माझ्या सर्कीट बापाची गोष्ट

प्रा. प्रसेनजित एस.तेलंग : जागतिक पितृदिन विशेष

Spread the love

बाबांचा जन्म कामगार वस्तीच्या काहीशा शहरी वाटणाऱ्या हिंगणघाटमधील. त्यामुळे शेती, माती, पिक, पाणी, बैलं, ढोरं, वासरं यांचा त्यांना दुरान्वयेही कधी संबंध आला नाही. जन्म, शिक्षण, नोकरी संसार आणि शेवट सारं एकाच गावात झालं. अंगात रग ठासून भरलेली. एकेकाळी आखाड्यात पहिलवाणी करून कुस्ती मारणारे, दांड पट्टा खेळणारे व इतरांना शिकविणारे. आखाड्यातील शिष्यपरिवार त्यांना ‘वस्ताद’ म्हणायचा आणि मित्र परिवार ‘राव’म्हणून ओळखायचा. वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी पोस्टात लागले, क्लास फोर म्हणून. बाबा आपल्या कामात फारच प्रामाणिक, दक्ष आणि नीटनेटके. बीनबुडाचं गाडगं बणून कधी जगताच आलं नाही त्यांना. १९६४-६५ ची गोष्ट असेल. बाबांचं वय असेल तेव्हा ३४-३५ चे. पोस्ट आॅफीसच्या क्लास फोरचे आयुष्य म्हणजे लखलखित दारिद्रय. 

बाबांचा स्पष्टवक्तेपणा आणि कोणाच्याही ताटाखालचं मांजर न होण्याच्या ताठ मानेच्या प्रवृत्तीमुळे असेल कदाचित त्यांच्या साहेबांशी त्यावेळी त्यांचे फारसे सूत जुळले नसावे. ते बाबांचा राग करायचे. घालून पाडून बोलायचे. एक दिवस बाबा पोस्ट आॅफीसमध्ये कदाचित वजन काट्यावर पार्सल मोजायचे काम करीत होते, आणि कुठल्याशा कारणावरुन पोस्ट मास्टर साहेबाबांनी बाबांचा जातीवाचक हिनत्वदर्शक उल्लेख करून त्यांना बोलले. बाबांच्या डोळ्यांत रक्त साकळून आले. हातातील वजनाच्या लोखंडी ब्लाकवरील पकड़ घट्ट झाली आणि ते धाडकन् साहेबांच्या तोंडावर फेकून मारले. रक्तबंबाळ साहेब आपले पुढचे दोन दात खाली गोळा झालेल्या रक्तात थारोळ्यात शोधत राहिले.

‘यूं आर सस्पेंड’ चा कागद हातात घेऊन दुसऱ्या दिवसापासून बाबा घरी. आतापर्यंत पोटापाण्याचा इतर दुसरा कोणताच उद्योग करावा न लागलेल्या बाबांना घरात आता खाण्याचे वांदे पाहावे लागू लागले. बाबा, आई,आठ-दहा महिण्यांचा माझा मोठा भाऊ आणि आणि रिकाम्या निस्तेज भांड्यांकडे पाहणारी करुणामयी चूल. काही दिवस सारे एकमेकांकडे पाहात दिवस ढकलू लागले.

अशावेळी आईने बाबांना माहेरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आई खेड्यावरची. लहानपणासून रानावनात कष्ट करून जगलेली. लग्नानंतर जंगतातल्या कामाला जाण्याची सवय मोडलेली. आता पुन्हा एकदा तिने आपला पदर कंबरेला खोचला. बाबांना घेऊन शेतशिवाराच्या कामाला जावू लागली. जन्मात बैलाचा कासरा हातात न पकडलेल्या बाबांना शेतातली नांगरणी,वखरणी, पेरणी, निंदण ही कामं जमेनात. कामावरचे इतर सहकारी शेतावरील कामं करतांना बाबांची तारांबळ पाहून त्यांना हिणवू लागले. काही मदतीला धावून येऊ लागले. पण एकूणच ‘दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही ‘अशी स्थिती झालेली.

कोर्टात केस सुरू होती आणि त्या सस्पेंड काळात आई-बाबांची वणवणही. खरं तर बाबांच्या आत्यंतिक स्वाभिमानी स्वभावामुळे ही अभावग्रस्तता त्यांच्या वाट्याला आलेली असल्याने जगण्यासाठी ढोर मेहणत करतांनाही त्याची खंत त्यांना नव्हती. ‘जातीवरून आपला कोणी अपमान करावा आणि तो आपण सहन करवा?’ शक्यच नव्हते त्यांना! कदाचित वर्ष दीड वर्ष कोर्टात केस चालली. ह्या वर्ष दीड वर्षाच्या काळातील त्यांची नोकरीविना झालेली परवड नेहमीच त्यांच्या अभिमानाचा विषय राहिली. आईसाठी मात्र बाबांचा हा शेतातील कामाचा विषय नेहमीच हसण्याचा विषय झाला होता. कधी हा विषय निघाला की ती म्हणायची, “अरे काहीच नव्हतं येत तुझ्या बापाला. साधं निंदता येत नव्हतं. मी माझे निंदायचे तास पूर्ण केले की तुझ्या बापाचे तास घ्यायची. साधा विळा हातात धरता येत नव्हता यांना.” बाबा चिडायचे.

बाबा नेहमी म्हणायचे, ” सत्याचा नेहमीच विजय होतो.” निकाल बाबांच्या बाजूने लागला. पुढील वीस वर्ष आहे त्याच पदावर कायम ठेऊन या काळात त्यांना कोणतेही प्रमोशन देण्यात येवू नये असे प्रशस्ती मेडल देऊन त्यांना कामावर परत घेण्यात आले. पुढे रिटायर्ड होण्याच्या दोन तीन वर्षापर्यंत ते पोस्टात मॅसेंजर म्हणूनच कार्यरत राहिले. त्यांच्यापेक्षा ज्युनियर लोकांना त्यांच्या समोर प्रमोशन मिळतांना अनेकदा ते पाहात होते,पण त्याची खंत मात्र त्यांच्या बोलण्यात मला कधी जाणवली नाही. कोर्टाचा निकाल घेऊन बाबा आॅफीसमध्ये आले. यावेळी कामावर रूजू करून घेतांना ओशाळवाणे हसून साहेबांनी बाबांना मस्टरवर सही करायला लावली तेव्हा साहेबांच्या तोंडातील पुढील दोन दातांची अनुपस्थिती लख्खन लक्षात आली आणि ताठ्याने बाबांनी मस्टरवर सही ठोकली- एस.एस.तेलंग.

– प्रा. प्रसेनजित एस.तेलंग

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका