही केले होते. कार्यकर्ते मात्र ही गोष्ट मानायला तयार नव्हते. शेवटच्या श्वासापर्यंत आबासाहेबच तालुक्याचे आमदार राहतील, असा जणू निश्चय कार्यकर्त्यांनी केला होता. डोळ्यांना अंधूक दिसते, एेकायला कमी येते असे आबासाहेब कार्यकर्त्यांशी बोलून दाखवत. मात्र काहीही झाले तरी तुम्हीच आमदार व्हायला पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. या आग्रहातूनच त्यांनी आपली सक्रिय राजकारणातील निवृत्तीची योजना मागे घेत उमेदवारी घोषित केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जास्त प्रचार करता आला नाही. कार्यकर्त्यांनी मात्र जोमाने प्रचार केला. आबासाहेब पुन्हा आमदार झाले. असे असले तरी तब्बल ११ वेळा निवडणूका लढवून व विजयी होऊनही त्यांनी कधीच ‘मी पुन्हा येईन’ असा साधा शब्दोच्चारही केला नव्हता, हे विशेष.

• एक नजर २०१४ च्या निवडणूक निकालावर
सांगोला विधानसभा निवडणूकीत अखेर ८७ वर्षीय उमेदवार गणपतराव देशमुख यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित करत बाजी मारली, आणि ११ व्या वेळी विधानसभेत प्रवेश मिळविला. त्यांनी शिवसेनेचे अॅड. शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला. उमेदवारनिहाय मते खाली पाहू शकता.

• गणपतराव देशमुख (शेकाप ) – ९४,३७४
• शहाजीबापू पाटील (शिवसेना ) – ६९,१५०
• श्रीकांत देशमुख (भाजपा) – १४,०७४
• संभाजी आलदर (अपक्ष) – ७,४४४
• जगदीश बाबर ( काँग्रेस ) – ३,४५७
• बनसोडे मिलींद रेवण (बसपा) – २,३२३
• कमरुद्दीन काझी (बहुजन मुक्ती पार्टी ) – १,३१७
• तुकाराम शेंडगे (हिदुस्थान प्रजा पक्ष ) – ९ ०९
• नामदेव लवटे ( अपक्ष ) – ९०२
• मोहन राऊत (अपक्ष) – ८७२
• नवनाथ मदने (अपक्ष) – ६८४
• परमेश्वर गेजगे (अपक्ष) – ५९७
• लक्ष्मण हाके (अपक्ष) – ५२७
• मच्छिंद्र पाटील (अपक्ष) – ४७५
• सचिन घाडगे (अपक्ष) – ३१५
आणि नोटा – ६६६

• विजयाचे शिलेदार बनले मतदार
भाई गणपतराव देशमुख यांनी अर्ज भरल्यापासूनच कार्यकर्त्यांनी यावेळीही आमदार साहेबांना निवडून आणून इतिहास घडवायचाच असा निर्णय घेतला होता. त्याला साथ मिळाली ती इतर मित्रपक्षांची. भाजपाच्या भगव्या लाटेत सांगोल्याचा गड राखण्यात शेकाप, राष्ट्रवादी व इतर पाठींबा दिलेल्या मित्रपक्ष कार्यकर्त्यांना अखेर यश आले. भाई गणपतराव देशमुख यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अॅड. शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव करत अजून आपण ‘तंदुरुस्त’ आहोत, हे सिध्द केले.

• हे प्रेम मिळवणारे आबासाहेब एकमेव
आजकाल साधे ग्रामपंचायत सदस्यत्व मिळाले तरी अनेकांच्या बोलण्या, वागण्यात मग्रुरी येते. मत देणा-यांना फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती बळावते. आबासाहेब मात्र याबाबतीत खूपच नशीबवान होते. हे नशीब दैवी नव्हते. त्यांनी ते स्वत: कमावले होते. खेड्यापाड्यांत, वाड्यावस्त्यांवर आबासाहेबांचा वावर असे. कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी घराची कवाडे सताड उघडी असत. कोणीही साधा खेडूत थेट आबासाहेबांच्या शेजारी बसून आपले गा-हाणे मांडू शकत होता. आबासाहेबांच्या जाण्याने सांगोला तालुकाच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र एका निगर्वी, निस्वार्थी, कर्मयोगी विकासपुरुषाला मुकला आहे. हे दु:ख न पचविण्याजोगं आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका