प्राणाची आहुती दिली आमच्या जीवनासाठी!
त्रास भोगला किती आमच्या हसण्यासाठी!
कसे विसरू बाबा तुमचे उपकार !
हा जन्म महिला मी फक्त तुमची गुणगान गाण्यासाठी!
आज एक उत्तम कलाप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या महामानवाचा जन्म झाला. म्हणजेच क्रांतीसुर्य, प्रज्ञासुर्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. “काय वर्णन करू या प्रज्ञावंताचे..
समुद्राची शाई करून आकाशाचा कागद जरी केला तरी अपुरे पडेल एवढे वर्णन आहे या महामानवाचे”
14 एप्रिल 1891 रोजी डॉ बाबासाहेब यांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार ,स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, पीपल्स एज्युकेशनची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वतंत्र लढ्यात सहभागी असे कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या जीवनात केल्या.
समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील तळागाळातील व्यक्तींचा विचार केला.
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची !
तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची!
तू देव नव्हतास ,तू देवदूत ही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण फार हाल अपेष्टेत गेले. त्यांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता. त्यांना लाडाने घरात सर्वजण भिवा म्हणत असत. सर्वात लहान असल्याने सर्वांचे फार लाडके होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते. ते सर्व देवाचे लाड हट्ट पुरवत असतं. ते सैन्यात सुभेदार मेजर पदावर होते. रामजी सकपाळ यांचे स्वप्न होते. त्यांच्या मुलाने खूप शिकावे त्यासाठी ते खूप झटत होते. आपल्या देशात आज जी शांतता दिसत आहे. कायद्याचे राज्य दिसत आहे गरिबावरून अन्याय होऊ दिला जात नाही तो केवळ बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या घटनेमुळेच. आज संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.
ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की ज्ञानसागरामध्ये केवळ गुडघाभर पाण्यात पोहू शकेल एवढेच ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे. मित्रांनो हे शिक्षणाविषयीचे मत कोणाचे आहे माहित आहे? तर विचार आहेत महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे.
हजारो संकटे आली तरी भिम कधी झुकलाच नाही!
राहिला उपाशीपोटी पण कधी सुखलाच नाही !
अरे भीम जसा शिकला ,
तसा कोणी मायेचा लाल माझ्या भीमा पुढे कधी टिकलाच नाही!
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे कायदामंत्री झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते ओळखू लागले. त्यांनी अन टचबेल हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्यांचे वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव रमाई होते. रमाई ही अगदी वयाने लहानच होती. तिला लाडाने भीमराव रामू म्हणत असत.
रमाईने भीमरावांना शिकण्यासाठी खूप साथ दिली. त्यांची परिस्थिती अगदी नाजूक होती. रमाई शेणगौऱ्या थापायला जात होती. कोणाला दिसू नये म्हणून ती रात्री व पहाटे जात असे. कारण लोक बोलतील बॅरिस्टरांची पत्नी शेंडगवऱ्या थापते. सर्वांसमोर मान खाली होऊ नये म्हणून रमाई रात्रीनंतर गौ-या थापत होती.
गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती
भीमरावांचे शिक्षण हे फार हाल अपेष्टीतून पूर्ण झाले त्यांनी खूप कष्ट घेतले शिक्षणासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय ,आर्थिक ,शैक्षणिक, धार्मिक ,पत्रकारिता ,कायदे अशा विविध क्षेत्रात आपला अभेद्य वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या ,अंधकारमय जीवणाला प्रज्ञेचा संदेश दिला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावित शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य आणि हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वतःची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले.
बाबासाहेबांनी 1956 साली धर्मांतराच्या रूपाने केलेली ही धार्मिक क्रांती जागतिक इतिहासात अद्वितीय स्वरूपाची आहे. केवळ अर्ध्या तासात ५ लाख अनुयायांना दीक्षा देण्याचा विक्रम अजून कोणी मोडलेला नाही. तलवारीच्या जोरावर आणि पैशाच्या प्रलोभनाने झालेल्या इतर धार्मिक क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली ही धम्मक्रांती अतिशय वरच्या श्रेणीची आहे. आत्तापर्यंत धम्मदीक्षा देतेवेळी त्रिशरण आणि पंचशील देऊन परंपरागत पद्धतीने भिकूच्या हस्ते उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जायची.
बाबासाहेबांनी या परंपरागत पद्धतीमध्ये बदल केला आणि एका उपासकाने दुसऱ्या उपासकाला धम्मदीक्षा देण्याचा अधिकार बहाल केला.
बाबासाहेबांनी स्वतः आपल्या ५ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्या विचाराला कृती प्रवन केले. अशाप्रकारे बाबासाहेबांनी सर्वांगीण विचार करून धम्मदीक्षाच्या वेळी 22 प्रतिज्ञांची अपरिहार्यता असल्याने एक नवीन प्रमेय मांडले आणि सहा डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.
मान वर करून जगायला शिकवलं!
माझ्या भिमान शिक्षणाचे महत्त्व समजावले!
माझ्या भिमान अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले!
माझे शत शत नमन त्यांचे चरणी!
विश्वरत्न, विश्वभूषण ,भारतरत्न ,महाविद्वान, महानायक ,अर्थशास्त्रीय, महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य ,बोधिसत्व, महामानव ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!!
तमाम भारतीयांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दिक्षा समाधान धांडोरे
इयत्ता: दहावी
विकास विद्यालय आणि जुनियर कॉलेज अजनाळे