सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात ५ जण जागीच ठार
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
सोलापूर-पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले असून सहा जणांचा गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
उजनी धरणाच्यासमोर भिमानगर इथं हा अपघात घडला. सध्या भीमा नदी पुलावरून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक या मार्गावर सुरू आहे.
अशात वाहन चालकाला अंदाज न आल्याने अपघात घडल्याचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सहाजणांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शनिवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. इंदापूरकडून सोलापूरकडे टॅंकर जात असताना सोलापूरकडून पुण्याला येणाऱ्या ट्रकसोबत हा भीषण अपघात झाला आहे. अगदी उजनी धरणाच्या समोर एका ढाब्याजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याची माहिती आहे.