सूक्ष्म अभ्यासातून नेट, सेट परीक्षेत यश सहजशक्य : डॉ. उज्वला बर्वे
मास कम्युनिकेशन विभागातर्फे नेट, सेट कार्यशाळा उत्साहात
सोलापूर (प्रतिनिधी) : शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. शिक्षण क्षेत्रात व विशेषतः जनसंज्ञापन शाखेतील शिक्षकीपेशात चांगले करिअर घडवता येते. यासाठी नेट, सेट परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. सूक्ष्म व सातत्यपूर्ण अभ्यासातून नेट, सेट परीक्षेत यश मिळवणे सहजशक्य असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे एकदिवशीय ऑनलाईन नेट, सेट कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे डॉ. संजय तांबट यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी विभागाबाबत माहिती दिली. डॉ. अंबादास भासके यांनी प्रास्ताविक, तर डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी आभार प्रदर्शन केले. कु. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. उज्वला बर्वे म्हणाल्या की, नेट, सेट परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. बहुपर्यायी प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचे मापन करतात. संज्ञापन सिद्धांत, मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ, चित्रपट, जनसंपर्क, जाहिरात, डिजिटल मीडिया, माध्यम व्यवस्थापन, पत्रकारितेचे कायदे आदी बहुविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. सेट व नेट या दोन्ही परीक्षेत थोडे साम्य असले तरी दोन्हींचे मूलत: स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा फरक ध्यानात घेऊन अभ्यास करावा. अभ्यासात सातत्य असावे. यावेळी डॉ. उज्वला बर्वे यांनी युनिटनिहाय विवेचन केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
डॉ. संजय तांबट म्हणाले की, सेट, नेट परीक्षेचा अभ्यास करताना टिपणे काढून नोंदी करायला हव्यात. जनसंज्ञापनाचे सिद्धांत व प्रतिमाने, माध्यमे व लोकशाही, पत्रकारितेचे बदलते स्वरूप, सरकारची धोरणे, माध्यमे व लोकशाही, माध्यमांचा विकास, मुद्रित तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमे याबाबत अभ्यास करावा.
मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर म्हणाले की, जनसंज्ञापन विषयात नेट, सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. जनसंज्ञापन विषयातून शिक्षकीपेशात येवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला वाचनाचा व्यासंग वाढवायला हवा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे आम्ही दरवर्षी नेट, सेट परीक्षेबाबत कार्यशाळा आयोजित करीत आहोत.
यावेळी विविध विद्यापीठातील विद्यार्थी सह्भागी होते.