मुंबई : डॉ. बाळासाहेब मागाडे
“मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन” असे म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. भाजपच्या गटनेतेपदी त्यांची नुकतीच निवड झाली असून त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली बैठक. याच बैठकीत गटनेता म्हणून फडणवीसांची निवड करण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून भाजपने जवळपास निश्चित केलं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे भाजपने त्यांचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. शेवटी शिंदेंनी गृहमंत्री पदाची मागणी लावून धरली होती. त्याबाबत भाजप काय निर्णय घेणार, हे लवकरच कळेल. मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील, हे निश्चित झालं आहे.
लाडक्या बहिणींच्या साक्षीने शपथविधी होणार
महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी १० हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.