सांगोला : प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत EVM चा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. EVM द्वारे मतदान लोकशाहीसाठी मारक आहे. आगामी सर्व निवडणुकांत EVM चा वापर न करता मतपत्रिकेद्वारे निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी सांगोला येथे मंगळवार, 10 डिसेंबर रोजी समविचारी, बहुजनवादी, संविधानवादी पक्ष, सामाजिक संघटना, संस्था यांच्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.
या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा, बुद्ध भीमराज बहुद्देशीय सामाजिक संघटना, अस्तित्त्व सामाजिक संस्था, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, डॉ. आंबेडकर शेती विकास संस्था, सेक्युलर संघटना आदी संस्था, संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला परिपक्व आणि प्रभावी अशी लोकशाही दिली. संविधानाने दिलेल्या लोकशाहीमुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. परंतू गेल्या काही वर्षापासून सातत्याने लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचे प्रकार सूरू आहेत
तहसील कार्यालय येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन चालेल. या आंदोलनात सर्व नागरिक, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुका निरपेक्षपणे व्हाव्यात
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला परिपक्व आणि प्रभावी अशी लोकशाही दिली. संविधानाने दिलेल्या लोकशाहीमुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. परंतू गेल्या काही वर्षापासून सातत्याने लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचे प्रकार सूरू आहेत. लोकशाही प्रक्रियेत लोकांना मत देण्याचा व मत व्यक्त करण्याचा मूलभूत अधिकार आहे परंतू महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.
महाराष्ट्रातील नागरिकांची मुस्कटदाबी करून, आमिषे दाखवून मतदारांच्या मतांची चोरी करण्याचे प्रकार सर्रास घडले आहेत, जनतेचे मुलभूत आधिकार हिरावून घेणार्या ‘ईव्हीएम नामक’ बनावटी व सदोष निवडणूक प्रक्रिया राबवून सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर सत्ता मिळवता येते हा नवीन आणि लोकशाहीला घातक असा पायंडा पाडला जात आहे. त्यावर वेळीच उठाव होवून हे प्रकार बंद होण्यासाठी सज्जन आणि लोकशाहीवादी नागरिकांनी पुढे आले पाहिजे म्हणून ‘ईव्हीएम विरोधी संयुक्त कृती समिती”निर्माण करण्यात आली आहे. या समितीने इव्हीएम् विरोधी ‘एल्गार’ पुकारला असुन, ईव्हीएम् हटवल्या शिवाय ही चळवळ थांबणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून 10 डिसेंबर रोजी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे बापूसाहेब ठोकळे यांनी सांगितले.
याकरिता, सर्व लोकशाहीवादी नागरिक, संस्था, संघटना, पक्ष, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोदवावा असे आवाहन करण्यात आले.