सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
कोणताही पक्ष, पार्टी, जात – पात न पाहता मी गेली ४० वर्षे या तालुक्यातील जनतेची निस्वार्थीपणे सेवा केली आहे. कधीही पदाची अपेक्षा ठेवली नाही. मला फक्त एकदा संधी द्या. सांगोला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकतो असे म्हणत दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी मतदारांना साद.
चिंचोली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. गुरुवारी त्यांनी तब्बल अकरा गावांमध्ये सभा घेतल्या.
चिंचोली येथे आयोजित सभेत बोलताना दीपक आबा म्हणाले की, पक्षाचा आदेश मानून भाई गणपतराव देशमुख यांना तब्बल पाच विधानसभा निवडणुकांमध्ये मदत केली. भाई गणपतराव देशमुख यांच्यानंतर मला या तालुक्यात काम करण्याची संधी मिळावी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आहे. बाबासाहेब देशमुख यांना कोणताही राजकीय अनुभव नसताना ते आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. वारसदार हा कामातून आणि विचारातून ठरविला जातो.
सांगोला तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. इथल्या तरुणांच्या हाताला, महिलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. तरुणांचा आणि महिलांचा विकास व्हावा यासाठी सांगोला तालुक्याच्या चारी बाजूने औद्योगिक वसाहती तयार करून उद्योजक घडवण्याचे माझे स्वप्न आहे. ते स्वप्न मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहे.
यावेळी बोलताना दीपक आबा यांनी उपस्थित जनतेला सवाल केले. चिंचोली गावचे तलाठी कार्यालय सांगोला येथे आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. मला संधी दिल्यास मी चिंचोली गावात स्वतंत्र तलाठी कार्यालय उभा करेन. कृषी विभागाचाही या गावाच्या बाबतीत सावळा गोंधळ आहे. कृषी विभागातील अनागोंदी आणि भ्रष्टाचार मोडीत काढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.
चिंचोली तलाव भरण्यासाठी सातत्याने भिकाऱ्यासारखी मागणी शासन दरबारी करावी लागते. हा अनुभव मी अनेक वर्षांपासून घेत आहे. मला संधी दिल्यास हे करण्याची गरज पडणार नाही. आपल्या हक्काचे पाणी जनतेने न मागता मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.
दररोज शेकडो प्रवेश, विरोधकांच्या पोटात दुखतंय
मागील 35 वर्षे मी इथल्या जनतेची सेवा केली आहे. माझ्या कामावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील हजारो कार्यकर्ते विविध पक्षांना कंटाळून माझ्या पक्षात प्रवेश करत आहेत. ही माझ्या कामाची खरी पोचपावती आहे. माझ्याकडे होत असलेला पक्षप्रवेश पाहून अनेकांच्या पोटात दुखत आहे. मात्र इथून पुढच्या काळामध्ये माझ्यासोबत यापूर्वीपासून असलेल्या आणि नव्याने सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
मला या निवडणुकीत फक्त एकदा संधी द्या. मी तुमच्या विश्वासाला पात्र राहून तुमची 24 तास सेवा करण्यासाठी तत्पर राहीन.