![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2024/10/Capture-2024-10-24-13.28.51-780x470.jpg)
सांगोला : विशेष प्रतिनिधी
दलीत, वंचित आणि परिघाबाहेरील समाज घटकांचे जातीयवादी विचारधारेच्या पक्षांनी शोषण केले आहे. दलीत, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. बेरोजगारी वाढत आहे. अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. वंचित घटकांना सत्तेत वाटा दिला जात नाही. उलट त्याची नाकाबंदी केली जाते. जातीचे आणि टक्केवारीचे राजकारण केले जाते. अशा परिस्थितीत जातीयवादी पक्षांना सहकार्य करणे म्हणजे स्वतःचा आत्मघात करण्यासारखे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात जातीयवादी विचारधारेच्या पक्षांना विरोध करून प्रागतिक आणि लोकशाही मानणाऱ्या पक्षाला उघडपणे मदत करणार असल्याचे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पत्रकारांशी बोलताना बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, शिवसेना – भाजप सरकारच्या काळात दलीत, मुस्लिमांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. महिलांवरील अत्याचारांची अनेक प्रकरणे दाबून टाकली जात आहेत. जी प्रकरणे उघड होतात त्यावर कोणी आवाज उठवला तर त्यालाही धमकावले जाते. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला काम नाही आणि दुसरीकडे राज्यातील उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनेक महिने शिष्यवृत्ती दिली गेली नाही.
अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. संविधानातील कायदे बोथट केले जात आहेत. जणू संविधानावर घाला घातला जात आहे.
आंबेडकरी समाजाचा शिवसेनेलाही विरोध
“घरात नाही पीठ, कशाला हवे विद्यापीठ” अशी निर्भत्सना करून शिवसेनेने मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध केला. नामांतराची मागणी करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची घरे पेटवली. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निजामाचे, इंग्रजांचे हस्तक म्हटले होते. रिडल्सच्या मोर्चाला विरोध केला होता. अशा जातीयवादी पक्षांना आंबेडकरी विचारधारा मानणारा समाज कधीही मदत करणार नाही.
सांगोल्यात नेमकी भूमिका काय?
सांगोला तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात आजपर्यंत कधीही जातीय दंगली किंवा सामाजिक अत्याचाराचे प्रकार घडले नाहीत. मात्र मागील काही वर्षांपासून तालुक्यात अशा घटना घडताना दिसत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. ज्या महामानवाने देशाला मजबूत असे संविधान दिले त्या महामानवाच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम जातीयवादी पक्ष करत आहेत. आंबेडकरी समाजाचा निवडणुकीत फक्त वापर करून घेतला जातो. मात्र सत्ता येताच त्याला सत्तेतून दूर ठेवले जाते. दलीत, मुस्लिम, मसणजोगी, नाथपंथी डवरी गोसावी, गोंधळी, नाभिक, मरीआईवाले अशा अनेक समाजाचे प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत.
जातीयवादी पक्षांना नेस्तनाबूत करून वंचित, मागासवर्गीय, अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारास पाठिंबा देणार असून याबाबत सर्व समाजघटकांशी एकत्र चर्चा करून लवकरच भूमिका ठरवणार असल्याचे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले.
याबाबत मी सांगोला येथे वारंवार आंदोलने केली. मात्र जिल्हा आणि राज्यपातळीवरील नेते समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील नेत्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. निवडणुका तोंडावर आल्या की गाजर दाखवले जाते. निवडणुका संपल्या की या वंचित घटकांना बेदखल केले जाते. अशा राजकीय नेत्यांचे खरे रूप वंचित समाजाने ओळखले आहे. त्यामुळे सांगोला विधानसभा निवडणुकीत अशा पक्षांवर बहिष्कार घालून प्रागतिक, पुरोगामी विचार घेऊन राजकारण करणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांना उघडपणे मदत करणार असल्याचे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी म्हटले आहे.
लवकरच भूमिका ठरवणार : ठोकळे
तालुक्यातील नेत्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले असले तरी ते ज्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत त्या पक्षांची विचारधारा आंबेडकरी आणि वंचित घटकांना रूचणारी नाही. आमचा विरोध व्यक्तींना नसून पक्षांच्या विचारधारेला विरोध आहे. त्यामुळे अशा जातीयवादी पक्षांना सहकार्य न करण्याची भूमिका वंचित, दलीत, मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाने एकत्रितपणे घेतली आहे.
जातीयवादी पक्षांना नेस्तनाबूत करून वंचित, मागासवर्गीय, अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारास पाठिंबा देणार असून याबाबत सर्व समाजघटकांशी एकत्र चर्चा करून लवकरच भूमिका ठरवणार असल्याचे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले.