डॉ. आंबेडकरांनी आजच्याच दिवशी उभारला अस्पृश्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष
नागपूरातील ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेस परिषदेला ९० वर्षे पूर्ण
१९१९च्या सुधारणा कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी ब्रिटीश वसाहतीमध्ये संविधानिक सुधाराच्या अभ्यासाकरिता आणि भारतातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता ब्रिटीश सरकारने १९२८ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षेत नेमलेल्या सात सदस्यीय ‘इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन’ला सहकार्य देण्याकरीता केंद्र सरकारच्या अखिल भारतीय समिती शिवाय प्रत्येक प्रांतिक विधी मंडळाने आपापली समिती नेमली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधीमंडळाचे सभासद असल्यामुळे मुंबई प्रांतिक समितीवर ३ ऑगस्ट १९२८ रोजी इतर सभासदांबरोबर डॉ. आंबेडकरांची सुध्दा निवड झाली. ‘व-हाड व मध्यप्रांता’तील विधान परिषदेचे सभासद व तत्कालिन नेते श्री. गणेश आकाजी गवई आणि श्री. लक्ष्मण कृष्णाजी ओगले यांची इतर सभासदांसह व-हाड प्रांतातील प्रतिनिधींची कमिटी नेमण्यात आली. मध्यप्रांतातील दलित वर्गाच्या प्रतिनिधींनी २४ फेब्रुवारी १९२९ रोजी सी. पी. (मध्यप्रांत) डिप्रेस्ड क्लास असोशिएशन व सी.पी. डिप्रेस्ड क्लास कॉन्फरन्स नागपूर यांच्या वतीने इंडियन स्टॅच्युटरी कमिशनला निवेदन पाठविले.
अशाप्रकारे देशभरातून विविध प्रांत विधीमंडळातील अस्पृश्य वर्गाच्या नेत्यांनी देशाच्या भावी राज्यघटनेतील त्यांचे नागरी हक्क व घटनात्मक संरक्षणाकरिता ‘सायमन कमिशन’ पुढे आपली साक्ष आणि निवेदने नोंदवून आपल्या राजकीय मागण्या ब्रिटीश सरकारजवळ उघडपणे मांडल्या. ‘सायमन कमिशन’च्या अहवालातील शिफारशीबाबत दलित समाजाची प्रतिक्रिया जाणणे आणि भावी ध्येयधोरणाची आखणी करणे, त्याचप्रमाणे भारताच्या भावी राज्यघटनेची योजना गोलमेज परिषदमध्ये आखली जाणार होती. त्यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी पाठविणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर अस्पृश्य वर्गाचे अधिवेशन आयोजित करावे यावर ‘व-हाड व मध्य प्रांतातील’ तत्कालिन दलित नेत्यांचे एकमत झाले. त्याअनुशंगाने श्री. दशरथ पाटील आणि श्री.लक्ष्मण कृ. ओगले ( एम.एल.सी. अमरावती) यांनी मुंबईला जावून डॉ. आंबेडकरांची भेट घेतली. परंतु डॉ.आंबेडकरांना डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनच्या नावाखाली रावबहादूर एम. सी. राजा यांनी स्थापन केलेल्या संस्थेअंतर्गत अखिल भारतीय अस्पृश्य परिषद बोलावण्याचे मान्य नव्हते. त्यांच्या मते, ‘ही अशी संघटना आहे की त्या संघटनेचे केवळ पदाधिकारी आहेत, सभासद नाहीत. अस्पृश्य वर्गाला अशा नामधारी व बोगस संघटनेचा काहीच उपयोग नाही’. म्हणूनच या भेटीत नागपूरला होणारी परिषद ही ‘ऑल इंडीया डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेस कॉन्फरन्स’ या नावाखाली बोलावण्याचे निश्चित करावे लागले.
त्यानुसार ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेस कॉनफरन्स’चे नागपूर येथे कार्यालय स्थापन करण्यात आले. या परिषदेची धुरा सांभाळ्याकरीता तयार करण्यात आलेल्या स्वागत मंडळात प्रामुख्याने स्वागताध्यक्ष टी. सी. साखरे (नागपूर), उपाध्यक्ष दशरथ पाटील (बेला) , खजिनदार विश्राम सवाईथूल (नागपूर) तर सचिव म्हणून लक्ष्मण कृ. ओगले (एम.एल.सी. अमरावती) , हरदास एल.एन. (कामठी) , पी.के. भटकर (अमरावती) , शामराव जी . राहाटे (वडगाव) , एच. डी. बेहाडे (नागपूर) या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांनी दलित वर्गाच्या राजकीय कांतीला प्रथमतः चालना देणे तसेच त्यांच्या सामाजिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे याकरीता संघटीतपणे डॉ. आंबेडकरांना बळ दिले. या परिषदेसाठी कोणाकोणाला बोलवावे आणि परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली व्हावी यासाठी स्वागत समितीचे एक सचिव हरदास एल. एन. यांनी अस्पृश्य चळवळीचे तत्कालिन प्रमुख जेष्ठ नेते श्री. शिवराम जानबा कांबळे (पुणे), यांच्या स्वीकृतीकरीता दि. ०१ फेब्रुवारी १९३० रोजी पत्र लिहीले. त्यात ते frontard , ” … We shall feel obliged , if you kindly favour us before 15th February next with your views about the advisibility of holding such a Congress and name of the person , whom you would like to preside over it .” आणि श्री. शिवराम जा. कांबळे यांनी परिषदेच्या आयोजनाबद्दल आपल्या सदिच्छा व्यक्त करताना लंडनला होणा-या गोलमेज परिषदला बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बी. आर. आंबेडकर यांनाच पाठवावे असा सूचनावजा सल्लाही परिषदेच्या आयोजकांना दिला. ते पत्राच्या उत्तरात म्हटले की , “I am in receipt of your prited letter of 1 ” February 1930 and I am glad to read that you are holding shortly an All India Depressed Classes Congress ‘ at Nagpur. With regards to the Presidentship of the propose Congress. I suggest the name of Dr. Ambedkar and also that he should be sent to London as the representative of the Depressed Classes for the Round Table Conference …. “
भारतातील सर्व दलित पुढा-यांना एक दिवस अगोदर म्हणजे ७ तारखेलाच नागपूरात बोलावून घ्या असा सल्ला डॉ. आंबेडकरांनी परिषदेच्या प्रतिनिधींना दिला. डॉ. आंबेडकर मद्रास प्रांतातील कोझीकोडे (मलबार , केरळ) येथील इ. कानन यांना १ ऑगस्ट १९३० च्या पत्रात लिहीतात की, ” … In order to save time I propose to call a meeting of such of our leaders who choose to come on the 7t ” , a day before the actual meeting of the Congress and discuss the resolutions to be placed before it . I shall , therefore , be glad if you can manage to come on the morning of the 7th to Nagpur . “दरम्यान, २५ मे १९३० रोजी श्री. लक्ष्मणराव ओगले . ( एम.एल.सी. मध्यप्रांत व व-हाड) यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा येथे भरलेल्या मध्यप्रांत व व-हाड महाड परिषदेत गोलमेज परिषदेला डॉ. आंबेडकरांना सरकारने पाचारण करावे तसेच नागपूरला भरणा-या अ.भा. दलित काँग्रेसला पाठींबा देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव पारीत करण्यात आले. यातून तत्कालिन वर्तमानस्थिती बाबत कार्यकर्त्यांमध्ये जागृती करुन परिषदेच्या वातावरणाची निर्मिती करण्यात आली.
दी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेस नागपूर येथून दि. २० जून १९३० रोजी परिषदेच्या आयोजना संदर्भात कार्यालयीन पत्रकाद्वारे प्रकाशित केले व देशातील दलित वर्ग प्रतिनिधींनी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. परिषदेकरीता मुंबई येथून डॉ . आंबेडकर (एम. एल. सी.) यांच्यासह यूपी लखनऊ येथून रावसाहेब अँड . रामचरण ( एम.एल. सी.), अॅड. शीवदयासिंह चौरसिया, मद्रासचे रावसाहेब व्ही. आई. मुनिस्वामी पिले. ई. कानन, बंगालचे अँड. एम. बी. मलिक (एम. एल. सी.) तर पुणे येथून सौ. गुणाबाई गडेकर, श्री. पा.ना. राजभोज या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. परिषदेचे आयोजन ‘व्यंकटेश थिएटर ‘ (श्याम टॉकीज) नागपूरात करण्यात आले. अध्यक्ष म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची राहण्याची व्यवस्था राज्यपाल भवना शेजारील अब्दुलभाई खारकांच्या बंगल्यात करण्यात आली होती. परंतु त्यांनी एकटे वेगळे राहण्याचे नाकारले आणि परिषदेला आलेल्या इतर पुढा-यांबरोबरच ते स्वत : कॉटन मार्केटमधील शामयानात राहिले हे विशेष!
