
सांगोला : डॉ. बाबासाहेब मागाडे
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेस्टार गोविंदा हे रविवारी सांगोला शहरात दाखल होत आहेत. माजी खासदार गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला शहरातून भव्य रोड शो काढण्यात येत आहे.
रविवार, 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता भव्य रोड शो आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रोड शोचा मार्ग अंबिका मंदिर येथे नारळ फोडून, रॅलीला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयासमोरून अण्णाभाऊ साठे चौक, जय भवानी चौक, नेहरू चौक असा असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रचारात बापू अव्वल
निवडणुकीच्या प्रचारात आमदार शहाजी बापू पाटील यांनी आघाडी घेतली आहे. मागील चार दिवसांपूर्वी महुद येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विराट सभा घेण्यात आली. काल शुक्रवारी सांगोला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापूंच्या प्रचारार्थ जंगी सभा घेऊन बापूंना निवडून देण्याचे आवाहन केले. आता उद्या रविवारी सुपरस्टार गोविंदा यांना त्यांनी सांगोला शहरात आणले आहे. बापूंच्या प्रचारार्थ चक्क सिनेस्टार गोविंदा येणार असल्याने या रोड शोला प्रचंड गर्दी उसळणार आहे.
कोण आहेत गोविंदा
गोविंदा अरुण आहुजा (जन्म : विरार-मुंबई, २१ डिसेंबर १९६३) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटांत व चाहत्यांमध्ये गोविंदा याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे.
गोविंदाची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका होती. एक चित्रपट निर्मितीच्या कामात प्रचंड नुकसान झाल्याने गोविंदाच्या वडिलांना मुंबईतील कार्टर रोडचे घर विकूून विरारला जावे लागले. तेथेच गोविंदाचा जन्म झाला. गोविंदा वसईच्या काॅलेजातून बी.काॅम झाले आहेत.
गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. गोविंदा मुळचे विरार(मुंबई)चे आहेत.
गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते. गोविंदा हे साधू संतांचा सन्मान करतात. मात्र त्यांनी सूरत येथील होळीच्या कार्यक्रमात येऊन कथित यौन शोषणाच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेल्या संत आसाराम बापूंचे समर्थन केले.