
पंढरपूर : प्रतिनिधी
देशभर ईव्हीएम विरोधात आक्रोश व्यक्त होत असताना हा विरोध मोडीत काढण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन करणे आंदोलकांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी बारा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील लोकांचे अनुकरण करून गादेगाव (ता. पंढरपूर) येथील ईव्हीएम मशीनविषयी आक्षेपार्ह विधान करून जनमानसात प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवून समाजामध्ये द्वेष पसरविला असल्याचे कारण दाखवून पोलिस प्रशासनाकडून १२ आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणजित बागल, बाळासाहेब बागल, समाधान फाटे, नवनाथ बागल, अतुल फाटे, बाजीराव बागल, महादेव माने, योगेश बागल, दिगंबर बागल, सुभाष रोकडे, संजय कदम, आकाश मांडवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गादेगाव येथे एका लाल खुर्चीवर ईव्हीएमसदृश मशीन ठेवली. त्याला सलाईन लावून बेकायदेशीर जमाव जमवून लोकशाही विरुद्ध तसेच पवित्र मतदानाविषयी व ईव्हीएम मशीनविषयी संशय घेऊन ईव्हीएम हटाव, देश बचाव अशा आक्षेपार्ह घोषणा देऊन समाजातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जनमानसात प्रशासनाविषयी द्वेष पसरवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
बेकायदेशीर जमाव जमवून तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेश लागू असताना त्या आदेशाचे उल्लंघन करून मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील लोकांचे अनुकरण करून ईव्हीएम मशीनविषयी आक्षेपार्ह विधान करून जनमानसात प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवून समाजामध्ये द्वेष पसरविला आहे. म्हणून १२ जणांविरूद्ध बी एन एस १८९ (२) तसेच महा. पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.