“डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय” नामकरणास शासकीय मान्यता
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी मंत्री स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे नाव विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयास देण्यास उच्च शिक्षण विभाग तसेच विद्यापीठाने मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे विज्ञान महाविद्यालय हे “डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय” या नावाने ओळखले जाणार आहे. (Dr. Ganpatrao Deshmukh Mahavidyalaya Sangola)
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे हे विज्ञान महाविद्यालय चालविले जाते. या संस्थेकडून विज्ञान महाविद्यालयास शेकापचे नेते भाई गणपतराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार नामकरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेत शासनाने या महाविद्यालयाचे नाव “डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला, जि. सोलापूर” असे नामकरणास शासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे हे महाविद्यालय भाई गणपतराव देशमुख यांनी नावाने ओळखले जाणार आहे.
भाई गणपतराव देशमुख यांची दूरदृष्टी
भाई गणपतराव देशमुख हे शेतकरी, कामगार, गोरगरीब जनतेचे नेते होते. त्यांनी आपल्या आयुष्यात या वर्गाला कधीही अंतर दिले नाही. सांगोला तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय आपल्या तालुक्यातच व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली होती. या संस्थेने या संस्था परिसरात कॉलेज अंतर्गत विविध कोर्सेस सुरू केले. (Ex MLA Ganpatrao Deshmukh Sangola)
संस्थेतून दर्जेदार शिक्षण कसे मिळेल याचा प्रयत्न केला. मात्र या संस्थेची इतर ठिकाणी महाविद्यालये काढून आपण शिक्षण सम्राट बनावे असे भाई गणपतराव देशमुख यांना कधीही वाटले नाही. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी विविध ठिकाणी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. विविध स्पर्धांमध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकत असतात. एक दर्जेदार महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाने नाव कमावले आहे.
भाई गणपतराव देशमुख यांचे नाव या महाविद्यालयास देण्यात आल्याने पुढील कित्येक पिढ्या भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत.