ताजे अपडेट

सांगोल्यात शनिवारी संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद

धर्मांतर बंदीविरोधात आवळली वज्रमूठ

Spread the love

सेक्युलर मुव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत (अण्णा) शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “देशात गेल्या काही वर्षांपासून एक अस्वस्थतेचे वातावरण आहे. संविधानाचा सोयीचा अर्थ लावून किंवा काढून या देशातील न्याय व्यवस्थेपासून ते घटनात्मक सर्वच संस्थांवर सत्ताधारी पक्षाने कब्जा मिळविला आहे. या संस्था सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्याप्रमाणे काम करीत आहेत. त्याविरोधातील संविधानवाद्यांचा व लोकशाहीवाद्यांचा आवाज क्षीण झालेला आहे. सर्वत्र एक दहशत, भितीचे वातावरण आहे.”

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये धर्मांतरबंदीचा कायदा करण्यासाठी विराट मोर्चे निघू लागले आहेत. धर्मांतरबंदीचा कायदा करुन, नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा डाव आहे. याला विरोध करून भारतीय संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांबाबत लोकलढा उभारण्यासाठी सेक्युलर मुव्हमेंट, महाराष्ट्रतर्फे सांगोला (जि. सोलापूर) येथे शनिवार, ३ जून रोजी “संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद” आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या परिषदेस २५ हून अधिक सामाजिक संघटना, संस्थांनी पाठिंबा दिला असून त्या संघटना सहभागी झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती माजी सहाय्यक पोलिस आयुक्त तथा सेक्युलर मुव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत (अण्णा) शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी दुपारी ३ वाजता सांगोला पंचायत समिती येथील बचत भवन सभागृहात ही परिषद होईल. परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. भरत नाईक (कोल्हापूर, जनरल सेक्रेटरी – सेक्युलर मुव्हमेंट) यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी भरत शेळके (कार्याध्यक्ष – सेक्युलर मुव्हमेंट) असतील. सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे हे प्रमुख मार्गदर्शक असतील. शिवाय ज्येष्ठ पत्रकार तथा लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे, प्रा. डॉ. जी.व्ही. सरतापे हे प्रमुख वक्ते असतील. पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, स्वराज्य इंडियाचे ललित बाबर, प्रदीप मिसाळ (सोलापुर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), थिंक टँक डिजिटल मीडियाचे संपादक डॉ. बाळासाहेब मागाडे यांची सन्मानिय उपस्थिती असेल.

कार्यक्रम पत्रिका

सेक्युलर मुव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत (अण्णा) शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “देशात गेल्या काही वर्षांपासून एक अस्वस्थतेचे वातावरण आहे. संविधानाचा सोयीचा अर्थ लावून किंवा काढून या देशातील न्याय व्यवस्थेपासून ते घटनात्मक (Indian Constitution)सर्वच संस्थांवर सत्ताधारी पक्षाने कब्जा मिळविला आहे. या संस्था सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्याप्रमाणे काम करीत आहेत. त्याविरोधातील संविधानवाद्यांचा व लोकशाहीवाद्यांचा आवाज क्षीण झालेला आहे. सर्वत्र एक दहशत, भितीचे वातावरण आहे.”

धार्मिक स्वातंत्र्यावर घाला
“आता हा घाला भारतीय नागरिकांच्या संविधानिक मूलभूत हक्कांवरही घातला जाऊ लागला आहे. सेक्युलर तत्वाचा पुरस्कार आणि अंगिकार करणाऱ्या संविधानाने सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, राष्ट्राची एकात्मता आणि आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. धर्मस्वातंत्र्यात धर्म निवडीचाही व्यक्तीला अधिकार दिला आहे. परंतु कुठे एखादी दुसरी गुन्हेगारी घटना घडली असेल, त्याचे भांडवल करुन लव्ह जिहाद अशा खोट्या सबबी पुढे करुन आंतरधर्मिय विवाहावर बंदी घालण्यासाठी कायदे करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये धर्मांतरबंदीचा कायदा करण्यासाठी मोर्चे निघू लागले आहेत.”

आंतरधर्मीय विवाहाचे काय?
“धर्मांतरबंदीचा कायदा करुन, नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा डाव तर आहेच, परंतु आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय या नावाखाली राज्य सरकारने महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर २०२२ च्या शासन आदेशानुसार एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आंतरधर्मीय विवाहाला ही समिती मान्यता देणार अन्यथा हा विवाह बेकायदेशीर असणार आहे.किंवा त्या विवाहाला मान्यता मिळणार नाही.हा निर्णयही आधुनिक मुक्त जगातील तरुण मुला-मुलींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याच्या अधिकारावर गदा आणणारा आहे आपला आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे मूलभूत व्यक्तीस्वातंत्र्यही हिरावून घेतले जात आहे.”

धम्मक्रांतीचा पाया उखडून टाकण्याचा प्रयत्न
“देशातील सामाजिक विषमता नष्ट करुन समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती घडवून आणली, ती पराभूत करण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करुन धम्मक्रांतीचा पायाच उखडून टाकण्यासाठी दोन हजार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रतिक्रांती घडवून आणण्याचे हे षडयंत्र आहे. म्हणून आता सावध होण्याची गरज आहे. ही काळाची हाक असून संविधानिक व लोकशाही मार्गाने भारतीय नागरिकांच्या घटनात्मक मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी पुढे यावे लागेल. या षडयंत्राच्या विरोधातील आवाज म्हणजेच संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद होय.”

राज्यभरात परिषदा
कार्याध्यक्ष भरत शेळके म्हणाले की, “यापूर्वीही सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी परिषदा झाल्या आहेत. या परिषदांमध्ये अनेक समविचारी संघटना सामील झालेल्या होत्या. अनेक विचारवंत सामील झालेले होते. या परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये परिषद व्हावी असे अनेकांनी मते नोंदवली. म्हणून सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून सांगोला येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

परिषदेत सहभागी संस्था, संघटना
1) सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुहमेंट महाराष्ट्र राज्य 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, सांगोला, 3) संभाजी ब्रिगेड, सांगोला 4) भीमशक्ती संघटना, सांगोला 5) डॉ. आंबेडकर शेतीविकास व संशोधन संस्था, सांगोला 6) अस्तित्व संस्था, सांगोला 7) सांगोला तालुका मुस्लिम समाज 8) आखिल भारतीय होलार समाज संघटना, सांगोला 9) स्वाभिमानी होलार समाज संघटना, सांगोला 10) शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना, सांगोला (11) आदर्श नाभिक मंडळ, सांगोला 12) बहुजन क्रांती प्रतिष्ठान सांगोला 13) सांगोला तालुका पेन्शनर संघटना, सांगोला 14) समता प्रतिष्ठान, गुजेगाव 15) एन. डी. एम. जे. संघटना सांगोला 16) श्रीनाथ बहुद्देशिय संस्था, नंदुर 17) पुरोगामी युवक संघटना, सांगोला 18) सांगोला तालुका मातंग आघाडी 19) सांगोला तालुका डवरी गोसावी संघटना 20) शाहू फॉऊंडेशन, महुद 21) सुभव करिअर अकॅडमी (पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण), सांगोला आदी संस्था व संघटना सहभागी होणार आहेत.

या संविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषदेस सांगोला तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत (अण्णा) शेळके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका