सांगोला : विशेष प्रतिनिधी
महायुतीचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख यांच्या हस्ते तुळशीचा हार, वारकऱ्यांची शुभ्र टोपी, पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद देवून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा यापूर्वीही मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल देशमुख बंधूंनी यथोचित सत्कार केला होता.
मुंबई येथे आझाद मैदानावर आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सत्कारासाठी पंढरपूर येथून खास तुळशीचा हार बनवून नेण्यात आला होता. सोबतच पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीकांत आणि शशिकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सांगोला तालुक्यातील विविध प्रश्न आपल्या कार्यकाळात मार्गी लागावेत, अशी विनंती केली.
मोठी राजकीय परंपरा असलेले देशमुख घराणे
श्रीकांत, शशिकांत आणि लालासाहेब देशमुख यांचे पिताश्री आप्पासाहेब देशमुख यांनी जवळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून दमदार कामगिरी केली होती. त्यांच्या कार्यकाळात जवळा गावाच्या आजूबाजूच्या चार वाड्या एकत्र असताना त्यांनी उपसरपंच पद भूषविले. कोणताही जातीभेद न करता त्यांनी गावाचा कारभार केला होता. राजकारणाबरोबरच ते कृषी व्यवसायात रमले.
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार देऊन आप्पासाहेब देशमुख यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारासाठी आप्पासाहेब देशमुख यांनी वयाच्या 88 व्या वर्षीही जवळा गाव पिंजून काढले होते.
देशमुख कुटुंबियांचा दबदबा
आप्पासाहेब देशमुख यांचे तीनही सुपुत्र राजकारणात सक्रिय आहेत. शशिकांत देशमुख हे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते जवळा गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर श्रीकांत देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराची त्यांच्यावर धुरा होती. स्टार प्रचारक म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला. लालासाहेब देशमुख जवळा गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत.
श्रीकांत हे फडणवीसांचे निकटवर्तीय
श्रीकांत देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक आहेत. त्यांचे तालुकाभरात तरुण कार्यकर्त्यात तसेच जेष्ठ नागरिकांमध्ये मोठे नेटवर्क आहे. त्यांनी दोन वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे ते बिनविरोध सदस्य म्हणूनही ते निवडून गेले होते.