अजित पवारांना प्रकाश आंबेडकर आणि केसीआरची भीती?
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे
राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आज झालेल्या भव्य मेळाव्यात वंचित बहुजन आघाडी आणि भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील कडव्या आव्हानाची जणू भीती व्यक्त केली आहे. निवडणुकीपूर्वीच अजित पवार हे प्रकाश आंबेडकर आणि केसीआर यांना घाबरले आहेत का? असा सवाल सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. (NCP Leader Ajit Pawar is afraid of Prakash Ambedkar and KCR even before the elections? Such a question is being expressed on social media.)
आपले संख्याबळ दाखविण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाने मुंबईत भव्य शक्तिप्रदर्शन केले. यावेळी अजित पवार यांचे जोरदार भाषण झाले. या भाषणात अजित पवार यांनी शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. वरिष्ठ नेत्यांनी आता थांबायला हवे. आम्हाला आशिर्वाद देऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे असे आवाहन केले.
आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत ७१ च्या पुढचा आकडा पार केला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत ७२ पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल अशा आशावाद व्यक्त केला. हे सांगत असतानाच या भाषणात अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीबाबत भाष्य केले. (Prakash Ambedkars Vanchit Bahujan Aghadi)
प्रकाश आंबेडकर आणि केसीआरची भीती
मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) तसेच भाजप (BJP), शिवसेनेला (Shivsena) घाम फोडला होता. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी भरघोस मते घेतली. या मतांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. भाजप, शिवसेनेलाही मोठा फटका बसला. त्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा झंझावात महाराष्ट्राने पाहिला. आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करून पहिला धक्का दिला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल (Congress Leader Venugopal) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी यांच्या सोबत प्रकाश आंबेडकर यांची भेट घडवून आणून वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस दिसत आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीचा अंदाज आल्याने अजित पवारांनी भर सभेत या पक्षाचे आपल्यापुढे आव्हान असल्याचे जणू कबूल केले आहे.
बीआरएसचीही धास्ती?
के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर (K Chandrashekhar Rao KCR) यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीने (BRS Party in Telangana state) महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेडमध्ये या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवड्यात के चंद्रशेखर राव यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक मातब्बर नेत्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. अनेकजण पक्षात आलेही आहेत.
मागील महिन्यात तेलंगणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी के चंद्रशेखर राव यांनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते उद्घाटन केले होते. त्यावरून आगामी काळात बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती आणि वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकते असाही कयास बांधला जात आहे.
सर्वांची ताकद एक होऊ शकते!
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवण्याच्या मानसिकतेत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, केसीआर यांची भारत राष्ट्र समिती आणि सोबतीला एमआयएमही एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको. याचे कारण म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम यांची युती होती. तेच चित्र महाराष्ट्रातही दिसू शकते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या दोन्ही पक्षांना गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांना चिंता?
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित ताकद निर्माण झाल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त होऊ शकतो. कारण अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भक्कम संघटन आहे. अजित पवार हे पॉलिटिकल बार्गेनिंगमध्ये वाकबगार असल्याने राष्ट्रवादीला जास्त जागा सुटू शकतात. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा बहुजन वर्गातील जास्त असल्याने आणि त्यालाच वंचित बहुजन आघाडी सुरुंग लागेल अशी स्थिती असल्याने अजित पवार यांनी हे विधान केले असावे असे दिसून येते.
“बी टीम”चे होऊ शकते भांडवल
मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, भाजपला जोरदार टक्कर दिली होती. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचे वातावरण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते. त्यात अजित पवारही आघाडीवर होते. आता अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत गेल्याने “बी टीम” चा मुद्दा अजित पवार यांच्या अंगलट येवू शकतो. वंचित बहुजन आघाडी हा मुद्दा नेटाने पुढे आणू शकते. त्याचा वंचित बहुजन आघडीलाच फायदा होऊ शकतो.
असे असले तरी आगामी काळात कोणत्या पक्षांच्या कोणासोबत युत्या, आघाड्या होतात त्यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.
हेही वाचा