न्या. रानडे आणि डॉ. आंबेडकर; सामाजिक जीवनाचे इतिहासपुरुष

मिलिंद मानकर यांची संडे स्पेशल स्टोरी

Spread the love

सामाजिक जीवनाचे आधारस्तंभ म्हणून न्या. महादेव गोविंद रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे. बाबासाहेबांनी जन्मशताब्दीला रानडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर पुणे शहरात विद्वत्ताप्रचूर भाषण केले होते. सामाजिक जीवनाचे इतिहासपुरुष ठरलेल्या या दोन महापुरुषांतील वैचारिक साम्य वाचा या ‘संडे स्पेशल स्टोरी’मधून.

भारताच्या सार्वजनिक जीवनात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने सन्मानाचे स्थान मिळविले आणि ज्यांची विचारधारा आजही प्रवाहित आहे असे दोन महापुरुष म्हणजे न्या. म.गो. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. रानडे यांनी एकोणिसावे आणि डॉ. आंबेडकरांनी विसावे शतक गाजविले. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला विद्वत्तेची स्वर्णीम किनार लाभली आहे. जुन्या पिढीत रानडे यांचे समकालीन तेलंग, टिळक, गोखले, भांडारकर या समाज पुरुषांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विसाव्या शतकात ते महान कार्य फारच थोड्या व्यक्तींनी केले. त्यात अग्रपूजेचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळविला.

न्या. महादेव गोविंद रानडे भारताचे सुपुत्र, थोर समाजसुधारक, उदारमनस्क अन् सात्त्विक वृत्तीचे देशभक्त होते. त्यांचे शैक्षणिक, संसदीय कार्य प्रचंड विस्तारले होते. १८ जानेवारी १८४८ रोजी त्यांचा जन्म झाला. याच सुमारास विद्यापीठ कायदा बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याला अनुसरूनच मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ साली करण्यात आली. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत रानडेंसह एकूण बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. १८६२ ला त्यांनी बी.ए. व त्यानंतर एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. एल्फिन्स्टन महाविद्यालयाशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. याच महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासावर एक निबंध लिहिला. येथेच ते इंग्रजी भाषेचे सहाय्यक प्राध्यापक बनले. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती बनले. १६ जानेवारी १९०१ रोजी त्यांचे निधन झाले. १९४२ साली त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी ‘सह्याद्री’ नियतकालिकाने एक खास विशेषांक काढला होता. दुसरीकडे आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांचा गुणगौरव करण्यासाठी ‘नवयुग’ विशेषांक १३ एप्रिल १९४७ रोजी प्रसिद्ध केला होता.

भिवा दुसरीत असतानाच रानडे यांचे निधन झाले. त्या दिवशी भिवाच्या शाळेला सुट्टी मिळाली. ‘रानडे कोण होते ? त्यांनी कोणते कार्य केले ? त्यांच्या निधनानिमित्त सुट्टी का मिळाली ? यासंबंधी त्यांना गंधवार्ता नव्हती.’ असे बाबासाहेब हे रानडे यांच्या जन्मशताब्दी उत्सवाप्रीत्यर्थ पुणे शहरात १९ जानेवारी १९४३ रोजी एका जाहीर सभेत म्हणाले होते. भाषण करण्याविषयी बाबासाहेबांना आग्रहाने निमंत्रित करण्यात आले होते. बाबासाहेबांचे हे भाषण त्यांनी केलेल्या अनेक भाषणात अतिशय महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक भाषणाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रानडे, गांधी आणि जीना’ नावाने ते पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. सुरुवातीला बाबासाहेबांनी थोर पुरुषांचे मूल्यमापन करण्याच्या ज्या तीन प्रचलित सिद्धांतरूप पद्धती होत्या त्यांच्याशी श्रोत्यांचा परिचय करून दिला.

ऑगस्टाईनच्या मते , ‘इतिहास म्हणजे विधात्याच्या योजनेचा विकास.’ बकलच्या मते, ‘भूगोल आणि भौतिकशास्त्र इतिहास घडवतात.’ , ‘आर्थिक कारणामुळे इतिहास घडतो ‘ असे कार्ल मार्क्स म्हणतात. आपल्या म्हणण्याचा निष्कर्ष काढून बाबासाहेब म्हणाले , ‘थोर पुरुष समाजाला विधायक गती देण्याच्या भावनेने प्रेरित झालेला असतो. तो समाजावर वेळप्रसंगी टीकेचे कोरडे ओढून त्याचे मालिन्य धुऊन टाकीत असतो. ‘ही कसोटी न्या. रानड्यांना लावली तर आंबेडकरांच्या मते रानडे हे त्यांच्या काळातील प्रचलित असलेल्या कसोट्याप्रमाणे निःसंशय थोर पुरुष ठरतात, रानड्यांचे सारे आयुष्य हे सामाजिक अन्यायाविरुद्ध एक कठोर झगडा होता. समाज सुधारणेचा तो लढा होता. रानडे सामाजिक अधिकार निर्माण करण्यासाठी झगडले. रोगग्रस्त व निःसत्त्व होऊन पडलेल्या समाजाच्या अंतःकरणात चैतन्य निर्माण करून सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे अर्थशास्त्रावर संशोधनात्मक ग्रंथ लिहिणे स्वाभाविक होते. त्याचबरोबर राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र याचा सखोल अभ्यास करून त्यांनी ग्रंथलेखन केले.

