
सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दक्षिण सोलापूर आणि सांगोला या मतदार संघात दिलेल्या उमेदवारांवरून महाविकास आघाडीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. खा. संजय राऊत यांनी ही टेक्निकल चूक असल्याचे सांगितल्याने एबी फॉर्म मिळवून अर्ज भरण्याच्या तयारीत असलेले दोन्ही उमेदवार ऑक्सिजनवर असल्याचे दिसून येत आहेत. हे दोन्ही उमेदवार न बदलल्यास महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मागील दोन निवडणुकांत मोदी फॅक्टरमुळे हा मतदारसंघ भाजपकडे गेला आहे. तेथे आ. सुभाष देशमुख हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने येथे माजी आमदार रतीकांत पाटील यांचे सुपुत्र अमर पाटील यांना उमेदवारी घोषित करून एबी फॉर्मही दिला आहे. वास्तविक महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटेल असा अंदाज होता. तेथे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे इच्छुक आहेत. त्यांनी दोन वेळा त्या मतदारसंघात विजय मिळविला होता. मात्र शिवसेनेने अचानक तेथे उमेदवार दिल्याने माने यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत.
माने समर्थकांचा ठिय्या
माजी आमदार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील सुमित्रा या निवासस्थानासमोर शुक्रवारी हजारो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी केली. करू किंवा मरू पण दिलीप माने यांनाच आमदार करू असा निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला. युवा नेते पृथ्वीराज माने हे सुद्धा या कार्यकर्त्यांसमवेत बसले होते. पक्षाने जर दिलीप माने यांचा विचार नाही केला तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरू आणि सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करू असा इशारा दिला आहे.
सांगोल्यात पवार शेकापच्याच बाजूने?
शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. त्यात सांगोला मतदारसंघात दीपकआबा साळुंखे – पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र या जागेवरील उमेदवार बदलणार का? अशी चर्चा सुरू आहे. सांगोला जागेवर मविआतील घटकपक्ष शेतकरी कामगार पक्षाने दावा केला आहे. ही जागा शेकापला द्यावी यासाठी शरद पवारही आग्रही आहेत.
शेकापने या मतदारसंघात भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर ठाकरे गटाने दीपकआबांना रिंगणात उतरवलं आहे. महाविकास आघाडीत या जागेवरून संघर्ष सुरू आहे. त्यात शरद पवारांच्या मध्यस्थीने काही तोडगा निघतो का हे पाहणे गरजेचे आहे. सांगोल्यात शेकापने डॉ. बाबासाहेब देशमुखांना उमेदवारी ही शरद पवारांच्या चर्चेनंतरच केल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे.
आ. रोहित पवारही शेकापला जागा मिळावी यासाठी आग्रही आहेत. “एक – दोन जागा अशा आहेत जिथे ज्या गोष्टी घडायला नको त्या घडल्यात. तरीसुद्धा उद्धव ठाकरे पक्षातील नेते नक्कीच काही मतदारसंघाबाबत फेरविचार करतील. मोठं मन दाखवतील आणि सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जवळून ओळखतो. त्यांनी मला प्रचाराला बोलावले तर मी त्याठिकाणी नक्कीच जाईन” असे विधान आ. रोहित पवार यांनी केल्याने उमेदवार बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
या दोन्ही ठिकाणी शिवसेना पक्षाकडून अंतिम निर्णय काय घेतला जातो त्यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. जर याठिकाणचे उमेदवार बदलले नाहीत तर येथे महाविकास आघाडीत बंडाळी माजणार हे निश्चित आहे.