सोलापूरात राष्ट्रवादीचा काँग्रेसला झटका
काँग्रेसचे माजी महापौर व माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापुरात येताच राजकीय भूकंप घडून आला. काँग्रेसचे माजी महापौर व माजी शहराध्यक्ष यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सोलापूर काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले ( Nalini Chandele ) व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल ( Sudhir Kharatmal ) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच कॉग्रेसला खिंडार पडले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत महापौर आमचाच , अशी वल्गना करत काँग्रेसने ” कॉंग्रेस मनामनात – कॉंग्रेस घराघरात ‘ ही मोहीम सुरू केली होती . काँग्रेसच्या एकमेव आमदार तथा कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत हे अभियान सुरू आहे . या अभियानामध्ये पक्षांतर केलेले दोन्हीही नेते आमदार प्रणिती शिंदे यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसल्याचे पाहायला मिळाले. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी व कमी झालेल्या मान सन्मानाला वैतागून माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ‘ हात ‘ दाखवून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलेले महेश कोठे यांनी महापालिकेत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणून ठेवले . मात्र आता महेश कोठे यांनीच राष्ट्रवादीची वाट धरल्याने त्यांच्या कुटुंबातील नगरसेवकांसह त्यांचे नगरसेवकही पक्षांतर करतील , अशी चर्चा आहे . त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भाजप विरोधात एकत्रित लढणार नाही, असाही तर्क काढला जात आहे.
आनंद चंदनशिवे व तौफिक शेख हे सध्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.