स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे
रब्बी हंगामात मुख्य डाळवर्गीय पीक म्हणून हरभरा पिकाची लागवड केली जाते. हरभरा पिकांत विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या अळीचे शास्त्रीय नाव हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा असे आहे. ही बहुभक्षीय कीड असून, सुमारे १८१ पेक्षा अधिक पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते.
*जीवनक्रम
या अळीच्या अंडी, अळी, कोष, पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था अधिक नुकसानकारक असते. मादी पतंग गोलाकार हिरवट पिवळसर रंगाची सुमारे साधारणपणे २५०-५०० अंडी पाने, कळी, फुलांवर घालते.
अंड्यातून ५-६ दिवसांत अळी बाहेर पडते.
अळीचा रंग हिरवट असतो. साधारण १४-२० दिवसांत अळीची वाढ पूर्ण होते. त्यानंतर पिकाजवळील जमिनीत ती कोषावस्थेत जाते. कोष अवस्था साधारण एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असतो.
*नुकसानीचा प्रकार*
साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येेतो.
हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश या बाबी किडीच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात.लहान अळी पानातील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसतात. मोठी अळी कळी, फुले आणि घाट्यावर उपजीविका करते. एक अळी साधारणपणे ३०-४० घाटे खाते. त्यामुळे पिकांत सुमारे ३५-४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
अळीचे अर्धे शरीर हरभरा घाट्यामध्ये तर अर्धे शरीर बाहेर असे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.
*रासायनिक नियंत्रण
(फवारणी प्रति १० लिटर पाणी)
*आर्थिक नुकसान पातळी :
१ ते २ अळ्या प्रति एक मीटर ओळ किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळा.
इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ टक्के एसजी) ४.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ३ मिलि किंवा
इन्डोक्झाकार्ब (१५.८० ईसी) ६.६६ मिलि किंवा
_ लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (३ % ईसी) ८ मिलि आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
*एकात्मिक कीड व्यवस्थापन
उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्यामुळे अळीची कोष अवस्था जमिनीवर उघडी पडून सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांमुळे नष्ट होते.योग्यवेळी आणि योग्य अंतरावर हरभरा पिकाची पेरणी करावी.
मका किंवा ज्वारीची हरभरा पिकामध्ये पक्षिथांबे म्हणून लागवड करावी.
पीक ३०-४५ दिवसांचे झाल्यानंतर आंतरमशागत व कोळपणीची कामे करावीत.
आंतरमशागत करून तणवर्गीय वनस्पती जसे कोळशी, रानभेंडी, पेटारी इत्यादी काढून टाकावे.
शेतामध्ये एकरी २०-२५ पक्षिथांबे उभारावेत. एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.
मुख्य पिकाभोवती १ ओळ झेंडूची लावावी. जेणेकरून कीड झेंडूकडे आकर्षित होईल.
पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
पीक कळी अवस्थेत असताना अझाडिरेक्टीनची ( ३०० पीपीएम) फवारणी करावी.प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) १ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.
फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.
खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.
बॅन किंवा रेस्ट्रिक्टेड आहे का पाहावे.
लेबल क्लेम वाचावेत.
पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.
रसायनांचा गट तपासावा.
पीएचआय, एमआरएल तपासावेत.पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.
मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.
हेही वाचा
“महाराष्ट्र केसरी”साठी पै. शाहूराजे शशिकांत देशमुख यांची निवड