ताजे अपडेट
Trending

सरकार सामाजिक विषमतेला खतपाणी घालत आहे : बापूसाहेब ठोकळे

प्रजासत्ताकदिन तोंडावर आला तरी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश नाही

Spread the love

“राजकारण करण्यासाठी लाडकी बहीण योजना सरकारने आणली पण या बहिणींच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? शिक्षणाची जबाबदारी सरकारची नाही का? सरकारकडे अनुदानासाठी पैसा नाही, विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. विद्यार्थ्यांना आपण देशाचं भविष्य म्हणतो पण त्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडे पैसा नाही, ही लाजिरवाणी बाब आहे”, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केली.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
२६ जानेवारी रोजी देशाचा प्रजासत्ताक दिन प्रत्येक शाळेत उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत झेंडावंदन केले जाते आणि यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या गणवेशात बोलवले जाते. मात्र प्रजासत्ताकदिन तोंडावर आला तरी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश नाही. सरकार सामाजिक विषमतेला खतपाणी घालत आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केली आहे.

मागील दहा दिवसांपूर्वी उदगीर येथे शाळेत जायला गणवेश नाही म्हणून एका गरीब विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने व्यथित झालेल्या पित्यानेही आत्महत्या केली. पुरोगामी महाराष्ट्र राज्यात घडलेली ही घटना चीड आणणारी आहे. 

बापूसाहेब ठोकळे म्हणाले की,
विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार असलेले गणवेश काही अपवाद वगळता विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची दुसरी मुदत पाळण्यात राज्य सरकारला यश आलं नाही.

राज्यातील महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत गेल्यावर्षी महाराष्ट्रात ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना आणली.

महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश हा एका रंगाचा आणि एकसमान असतील असा आमचा उद्देश असल्याचं सरकारने सांगितलं होतं. यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला. परंतु शाळा सुरू होऊन आता पाच महिने उलटले तरी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारचा गणवेश मिळालेला नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. मागील दहा दिवसांपूर्वी उदगीर येथे शाळेत जायला गणवेश नाही म्हणून एका गरीब विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने व्यथित झालेल्या पित्यानेही आत्महत्या केली. पुरोगामी महाराष्ट्र राज्यात घडलेली ही घटना चीड आणणारी आहे.

जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. खरं तर सरकारने निश्चित केलेला हा गणवेश शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित होता.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेश परिधान करून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह असतो. परंतु आता तर प्रजासत्ताक दिन तोंडावर आला तरी विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात किंवा आपल्या घरातील कपड्यांमध्ये शाळेत जावं लागणार आहे.

यापूर्वी शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश ठरवला जात होता आणि शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात होता. परंतु 8 जून 2023 रोजी राज्य सरकारने पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगत शासन निर्णय जारी केला.

राज्यात शाळांमध्ये उद्भवलेली ही परिस्थिती म्हणजे आर्थिक विषमतेचं प्रतिबिंब उमटलेलं दिसेल अशी खंत ठोकळे यांनी व्यक्त केली.

दारिद्र्याने गांजलेल्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी गणवेश हाच नवीन ड्रेस असतो. मात्र अनेक वर्षांनी यंदाचा प्रजासत्ताक दिन गणवेशाशिवाय साजरा होणार आहे. अनेक विद्यार्थी रंगीबेरंगी पोशाखामध्ये कार्यक्रमात येतील. गरीब कुटुंबातली मुलं फाटकेतुटके कपडे घालून येतील. श्रीमंत मुलं जरा उंची पोशाख करून येतील. यातून आर्थिक विषमतेचे प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला दिसणार आहे.

आतापर्यंत दरवर्षी शालेय स्तरावर गणवेश खरेदी केली जात होती. ही पारंपरिक पद्धत मोडीत काढत सरकारने राज्यस्तरीय पातळीवर एकसमान गणवेश असावा असा निर्णय घेतला.

यासाठी सरकारने कंत्राटी पद्धतीवर कापड विकत घेऊन स्थानिक महिला बचत गटांद्वारे गणवेश शिवून दिले जातील अशी प्रक्रिया ठरवली. परंतु अद्याप शाळांपर्यंत गणवेश पोहचलेलेच नाहीत.

“राजकारण करण्यासाठी लाडकी बहीण योजना सरकारने आणली पण या बहिणींच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? शिक्षणाची जबाबदारी सरकारची नाही का? सरकारकडे अनुदानासाठी पैसा नाही, विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. विद्यार्थ्यांना आपण देशाचं भविष्य म्हणतो पण त्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडे पैसा नाही, ही लाजिरवाणी बाब आहे”, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका