डिकसळचं पोरगं चित्त्यासारखं धावलं!
ऊसतोड कामगाराचं लेकरू राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत

सांगोला / डॉ.नाना हालंगडे
श्वानप्रेमी तसेच बैलगाडा, घोडागाडा प्रेमी असलेल्या शशी उर्फ चिठ्ठ्याभाईने नादच खुळा केला. त्याने क्रॉसकंट्री स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत डिकसळ गावाचे नाव राज्यपातळीवर पोहचविले आहे. काल सोलापुरात झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला अन् याच शशीची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
घरात अठराविश्व दारिद्र असलेल्या शशी जगू चव्हाण यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. बाप अन् आई ऊस तोडणी कामगार. पण अठरा वर्षाच्या शशीला पहिल्यापासूनच धावण्याची आवड. सतत बैल, घोडागाडा अन् श्र्वानाच्या स्पर्धेत धावून याला यात आवड निर्माण झाली. त्यात कॉलेज शिकत असताना तर क्रॉसकंट्रीने याला वेडच लावले. १८ वर्षीय स्पर्धेतील सामन्यात चित्यागत धाव घेत ६ किलोमिटरचे अंतर अवघ्या १६ मिनिटात मारून जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला. आई-बाप ऊस तोडणी कामगार असताना शशिने धावण्याची विशेष अशी आवड जोपासली आहे. त्याच्याकडे तीन शर्यतीचे घोडे अन् दोन शर्यतीचे श्वान आहेत. घोड्याचे मैदान तर हा चिठ्ठ्या रोजच पार पाडीत असतो. गरीबाची मुलच हुशार असतात हे शशिने दाखवून दिले आहे.
त्याचा जिल्ह्यात तर पहिला नंबर आलाच आहे पण आता राज्यस्तरीय स्पर्धा अमरावती येथे होणार आहेत. त्याच्या या यशाबद्दल भाईंच्या देवराई प्रतिष्ठानच्या वतीने याचा सत्कारही करण्यात आला. याच चिठ्ठ्याभाईमुळे गावाचे नाव रोषण झाले आहे.
चिठ्ठ्याभाईंची चित्या सारखीच धाव
डिकसळ गावचा कोहिनूर हिरा शशी उर्फ चिठ्ठ्याभाईची धाव चित्त्यापेक्षाही वेगवान आहे. सोलापूर येथे नेहरू नगर मैदानावर झालेल्या या स्पर्धेत याने ६ किलोमिटर अंतर अवघ्या १६ मिनिटात मारुन जिल्ह्यात नावलोकीक मिळविला आहे. याचे धावणे चित्त्यासारखे वेगवान असल्याने ह्या चिठ्ठ्याभाईने गावांचे नाव राज्यपातळीवर पोहचविले आहे.
अमरावती येथे राज्यस्तरीय स्पर्धा
घेरडी येथे बारावीत शिकत असलेल्या डिकसळ येथील शशी जगू चव्हाण याला घोडागाडी तसेच श्वान पळविण्याचा स्पर्थेमुळे धावण्याची विशेष अशी आवड आहे. तो सतत विविध स्पर्धेत भाग घेत असून सोलापूर येथील मैदान मारून त्याने अनेकांना अचंबित केले आहे. चित्त्यासारखी धाव असलेल्या चिठ्ट्याने जिल्ह्यात नावलोकिक मिळविला. याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून,ह्या स्पर्धा अमरावती येथे होणार आहेत.
देवराईतर्फे सत्कार
भाईंच्या देवराई प्रतिष्ठानच्यावतीने चिठ्ठ्याभाईचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. याने गावाचे नाव रोशन केले असून, डिकसळ गाव म्हणजे रत्नाची खानच आहे. २०२४ सालात गावाच्या नावलोकिकात जादाच भर पडलेली आहे. याच सर्व यशस्वी पट्ट्याची देवराई नेहमीच दाखल घेत असते. आताही चिठ्ठ्याभाईचा सन्मान करून त्याला बळ दिले आहे.
चिठ्ठ्याभाईकडे ३ घोडे अन् २ श्वान
ऊस तोडणी कामगाराचा मुलगा असलेल्या चिठ्ठ्याभाई याला शर्यतीचा खूपच नाद. याच नादापायी यांच्याकडे ३ घोडे अन् २ शर्यतीचे श्वान असा लवाजमा आहे. आईबाप ऊस तोडणीला जातात. मात्र, चिठ्ठ्याभाई शाळा बघून हा सारा गाडा हकित आहे. त्यामुळेच याला धावण्याच्या स्पर्धेची आवड निर्माण झाली. त्यातूनच चिठ्ठ्याभाई क्रॉसकंट्रीचे मैदान गाजवीत आहे.