
चर्चा तर होणारच/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला विधानसभा मतदारसंघात ३१ उमेदवार असले तरी निवडणुकीचे खरे चित्र ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी अपक्षांची मनधरणी करण्यास सुरुवात केली असून, त्यात कितपत यश येते यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. अशातच बाबासो गणपत देशमुख नावाचे अपक्ष उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय ट्विस्ट निर्माण झाले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आम. शहाजी पाटील ,शेतकरी कामगार पक्षाचे डॉ.बाबासाहेब देशमुख, शिवसेना उबाठाचे दीपकआबा साळुंखे-पाटील या प्रमुख उमेदवारा व्यतिरिक्त अन्य २८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये बहुतांश उमेदवार अपक्ष आहेत. या अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षातून प्रयत्न सुरू आहेत.
मागील निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास शहाजी पाटील व दिपकआबा साळुंखे दोघे एकत्र असताना शहाजीबापूं पाटील अवघ्या ७६८ मतांनी निवडून आले होते. आता शहाजीबापू व दिपकआबा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून शेकाप एकसंघ आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
शेकापच्या मतविभागणीचा डाव
शेकापची मते विभागली जावी यासाठी विरोधकांनी रणनीतीचा भाग म्हणून आलेगाव ता.सांगोला येथील बाबासो गणपत देशमुख या अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केला आहे. सध्या तो उमेदवार नॉट रिचेबल असून, शेकापच्या उमेदवाराचे नाव बाबासाहेब देशमुख तर अपक्ष उमेदवाराचे नाव बाबासो देशमुख असे आहे. या नाम साधर्म्यामुळे शेकापला काहीअंशी फटका बसू शकतो असे चित्र आहे.
अफवांचे पीक जोमात
महाविकास आघाडीतील शेकापक्ष व शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षाच्या नेत्यानी सांगोला मतदारसंघा वर दावा केला आहे. शेकापचे नेते हा मतदारसंघ आमचा पारंपारिक असून तो आमच्याकडेच रहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. तर शिवसेना उबाठा गटाचे नेते मागील निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने ते यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा वाद येत्या चार तारखेपर्यंत न सोडविल्यास या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अटळ असल्याचे दिसून येते. असे असताना सांगोला मतदार संघात कालपासून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेऊन शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा यासाठी दबाव तंत्र सुरू असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत शेकापच्या सूत्राकडून असे कोणतेही दबावतंत्र नसून महाविकास आघाडी कडून जागा सुटो अथवा न सूटो शेतकरी कामगार पक्ष ही निवडणूक स्वबळावर पूर्ण ताकतीने लढविणार असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले.
उमेदवारी दाखल केलेल्या दोन शिवसेनेच्या उमेदवारात बंद दाराआड वाटाघाटी,चर्चा सुरू असल्याच्याही अफवा दिवसभर सुरू होत्या. परंतु यातही काही तथ्य नसल्याचे दोन उमेदवारांच्या गोटातून सांगण्यात आले.
तिरंगी लढत
विद्यमान आम. शहाजी पाटील ,शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख व शिवसेना उबाठाचे दीपकआबा साळुंखे पाटील अशी तिरंगी लढत होणार असून महा विकास आघाडीचे दोन उमेदवार एकमेका विरुद्ध उभे ठाकले आहेत.
मागील निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास शहाजी पाटील व दिपकआबा साळुंखे दोघे एकत्र असताना शहाजीबापूं पाटील अवघ्या ७६८ मतांनी निवडून आले होते. आता शहाजीबापू व दिपकआबा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून शेकाप एकसंघ आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.