त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नवीन विचारसरणी अगदी सडेतोड निर्भिडपणे मांडली. १९४० साली ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी जे भाकीत अप्रत्यक्षरीतीने वर्तविले होते ते १९४७ साली खरे ठरले. कोणत्याही विषयावर लिखाण करताना त्यासंबंधी संपूर्ण तयारी करायची व मगच लेखन करायचे हा जो न्यायमूर्ती रानडे यांचा बाणा होता तोच बाबासाहेबांचा होता. ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकाची रचना करीत असताना बाबासाहेबांनी ‘ऋग्वेद’ या ग्रंथाचे दहा वेळा पारायण केले होते ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल ! ‘

बाबासाहेबांनी तो ग्रंथ फार परिश्रमपूर्वक लिहिला आणि एक नवीन दृष्टिकोन त्यात मांडला, असे त्यांचे टीकाकारही मान्य करतात. बाबासाहेबांच्या इतर कोणत्याही ग्रंथाचे समालोचन केले तरी तर्कशुद्ध विचारसरणीच आढळते. अशाच विचारसरणीची सार्वजनिक जीवनात अत्यंत आवश्यकता आहे. न्यायमूर्तीनी याच करिता टीकेचे आघात सहन केले आणि बाबासाहेबांना टीका सहन करावी लागली. परंतु ते डगमगले नाही. अंगीकृत कार्याविषयी तळमळ, विद्वत्ता आणि तर्कशुद्ध विचारसरणी या तीन गुणांचा समुच्चय न्यायमूर्तीप्रमाणे बाबासाहेबातही होता आणि तेच खरे त्यांच्या थोरवीचे अन् उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे गमक म्हणावे लागेल. व्यक्तीच्या मौलिक गुणाविषयी आदर ठेवणे सार्वजनिक जीवनात अत्यंत गरजेचे आहे.

आपापसातील मतभेद राष्ट्रकल्याणाकरिता दूर सारून सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे हे महत्त्वाचे तत्त्व बाबासाहेबांनी १९४७ साली भारतीय जनतेसमोर ठेवले. न्यायमूर्तीच्या विधानाशी तंतोतंत जुळणारी विचारसरणी बाबासाहेबांची होती. न्यायमूर्तीनी जी तत्त्वे आचरली त्या तत्त्वांची परंपरा कायम राहावी या उदात्त हेतूने त्यांनी एका शिष्याला तयार केले. नामदार गोखले यांनी ती परंपरा कायम ठेवली हे सुप्रसिद्ध आहे. दुसरीकडे बाबासाहेबांनी त्यावर कळस चढविला, सामाजिक चळवळ उभारली. देशाला ऐक्याचा संदेश देणारे संविधान दिले. प्रेम, दया, करुणा, मैत्रीचा संदेश देणारा बुद्धधम्म दिला.

न्यायमूर्ती रानडे आणि बाबासाहेब यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे सामाजिक सुधारणाविषयीची तळमळ, न्यायमूर्तीच्या काळात राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा या वादाला फार महत्त्व आले होते. सामाजिक सुधारणेकरिता त्यांनी प्रयत्न केले. स्वकियांचा विरोध, उपहास आणि टीका सहन केली. सवर्ण समाजाची नाडी परीक्षा १९व्या शतकात न्यायमूर्तीनी व २० व्या शतकात बाबासाहेबांनी अगदी योग्यप्रकारे केली.

न्यायमूर्तीनी तत्कालीन समाजाचा रोष पत्करून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांना केवळ रोषच पत्करावा लागला असे नव्हे तर प्रत्यक्ष विरोध आणि छळही सहन करावा लागला. न्यायमूर्तीनी सुरू केलेले कार्य इतर समाज सुधारकांनी थोड्याफार प्रमाणात सुरू ठेवले मात्र त्याची सांगता बाबासाहेबांनी केली. भारताच्या संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याच्या सिद्धांत आहे राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा धर्मभेद व जातिभेद मान्य केला जाणार नाही असे म्हटले आहे. संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीने भारताला जगात मानाचे स्थान मिळविण्यास मदत होणार आहे. विशुद्ध जीवन, विद्वता, स्वीकृत कार्याविषयी अंतःकरणात तळमळ, समाजाच्या भविष्याबद्दल उत्कट आत्मविश्वास या गुणसमुच्चयाने विचार केल्यास न्यायमूर्ती रानडे आणि डॉ. आंबेडकर हे दोन महामानव आपणापुढे उभे राहतात.

‘भारतीय समाजाला सुधारणे हे आपले कर्तव्य आहे’ अशी ठाम भूमिका न्या. रानडे यांची होती. बाबासाहेबांचे न्या. रानडे यांच्याबद्दलचे विचार वाचल्यानंतर आजही न्या. रानडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मौलिक विचारधारा समाज उत्थानासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशीच आहे.

– मिलिंद मानकर, नागपूर
(मो. ८१७७८६६३९७)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका