हुश्शSS.. गाईची भेट टळली, सरकारकडून ते पत्रक मागे
आता मारा प्रेयसीला कडकडून मिठी

थिंक टँक / नाना हालंगडे
व्हॅलेंटाईन डे’ दिनी 14 फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ अर्थात “गो अलिंगन दिन” साजरा करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून देशवासियांना करण्यात आलं होतं. पण यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आता सरकारनं आपलं हे आवाहन मागं घेतलं आहे. त्यामुळे आता बिचाऱ्या गाईची भेट टळली आहे. प्रेयसीला कडकडून मिठी मारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विरोधकांच्या प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारने 14 फेब्रुवारी हा दिवस ‘गो आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन मागे घेतलं आहे. केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस सारख्या अनेक विरोधी पक्षांनी या आवाहनाला विरोध दर्शविला होता. (Following huge opposition from the opposition, the central government has withdrawn its call to celebrate February 14 as ‘Go Hug Day’)
केंद्रीय पशु कल्याण मंडळानं 8 फेब्रुवारी 2023 रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावं आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, हे आवाहन होतं.
14 फेब्रुवारी हा गो आलिंगन दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णयावर टीका करत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हेही मोदी यांच्यासाठी पवित्र गायीसारखे असल्याचं शिवसेनेनं म्हंटलं होतं. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन म्हणाले होते की, गो हग डे हा छद्म-हिंदुत्व आणि छद्म-देशभक्ती आहे, ज्याचा उद्देश मुख्य प्रवाहातील समस्यांपासून लक्ष विचलित करणं आहे. सीपीआय(एम) नेते इलामाराम करीम यांनी तर काऊ हग डे ही देशासाठी हास्यास्पद आणि लज्जास्पद संकल्पना असल्याचं म्हटलं होतं.
यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटलं होतं की, “आपल्या सर्वांना माहित आहे गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटापुढे आपण आपली संस्कृती आणि वारसा विसरलो आहोत. गायीला मिठी मारल्यानं भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करावा. तसेच हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा”, असं या परिपत्रकात म्हटलं होते.
Animal Welfare Board of India withdraws appeal to celebrate February 14 as 'Cow Hug Day'
— Press Trust of India (@PTI_News) February 10, 2023
केंद्राचं हे आवाहन प्रत्यक्षात शक्य नसल्याचं सांगत विविध स्तरातून यावरुन केंद्र सरकारला टार्गेट करण्यात आलं होतं. केंद्राकडून आपला धार्मिक अजेंटा विनाकारण रेटला जात असल्याचा आरोप नुकताच शिवसेनेनं केला होता. तसेच सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी याची मोठी खिल्ली उडवली होती.
