“मित्राने जाणीव ठेवली नाही, मात्र उद्धव ठाकरेंनी जाणीव ठेवली”
दीपकआबा साळुंखे - पाटील
सांगोला : विशेष प्रतिनिधी
मागील पंचवार्षिक निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना मी “बापू तुम्ही एकवेळ आमदार व्हा.. पुढील वेळेस मला संधी देवून मदत करा” असे मी म्हटले होते. बापूंनीही ते मान्य केले होते. हा शब्द बापूंनी पाळला नाही. दिलेल्या शब्दाची जाणीव मित्राने ठेवली नाही मात्र उध्दव ठाकरे साहेबांनी जाणीव ठेवून मला उमेदवारी दिली” असे सांगत माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शहाजीबापूंना उपकाराची आठवण करून दिली.
जनता माझ्यावर प्रेम करते. ३५ वर्षांचा निवडणुकीचा मला अनुभव आहे. त्या अनुभवाच्या बळावर माझा विजय निश्चित असल्याचा आशावाद व्यक्त करत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना खडे बोल सुनावले.
माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगोला शहरातील अंबिका मदिर येथे नारळ फोडून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी त्यांना निवडणूकीत मदत केली. पुढील वेळेस मदत करण्याचे आश्वासन बापूंनी दिले होते. मात्र त्यांनी शब्द पाळला नाही. उध्दव ठाकरे यांनी मात्र याची जाणीव ठेवली.
कोणतं कुत्रं भुंकतय हे मला चांगले माहीत!
मला मागील ३० वर्षांचा निवडणुकीचा अनुभव आहे. कोणत्या वस्तीवरील कुत्रं भुंकतय,कोणत्या वस्तीवरील कुत्रं भुंकत नाही… हे मला चांगले माहीत आहे. माझा विजय पक्का आहे. फक्त लीड कसं वाढेल याचा प्रयत्न करत आहोत, असा दावा दीपक साळुंखे पाटील यांनी केला.