सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
धनगर समाजाच्या अलीकडील राजकीय इतिहासात प्रथमच तब्बल सात आमदार निवडून आले आहेत. हे सातही आमदार धनगरांचा आवाज बनून विधिमंडळ गाजवतील, अशी समाजाला अपेक्षा आहे. ओबीसी v/s मराठा आरक्षण वादात या आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हे सात आमदार धनगर आरक्षणाच्या लढ्यात उतरणार? की, पुढील पंचवार्षिक निवडणुकीची सोय म्हणून मराठा आरक्षणाला विरोध न करता सोईची भूमिका घेणार? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
हे आहेत सात वाघ!
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख (शेकाप, सांगोला), आ. गोपीचंद पडळकर (भाजप, जत), आ. उत्तम जानकर (राष्ट्रवादी श. प., माळशिरस), आ. नारायण पाटील (राष्ट्रवादी श. प.,करमाळा), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी अजित पवार, इंदापूर), गजानन लवटे (शिवसेना ठाकरे गट, दर्यापूर), सचिन पाटील (भाजप, फलटण-कोरेगाव) हे सात आमदार धनगर समाजाचा विधानसभेतील आवाज बनणार आहेत.
महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या तब्बल 1 कोटींहून अधिक आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या आठ ते नऊ टक्के हिस्सा धनगर समाजाचा आहे.
महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या तब्बल 1 कोटींहून अधिक आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या आठ ते नऊ टक्के हिस्सा धनगर समाजाचा आहे. राज्यातील 17 ते 18 जिल्ह्यातील 72 ते 75 मतदारसंघात हा समाज विखुरलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे 5 उमेदवार निवडून आले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचा केवळ एक आमदार निवडून आला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीने एकूण 10 उमेदवार उभे केले होते. त्यातील तब्बल सात उमेदवार निवडून आले. या समाजाचा निवडणूक निकालात निवडून येण्याचा स्ट्राईक रेट 80 टक्के राहिला.
धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, अकोला, परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव जिल्ह्यात आहे. कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पडायचं यावर धनगर समाजाचा प्रभाव आहे.
समाजाच्या मागण्या विधीमंडळात लावून धरण्यासाठी आता या समाजाने आपली माणसं मुंबईत पाठवली आहेत. जास्त लोकसंख्या असणाऱ्या समाजाने आपले फक्त सातच आमदार निवडून आणले असं नाहीये तर दुसऱ्या जागांवरही कुठला आमदार पाडायचा हे देखील ठरवलं.
यंदा निवडणुकीच्या तोंडावर धनगरांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडी नेत्यांनी फारशी दखल न घेता धनगर समाजाचे केवळ दहा उमेदवार उभे केले. मात्र यातील तब्बल सात उमेदवार आमदार झाले.
आरक्षण मागणीचा प्रभाव
लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मूळ ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास धनगर समाजाने तीव्र विरोध केला. लक्ष्मण हाके ह्या सोलापूर जिल्ह्यातील नेत्याने अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला.
आपले आरक्षण वाचावे. ते वाचवण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी विधिमंडळात असावेत यासाठी धनगर समाज जागृत झाला आणि त्यांनी तब्बल सात आमदार विधिमंडळात पाठविले आहेत.
डॉ. बाबासाहेब देशमुखांची भूमिका महत्त्वाची
शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला विधानसभा मतदासंघातील आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची समाजाबाबतची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यांनी मागील दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी कडलास येथे आंदोलनात सहभागी होऊन स्वतःचे मुंडण करून घेतले होते. आता ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.