कडलासच्या सोन्याचा राज्यात तोरा
हिंदकेसरी सोन्या वळूची गौरवगाथा; समाधान पवार यांचे पशुप्रेम

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
मन वढाय,वढाय उभ्या पिकातील ढोर,किती हाकला हाकला,परी जाती पिकावर, या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील कडवे आहे. मानवाला एखादी गोष्ट आवडली की त्याच्यासाठी वाटेल ते, करणारी मानवजात असून ग्रामीण भागात त्याला “नाद” म्हणतात. नाद, मग तो कशाचाही असो मेंढा,बकरा, मांजर,कुत्रा,खिलार गाय, खिलार वळू असे अनेक पाळीव प्राणी पाळण्याचा मानवाला नाद असतो.असाच खिलार वळू पाळण्याचा नाद कडलास गावातील पैलवान कै.नामदेव कोंडीबा पवार यांच्यापासून सुरुवात होऊन गेली 50 वर्ष खिलार जनावरे व वळू सांभाळण्याची परंपरा आज त्यांची मुले व नातवंडे करीत आहेत. समाधान नामदेव पवार, विठ्ठल नामदेव पवार व आनंदा नामदेव पवार ही त्यांची मुले सध्या खिलार वळू सांभाळण्यात अग्रेसर आहेत.
सांगोला तालुका खिलार जातीच्या गाई,वळूचा तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.पूर्वी सोलापूर जिल्हा इयत्ता चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकांमध्ये खिलार जनावराचा तालुका म्हणून सांगोल्याचा पाठ होता.या तालुक्यातील वाढेगाव,अकोला, कडलास,महिम,कोळा,जवळा, घेरडी, मेडशिंगी,जूनोनी आधी बहुतांश गावातून वळू सांभाळण्याचा अनेक शेतकऱ्यांना नाद आहे.समाधान पवार यांच्या सोन्या वळूने तर कर्नाटक व महाराष्ट्रात कृषी प्रदर्शनात अनेक बक्षीस मिळवून धुमाकूळ घातला आहे.
शासनामार्फत वळूचे प्रदर्शन भरवले जात आहे.तेथे ज्यांच्याजवळ वळू आहे ते शेतकरी त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी वळू घेऊन जात असतात.कडलास गावचे समाधान पवार व त्यांच्या बंधूंनी गेली वर्षभरात कोल्हापूर, गडहिंग्लज, विटा,इंदापूर,सातारा, पुसेगाव कनेरमठ,शिर्डी,नगर,पुणे आदी ठिकाणी प्रदर्शनात घेऊन गेले. या सर्व ठिकाणी चॅम्पियन अखेर सोन्या हिंदकेसरी झाल्याचे त्यास संभाळणारे शेतकरी समाधान पवार यांनी मत व्यक्त केले. सदर वळू पांढराशुभ्र रुबाबदार बैलाचा बांधा कट काजळी अतिशय देखणा व चलाख असल्याने त्यास चालू वर्षी नऊ वेळा चॅम्पियन पद मिळाले आहे. त्याचे सर्वत्र नाव होत आहे .इंदापूर येथे हिंदकेसरी हे पद देऊन गौरविण्यात आले.
शासनातर्फे वेगवेगळ्या शहरात कृषी प्रदर्शन तसेच स्पर्धा आयोजित केले जात असतात. त्या ठिकाणी शेतकरी आपल्या वळूला घेऊन जात असतात. त्या स्पर्धेसाठी 200 ते 300 वळू प्रदर्शनात आलेले असतात. त्यामध्येही सहा ग्रुप आहेत. आदत, दुसा, चौसा, साई दाती, जूळूक,याच्यातून जो वळू देखना असेल त्यास चॅम्पियनपद दिले जाते. त्या पदाला ट्रॉफी, एक लाख रुपये तसेच काही ठिकाणी 51 हजार, कुठे ट्रॅक्टर असे वेगवेगळे बक्षीस दिले जाते.तर कर्नाटकात ट्रॅक्टर व पाच तोळे सोने बक्षीस म्हणून देतात. शरद पवार कृषिमंत्री असताना कडलास येथील समाधान पवार यांच्या वळूला ऑल इंडिया चॅम्पियन हे पद मिळाले होते.
समाधान पवार यांच्या वळू चार दाती असून त्यास भोपाळ व दिल्ली प्रदर्शनात ऑल इंडिया चॅम्पियन पद मिळाले आहे. त्या वळूस एका दिवसाला एक हजार ते दीड हजार रुपये खाण्याचा खर्च येतो. या वळूचे खाद्य कवळी मक्याची कणसे,भरडा, शेंगदाणा पेंड,काजू,बदाम, पिस्ता, अंडी,म्हशीचे दूध असे सकाळ संध्याकाळ खाद्य आहे. तसेच दिवसातून सकाळ व संध्याकाळ प्रत्येकी एक तास त्यास फिरवून आणावे लागते. नाहीतर अटॅक येतो जर बक्षीस मिळवायचे असेल तर ढोलकीच्या तालावर पैलवान जसा डोलतो तसा वळू डोलला तर त्यास बक्षीस मिळत असते. नाहीतर बक्षीस मिळत नाही. त्यासाठी दररोज एक तास हलगीच्या तालावर चालवावे लागते हे काम कडलास गावचे दगडू आबा ठोकळे हे गेली 40 वर्ष हलगी वाजवत आहेत. त्यास मानधन द्यावे लागते,त्या हलगी वाल्या वरच वळूची चाल ठरते व त्यास बक्षीस मिळते.
प्रसिद्ध वळू असल्याने खिलार गाय ज्यावेळी माजावर येते त्यावेळी त्याचबरोबर या वळूकडे येत असतात. सध्या त्यास दोन हजार रुपये घेतले जातात. सरासरी दिवसातून तीन ते चार गाई दररोज येत असतात. हे त्या वळूपासून उत्पन्न असून त्यातून त्यांचा सर्व खर्च भागविला जात असतो.
तालुक्यात बहुतांश गावात खिलार गाई व वळू सांभाळण्याची परंपरा आहे. काही वळु मालक यात्रेत शेती प्रदर्शनात दाखल करून हजारो रुपये बक्षीस मिळवतात. प्रसिद्ध वळूपासून उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने खिलार जनावरे सांभाळण्याचा नाद तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होता.परंतु अलीकडे खर्च व कृत्रिम रेतन केंद्र यामुळे खिलार जनावरे व वळूची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.शेतकरी संकरित गायीकडे वळत आहे. खिलार जनावरे जोपासण्याची परंपराय टिकली पाहिजे,असेही समाधान पवार म्हणाले.