या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय स्तरावरील पहिल्यांदा दलित महिला परिषदचे अधिवेशन स्वतंत्ररित्या घेण्यात आले. अ.भा. दलित महिला परिषदेच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या सुज्ञ समाज सुधारीका सौ. गुणाबाई गडेकर आणि स्वागताध्यक्ष म्हणून अस्पृश्य चळवळीचे तत्कालिन प्रमुख नेते श्री. शिवराम जानबा कांबळे यांची कन्या सौ. शेवंताबाई लक्ष्मणराव ओगले ( अमरावती ) या होत्या. श्रीमती शेवंताबाई लक्ष्मण ओगले यांनी तत्कालिन दलित स्त्रियांच्या समस्यांना डॉ. आंबेडकरांच्या वाचा फोडली आणि ‘स्त्री वर्गाने स्वसंरक्षणार्थ बौध्दीक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षणाचे धडे घेण्याची निकड आहे , असे प्रतिपादन केले . त्याचसोबत डॉ . आंबेडकरांच्या नेतृत्वावर दलित महिलांचा कसा विश्वास आहे हे खुद्द त्यांच्या उपस्थितीत बोलून दाखविले.
अखिल भारतीय पहिल्या दलित महिला परिषदेला संबोधन करतांना डॉ. बाबासाहेब आबेडकर म्हणाले , “नागपूर शहरात होत असलेली ही महिला परिषद ‘दलित समाजाच्या उत्थानाच्या चळवळीचा एक भाग आहे . विशेषत : ही सामाजिक व ऐतिहासिक चळवळ आहे. या चळवळीचे महत्व फार वेगळे आहे. या चळवळीच्या माध्यमाने माणुसकीला मुकलेल्या पण भारतात राहणा-या अस्पृश्यांच्या आंदोलनातील एक स्वतंत्र पान इतिहासात लिहल्या गेले आहे. ज्या समाज पुढा-यांनी या अधिवेशनाची धुरा सांभाळली आहे , त्यांनी स्त्री – वर्गाच्या सामाजिक कांतीला प्रथमत:च चालना दिलेली आहे. स्त्री वर्गानी सामाजिक जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्याकरिता संघटीत असे पाऊल आता उचलले आहे. त्यामुळे त्यांचे या समाजावर अनंत उपकार आहेत असे मी समजतो …. “
या अ.भा. पहिल्या दलित महिला परिषदेत ठिकठिकाणच्या महिला प्रतिनिधींनी सहभागी झाल्या होत्या. या महिला परिषदेच्या सचिव म्हणून नागपूरच्या सौ. तुलसाबाई बनसोडे पाटील, सौ. जाईबाई चौधरी व अकोल्याच्या सौ. काशीबाई मांडवधरे यानी काम पाहिले. या दलित महिला परिषदेत स्त्री उत्थानाच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आलेत. शिवाय हयासोबतच सामाजिक, युवक व शिक्षणविषयक परिषदाही घेण्यात आल्या. सामाजिक परिषदचे अध्यक्ष पा.ना. राजभोज व स्वागताध्यक्ष दशरथ पाटील होते. युवक परिषदेचे अध्यक्षपद लखनौचे अँड. शीवदयासिंग चौरशिया व स्वागताध्यक्ष राघवेन्द्रराव बोरकर हे होते. या सर्व परिषदांच्या स्वतंत्र स्वागत समित्या नेमण्यात आल्या होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अत्यंत विस्तृतपणे तत्कालिन सामाजिक, शैक्षणिक, राजकिय व कायदेविषयक परिस्थितीवर उदबोधन केले. एकसंघ भारत हेच आमचे ध्येय होय ! अशी गर्जना करून त्यांनी भारतातील स्वराज्याचा प्रश्न त्यातील समस्येतील अटी, दलित वर्गासाठी संरक्षणात्मक तरतूदी, दलित वर्गाची सायमन कमिशनबाबत भूमिका, दलित वर्ग आणि स्वराज्य, दलित वर्ग आणि असहकार, दलित वर्गाचे संघटन आणि दलित वर्गाची उन्नती या महत्वपूर्ण घटनांवर आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून परिषदेला एक निश्चित दृष्टी प्रदान केली.
आपल्या समारोपात डॉ. आबेडकर म्हणतात की, “सद्गृहस्थांनो ! … ही आपली सभा शेवटची ठरणार नाही, तर आपल्या भव्य चळवळीची ती केवळ सुरूवात ठरावी आणि तिच्याद्वारा आपल्या लोकांना मुक्ती मिळून या देशात प्रत्येक व्यक्ती हे एक मूल्य – राजकीय, सामाजिक व आर्थिक मूल्य- मानण्यात येईल, अशी समाजरचना निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरेल, अशी मी आशा व्यक्त करतो…” या परिषदेत डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या ‘एक व्यक्ती हे एक मूल्य – राजकीय, सामाजिक व आर्थिक समता’ यावर आधारीत भारतीय समाजरचनेच्या निर्मितीची जबाबदारी भविष्यात स्वत : डॉ. आंबेडकरांनाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने पूर्ण करावी लागेल , ही त्यावेळी दलित नेते आणि खुद्द डॉ. आंबेडकरांना देखील पुसटशी कल्पना नसेल . १९३० च्या या अ.भा. दलित वर्ग काँग्रेस परिषदेत मांडलेले एकूण तेरा ठराव हे दलित वर्गाच्या स्वातंत्र्य दलित चळवळीला एक व्यापक दिशा देणारे ठरलेत , ज्यात अस्पृश्य वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण होण्याकरीता देशातील मध्यवर्ती आणि सर्व प्रांतीक कायदे मंडळात यथायोग्य प्रतिनिधित्व देणे आणि सरकारी नोकरीत योग्य प्रमाणात राखीव जागा या बाबींचा अंतर्भाव हिंदुस्थानच्या राज्यघटनेत करण्यात यावा ही प्रमुख मांडणी प्रथमत:च एकसंघपणे करण्यात आली.
या परिषदेतून प्रथमत:च देशातील दलितांच्या उन्नतीवर एवढया सखोलपणे एकत्रितरित्या विचारमंथन करण्यात आले . यातून हिंदूस्थानातील अस्पृश्य वर्गाची एक मध्यवर्ती अखिल भारतीय संघटना असणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रथमत च देशपातळीवर वर्कीग कमिटीची स्थापना करण्यात आली. हयामुळे दलित वर्गाची दलित वर्गाची भक्कम वैचारिक भूमिका तयार झाली , आधुनिक भारताच्या इतिहासात डॉ. आंबेडकर या नव्या नेतृत्वाचा उदय झाला. या परिषदेचे वैशिष्टय म्हणजे या परिषदेची फलश्रुती म्हणजे ब्रिटीश सरकारने या परिषदेची दखल घेतली आणि ६ सप्टेंबर १९३० रोजी भारतातील अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मद्रासचे दिवानबहादुर आर. श्रीनिवासन यांना ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली होण्या-या गोलमेज परिषदचे निमंत्रण दिले. त्यामुळे भारतातील पद्दलित वर्गाच्या दु : ख , दैन्य आणि दास्य डॉ. आंबेडकर व दिवानबहादुर आर. श्रीनिवासन यांना जगाच्या वेशीवर मांडता आले . तसेच गोलमेज परिषदेतून दलित वर्गाकरिता राजकीय हक्क व घटनात्मक संरक्षण खेचून आणलेत . हयामुळे ८ व ९ ऑगस्ट १९३० रोजी नागपूर येथे आयोजित ही अ.भा. दलित वर्ग काँग्रेस परिषद ही मूलत : दलित वर्गाला वर्तमानस्थितीत प्राप्त झालेल्या राजकीय हक्क व घटनात्मक संरक्षणाचा मुलभूत पाया असून तिचे भारतीय इतिहासात एक आगळे महत्व आहे. एवढेच नव्हे तर भारतील संविधानात अंर्तभूत केलेल्या तरतूदींची ती ब्लू प्रिंट आहे , असे म्हटल्यास वावगे ठरु नये. आज मात्र सर्व बाबतीत अनुकूलता असतांनाही दलित वर्गातील सक्षम नेतृत्व व ध्येयधोरणा अभावी तत्कालिन नेत्यांनी संघर्ष करुन प्राप्त केलेल्या राजकीय हक्क व घटनात्मक संरक्षणाला शाबूत ठेवून दलित वर्गाला न्याय देण्यात कमी पडत आहे. त्यामुळे ९१ वर्षापूर्वीची ही परिषद व तिची धुरा सांभाळणारे पहिल्या फळीतील निष्ठावंत प्रमुख पुढारी मंडळी विद्यमान अवस्थेत दिशाहिन व नेतृत्व विहीन झालेल्या दलित चळवळीला प्रेरणादायी ठरोत.
एवढेच म्हणावेसे वाटते, उष:काल होता होता काळरात्र झाली,
अरे ! पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
– अॅड. वैभव ओगले, नागपूर