ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

“महाराष्ट्र केसरी”साठी पै. शाहूराजे शशिकांत देशमुख यांची निवड

जवळ्याचे नाव राज्यस्तरावर, देशमुख कुटुंबीयांची चौथी पिढी कुस्तीत

Spread the love

नारायण बाबर, दादा गुरव, महादेव बुरंगे हे जवळा गावातील जुन्या काळातील पैलवान. त्यांनी जवळा गावात कुस्तीची मुहूर्तमेढ रोवली. नारायण बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पासाहेब देशमुख यांनी कुस्तीचे धडे घेतले. अप्पासाहेब देशमुख यांनी ही कुस्तीची परंपरा नेटाने पुढे नेली. जवळा गावात अरुण भाऊ घुले, सुरेश व्यवहारे यांच्यासारखे अनेक पैलवान तयार झाले.

थिंक टँक / नाना हालंगडे
सोलापूर जिल्हा हा “कुस्तीची खाण” म्हणून ओळखला जातो. असंख्य पैलवान घडविलेल्या या जिल्ह्यातील जवळा (ता. सांगोला) येथील देशमुख घराण्याचे कुस्ती क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. याच देशमुख घराण्यातील पैलवान शाहूराजे शशिकांत देशमुख यांची ६५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी गादी व माती विभागातून निवड करण्यात आली आहे. ही निवड जवळ्यासह सांगोला तालुक्यातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुंबई शहर तालीम संघाची निवड चाचणी घेण्यात आली. त्यात पै. शाहूराजे शशिकांत देशमुख आणि पै. साकेत शामराव यादव मुंबई शहर तालीम संघातून महाराष्ट्र केसरी गदेसाठी निवड करण्यात आली.

पै. शाहूराजे यांचा थक्क करणारा प्रवास
पै. शाहूराजे देशमुख ३ वर्षांपूर्वी धुळे येथे घेण्यात आलेल्या कुमार राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदाचा मानकरी होता. तो सध्या श्री. लक्ष्मीनारायण व्यायाम शाळेत वस्ताद श्री प्रकाश तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा कसून सराव करत आहे. रंगाने गोरा, जवळ जवळ सहा फूट उंचीचा शाहूराजे या कुस्ती स्पर्धेत चमकदार कुस्तीचा निकाल करुन सर्वाँना चकित करेल अशी आशा त्याचे वस्ताद श्री प्रकाश तनावडे यांनी या वेळी बोलून दाखवली. शाहूराजे बद्दल खुद्द आशा वाटते, असे ते म्हणाले. सध्या तो डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ कॉम्प्युटर येथे शिक्षण घेत आहे.

१२० कुस्तीगिरांतून झाली निवड
मुंबई शहर तालीम संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नुकतीच भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे पार पडली. या स्पर्धेत मुंबईतील जवळ जवळ १२० कुस्तीगिरांनी भाग घेतला होता. यामध्ये तो पहिला आला. त्याची निवड कोथरूड पुणे येथे दि.१० ते १४ जानेवारी जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी गादी व माती विभागात करण्यात आली.

ही चाचणी स्पर्धा तालीम संघाचे कार्याध्यक्ष श्री. संजय शेटे, उपाध्यक्ष श्री. शशिकांत देशमुख व सरचिटणीस श्री. प्रकाश तानवडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. पंच म्हणून श्री. अनंत शिंदे, श्री. रामचंद्र पाटील, श्री. बाळू काळे, श्री.अनिल साबळे, श्री. बाबाजी गुरव, श्री.प्रवीण डबडे, श्री. प्रकाश जाधव, श्री सुधीर पवार यांनी काम पाहिले.

जवळा गावाची कुस्तीची ऐतिहासिक परंपरा
नारायण बाबर, दादा गुरव, महादेव बुरंगे हे जवळा गावातील जुन्या काळातील पैलवान. त्यांनी जवळा गावात कुस्तीची मुहूर्तमेढ रोवली. नारायण बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पासाहेब देशमुख यांनी कुस्तीचे धडे घेतले. अप्पासाहेब देशमुख यांनी ही कुस्तीची परंपरा नेटाने पुढे नेली. जवळा गावात अरुण भाऊ घुले, सुरेश व्यवहारे यांच्यासारखे अनेक पैलवान तयार झाले.

पुढील काळात पैलवान शशिकांत देशमुख, श्रीकांत देशमुख, बाळासाहेब बुरंगे, विजयकुमार चिंचणे, नामदेव मेटकरी, तानाजी आगलावे, श्रीमंत आगलावे, बाळासाहेब सुदाम मागाडे, बबन मळगे असे असंख्य पैलवान तयार झाले.

सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात कुस्तीची खाण म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडील काळात कुस्तिकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. वरिष्ठ राजकीय लोकांची कुस्तीकडे पाहण्याची उदासीनताही याला कारणीभूत असावी. सांगोला तालुक्यात असंख्य कुस्तीगीर तयार व्हावे, तरुणांना व्यायामाची गोडी लागावी यासाठी सांगोला तालुक्यात व्यायामशाळा काढणार आहे. – पै. शशिकांत देशमुख

जवळा गावात २१ वर्षे कुस्तीची दंगल
पैलवान अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान शशिकांत देशमुख, श्रीकांत देशमुख यांनी २१ वर्षांहून अधिक काळ कुस्ती स्पर्धा भरविल्या. भारत – पाकिस्तान, भारत – इराण, भारत – इराक अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीची मैदाने देशमुख कुटुंबीयांनी स्वखर्चातून भरविली.

या कुस्ती स्पर्धेसाठी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार, हिंदकेसरी सतपाल, हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी दादू चौगुले, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंद केसरी आणि उप महाराष्ट्र केसरी सुनील साळुंखे, ऑल इंडिया चॅम्पियन राहुल आवारे, अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, हिंदकेसरी योगेश दोडके, हिंदकेसरी अमोल बराटे आदी अनेक नामवंत पैलवानांनी या स्पर्धेस हजेरी लावली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खा. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक राजकीय मंडळीनी या कुस्ती स्पर्धेच्या मैदानात भेट दिली आहे.

नारायणदेवाची जंगी यात्रा
अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान शशिकांत आणि श्रीकांत देशमुख यांनी मागील अनेक वर्षांपासून जवळा गावाचे ग्रामदैवत नारायणदेवाची जंगी यात्रा भरविली आहे. हत्ती, घोडे, उंट, झांज पथक, लेझिम पथक तसेच विविध वाद्यवृंदात श्री नारायण देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. याच यात्रेच्या निमित्ताने गावात भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येते.

अनेक पैलवान घडले
जवळा गावात देशमुख कुटुंबीयांनी कुस्तीच्या खेळाला राजाश्रय दिला. स्वखर्चातून त्यांनी जंगी कुस्ती स्पर्धा भरविल्या. या कुस्ती स्पर्धेतून असंख्य पैलवान तयार झाले. हा वारसा पुढे नेण्याचे काम देशमुख कुटुंबियातील तिसरी पिढी करताना दिसत आहे.

कुस्तीचे नेतृत्व
कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासोबतच कुस्तीला राजाश्रय मिळावा, कुस्तीगीरांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पैलवान शशिकांत आणि श्रीकांत देशमुख यांनी कुस्ती क्षेत्राशी संबंधित अनेक पदे भूषविली आहेत. श्रीकांत देशमुख यांनी सांगोला तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. शशिकांत देशमुख यांनी मुंबई तालीम संघाचे कार्याध्यक्ष पद, उपाध्यक्ष पद भूषविले आहे. सध्याही ते या पदांच्या माध्यमातून कुस्तीची परंपरा पुढे नेत आहेत. शशिकांत देशमुख हे भाजप किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका