“त्या” दोघा नेत्यांविषयी विश्वासाहर्ताच नसल्याने शेकापला पाठिंबा
अतुल पवार यांच्याशी खास बातचीत
सांगोला / डॉ.नाना हालंगडे
निष्ठावंताची चेष्टा आणि गद्दारांना प्रतिष्ठा आली आहे. ज्यांच्याकडे छक्के पंजे त्यांचीच आता हवा आहे. पण तालुक्यात विकासाच्या बाबतीत यांना काहीच देणेघेणे नाही. याच वृत्तीना मूठमाती देण्यासाठी मी या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जाहीरपणे पाठिंबा देत असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी दिली. अतुल पवार यांनी शेकापला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते “थिंक टँक”शी बोलत होते.
अतुल पवार म्हणाले की, “मी जिल्हा परिषद सदस्य असताना सभापतीच्या निवडणुकीत अवघ्या १ मताने पडलो होतो. त्याच वेळी याच दोन्ही सेनेच्या उमेदवारांनी बराच खेळ केला होता. अशा या नेत्यांविषयी विश्वासाहर्ताच नाही. जो तो स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठीच तालुक्यात राजकारण करीत आहे. त्यामुळे यांच्याकडून तालुक्याच्या विकासाचे काय धोरण घेवून बसलाय? हे दोघे संधीसाधू राजकारणी आहेत. त्यातच तालुक्यात साडेसात वर्ष राजकारण करीत असताना अनेक गोष्टी अनुभवल्या. आजपासूनच मी जाहीरपणे पाठिंबा दिला असून, कामालाही लागलो आहे.
यश मिळवायचे असेल तर आक्रमकपणा हवाच. मी कोणताही राजकीय वारसा नसताना २०१७ साली पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीत एखतपूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली. याचवेळी सर्वचजण एकत्र असताना त्यांच्या एका बलाढ्य उमेदवाराला अस्मान दाखवित ६००७ मतांनी विजयी मिळविला होता. याचवेळी एखतपूर अन् वाकी (शिवणे) पंचायत समिती गणातील दोन उमेदवारही निवडून आणले होते.
कोण आहेत अतुल पवार?
अतुल पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय संपादन केला त्यावेळेस ते बापू गटाचे समर्थक होते. दरम्यानच्या काळात राज्यातच वारे फिरल्याने त्यांना भाजपाने सांगोला तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. पण सध्याचे गलिच्छ राजकारण पाहता,त्यांनी त्याही पदाच्या राजीनामा देत शेकापला या निवडणुकीत जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे.
प्रत्येक निवडणूक आली की एकमेकांची जिरवाजिरविची भाषा करणारे पक्ष, नेते आणि गटातटाच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीतही सांगोला तालुका अडकला आहे. एकमेकांची राजकीय अस्मिता टिकविण्यासाठी खुमखुमीच्या वाफेवर सांगोल्याच्या विकासाचे इंजिन धावत असल्याचा आभास हे नेतेमंडळी करीत आहेत. रस्ते, गटारीच्या पलीकडे फारतर जादाची टक्केवारी मिळवून देणारं एकाद दुसरं सुशोभीकरण सोडलं तर विकासाच्या बाबतीत सांगोलेकरांची पाठी कोरीच आहे.
याच वृत्तीना कायमची मूठमाती देण्यासाठी मी शेकापच्या दमदार नेत्यांचे काम बघून पाठिंबा देत असल्याचे अतुल पवार म्हणाले.
प्रभावी जनसंपर्क
अतुल पवार हे सांगोला तालुक्यातील मेथवडे गावचे हे सुपुत्र आहेत. एक चारित्र संपन्न युवक, मोठे संघटन असलेला प्रतिभाशाली नेता असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. तालुक्याच्या राजकारणात येत असताना यांनी डायरेक्ट जिल्हा परिषद निवडणुकीत २०१७ साली उडी घेत आपल्या कामाने दहशत माजविली होती. त्याचवेळी त्यांनी राज्यात विजयाचा विक्रम केला होता. आपल्या गटातील दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार ही विक्रमी मतांनी विजयी केले होते.
अतुल पवारांमुळे ताकद वाढणार
अतुल पवार हे एकतपुर गटामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे त्या भागात शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढली आहे.