हजरजबाबी, विनोदी अन् गंभीर पु. लं.
आज लेखक पु. लं. देशपांडे यांचा जन्मदिन
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व लेखक पु. लं. देशपांडे यांचा आज जन्मदिन. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक आठवणी आजही वाचकांच्या स्मरणात आहेत.
पु. लं. देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल. देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु.ल. म्हणून ओळखले जातात.
लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. गुळाचा गणपती, या सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री, बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.
पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत ‘भाई’ हा चित्रपट बनला आहे.पुलं हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्यसुमने आणि विनोदी किस्से आहेत.ते विनोद अन् गंभीरही होते.
देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले.
१९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. टागोर लिखित गितांजली हा काव्यसंग्रह त्यांनी “अभंग गितांजली” या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते.
१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५ मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.
पु.ल. देशपांडे यांना १९५८ मध्ये आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.
१२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले.