ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी

सांगोलेकरांनो सावधान, लम्पी त्वचा आजार फैलावतोय

Spread the love

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
लम्पी त्वचा आजार प्रामुख्याने चावणारे कीटक उदाहरणार्थ स्टोमोक्सिस, क्युलीकॉइड्स, ग्लोससिनिया, घरमाशीमुळे पसरतो. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यावर अचानक त्वचेवर गाठी येऊ लागतात. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधून त्वरित उपचार करावेत.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागांत जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजार (लम्पी स्कीन डीसिज) दिसून येत आहे. लम्पी त्वचा आजार हा सर्वप्रथम झांबिया देशामध्ये १९४९ रोजी आढळून आला. भारतामध्ये सर्वप्रथम ओडिशा राज्यात २०१९ मध्ये हा आजार आढळून आला. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यात आजाराचा प्रसार होत गेला. हा आजार त्वचेचा वाटत असला तरी तो सर्व अवयवांचा आजार आहे. प्रामुख्याने गाय, बैल, वासरे, म्हशींमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. इतर जनावरांना तसेच माणसांना या आजाराची बाधा होत नाही. कॅप्रीपॉक्स वर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो, आजाराचा उद्रेक हा गंभीर तसेच सर्व शरीरव्यापी असतो. या आजारामध्ये मृत्युदर जरी कमी असला तरी जनावरांच्या शरीराची भरपूर हानी होऊन पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. सर्व वयाची गोवर्गीय आणि म्हैस वर्गीय जनावरांमध्ये हा आजार दिसतो.

शहाजी पाटील हे शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”

*१]* मोठ्या जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये आजार जास्त दिसतो. जी जनावरे या आजारामुळे बाधित होऊन ठीक होतात त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते, त्यांना कमीतकमी पुढील ३ महिने हा आजार होत नाही. संकरित जनावरांमध्ये हा आजार होण्याची शक्यता देशी जनावरांपेक्षा जास्त असते.
*२]* या आजारामध्ये मृत्युदर जरी कमी असला तरी आर्थिकदृष्ट्या होणारे नुकसान खूप असते. कारण जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर व्रण येतात. सर्वसाधारण शरीरयष्टी कमकुवत होते, जनावरे विकृत दिसतात. त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य कमी होते.

काकी : वंचित, उपेक्षितांची माता
*३]* या आजारामुळे दूध आणि वीर्य उत्पादन घट येते. नर जनावरांमध्ये तात्पुरते किंवा कायमचे वंध्यत्व येऊ शकते. रोगकारक विषाणू बाधित जनावरांच्या वीर्यामध्ये जिवंत राहतो. अशा बाधित जनावरापासून मादी गाभण राहिल्यास त्यापासून जन्मणाऱ्या वासरामध्ये या आजाराची लक्षणे जन्मापासूनच दिसतात._
*४]* वासरांमध्ये बाधित जनावराचे दूध पिल्यामुळे किंवा कासेवरील जखमांपासून आजाराची लागण होऊ शकते. या आजारामुळे गोवंशामध्ये यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या आढळून आल्या आहेत.

गणेश संपूर्ण आरती आणि बरंच काही

*प्रसाराची कारणे*

*[अ ]आजारी जनावरांशी संपर्क*
*१]* जनावराने विषाणू बाधित झालेले पाणी पिल्यानंतर किंवा बाधित झालेल्या जनावराच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होऊ शकतो.
*२]* आजारास कारणीभूत ठरणारा विषाणू बाधित जनावराच्या अश्रूमध्ये, नाकातील स्त्रावामध्ये, वीर्यामध्ये तसेच दुधामध्ये देखील आढळून येतो.

एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी द्या; रामदास आठवलेंची मागणी

*[ब ] चावणाऱ्या माश्या आणि डास*
*१]* आजार मुख्यत्वे चावणारे कीटक, उदाहरणार्थ स्टोमोक्सिस, क्युलीकॉइड्स, ग्लोससिनिया आणि घरमाशी यामुळे पसरतो.
*२]* उष्ण व दमट वातावरण हे माश्यांच्या प्रजननासाठी पोषक असते. याच काळामध्ये आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता जास्त असते. तुलनेने थंड वातावरणामध्ये रोगाचा प्रसार कमी होतो.

समता, स्त्रीस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद मांडणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी!

*आजाराचा प्रसार*
*१]* वाहक माश्यांनी चावा घेतल्यानंतर आजाराचे विषाणू रक्ताद्वारे सर्व शरीरात पसरून जनावरांना ताप येतो. नंतर हा विषाणू त्वचेमध्ये जाऊन त्वचेचा दाह करून तेथे गाठी तयार होतात.
*२]* हा आजार शरीरभर पसरण्यासाठी एकदा विषाणू शरीरात गेल्यानंतर साधारणपणे २ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागतो.

*लसीकरण*
सध्या या आजारावर योग्य लस उपलब्ध नसली तरी शेळी किंवा मेंढीच्या देवी आजाराविरुद्ध वापरण्यात येणारी लस प्रभावी ठरू शकते असे दिसून आले आहे. सदर लसीकरण आणि उपचार नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत.

*आजाराची प्रमुख लक्षणे_*
*१]* गंभीररीत्या बाधित झालेल्या जनावरांमध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये आठवडाभर राहणारा ताप, चारा खाणे पाणी पिणे कमी किंवा बंद होते, कधी कधी अश्रू गाळणे, लाळ गाळणे, नाकातील स्राव आणि पायांची कमजोरी अशी लक्षणे आढळून येतात. त्यानंतर अचानक त्वचेवर गाठी येऊ लागतात.
*२]* बऱ्याचदा पहिल्यांदा अशा गाठी मागच्या दोन पायांमधील त्वचेवर दिसतात. आलेल्या गाठी सर्वसाधारणपणे १ ते ४ सेंमी मोठ्या, गोल, वरील भाग सपाट असणाऱ्या आणि कठीण असतात.
*३]* गाठीवरील भागातील केस शेवटपर्यंत उभे राहणारे असतात. या गाठी काही जनावरांमध्ये कमी तर काहींमध्ये शेकड्याने आढळून येतात.
*४]* नाकातील श्लेष्मल त्वचेवर व्रण निर्माण होऊन चिकट स्राव वाहू लागतो. कधी कधी नाकातील श्लेष्मल त्वचेवर होणाऱ्या बदलामुळे श्वसनास अडथळा येऊन घोरण्याचा आवाज येऊ शकतो.
*५]* तोंडातील श्लेष्मल त्वचेवर व्रण निर्माण होऊन लाळ वाहू लागते, डोळ्यातील श्लेष्मल त्वचेवर गाठी येऊन सतत अश्रू वाहतात. जनावरांचे पाय सुजतात.
*६]* बऱ्याच जनावरांमध्ये उपचार केल्यानंतर आजाराच्या गाठी लुप्त पावतात. काहींमध्ये त्या कायम राहतात. नंतर खूपच टणक होतात. तर कधी आपोआप गळून पडून व्रण निर्माण करतात. बाधित झालेल्या त्वचेजवळच्या लसिका ग्रंथी सुजलेल्या आढळून येतात. गाठीच्या वरील त्वचा गळून जखमा निर्माण होऊ शकतात. अशा जखमा खूप दिवस बरे होत नाहीत आणि कधी कधी जवळच्या जखमा एकत्र होऊन मोठी जखम तयार करतात. अशा जखमांमध्ये अळ्या होतात.
*७]* आजारातून बरे होण्यासाठी साधारणपणे ४ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागतो.
*८]* गाभण गाईंमध्ये या आजारामुळे गर्भपात होऊ शकतो. आजारामध्ये मृत्यू, शक्यतो श्वसनास अडथळा आल्यामुळे किंवा फुफ्फुसाच्या दाहामुळे होऊ शकतो.

*उपचार*
*१]* सध्या तरी या आजारावर थेट उपाययोजना नाही, परंतु लक्षणे कमी करण्यासाठी प्रतिजैविके, ज्वरनाशक, अँटीहिस्टामिनिक औषधे द्यावीत.
*२]* आजार प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पूरक जीवनसत्त्वे जसे की अ, ड ही द्यावीत.
*३]* त्वचेवरील जखमांसाठी अँटीसेप्टिक / फ्लाय रेपेलेंट स्प्रेचा वापर करावा.
*४]* जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा.
*५]* जनावरांच्या तोंडात व्रण असतील तर पोटॅशिअम परमँगनेटच्या पाण्याने धुऊन बोरोग्लिसरीन लावावे.

*तातडीचे उपाय*
*१]* बाधित जनावरांना तत्काळ इतर जनावरांपासून वेगळे करावे.
*२]* बाधित व निरोगी जनावरांना एकत्र चरण्यास सोडू नये.
*३]* साथ आलेल्या भागातून जनावरांची खरेदी विक्री करून नये.
*४]* आजारी जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य, वाहन, परिसर सोडिअम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावा.
*५]* गोठ्यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्याच्या परिसरात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आजाराचा प्रसार करणाऱ्या कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, एक लिटर पाण्यामध्ये ४० मिलि करंज तेल, ४० मिलि नीम तेल व १० ग्रॅम साबण मिसळून द्रावण तयार करावे. दर तीन दिवसांनी जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात फवारावे.
*६]* जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधून त्वरित उपचार करावेत._

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका