सुशांतसिंह राजपूतच्या “त्या” घरात राहायला कोणी धजावेना!
थिंक टँक / नाना हालंगडे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केलेल्या घराबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिना पाच लाख रुपये भाडे असलेल्या या घरात राहायला कोणीही भाडेकरू धजावेना झाला आहे. ही माहिती या घरमालकाने माध्यमांना दिली आहे.
सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत. सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे. सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.
सुशांतचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर आता अडीच वर्षानंतरही फ्लॅटच्या मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुशांत राहत असलेला फ्लॅट आता त्या फ्लॅटच्या मालकाला कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही. ब्रोकरने या फ्लॅटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”हा सी-फेसिंग फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहे. या फ्लॅटची किंमत दरमहा पाच लाख रुपये आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला अडीच वर्ष होऊनही हा फ्लॅट रिकामाच आहे. कोणीही या घरात राहायला तयार नाही”.
ब्रोकर रफिफ मर्चंट म्हणाले,”लोक या फ्लॅटमध्ये राहायला घाबरत आहेत. याच फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्याचं लोकांना कळतं तेव्हा ते फ्लॅट पाहायलादेखील येत नाहीत. तसेच कोणी हा फ्लॅट विकत घ्यायला तयार नाही. फ्लॅटच्या मालकाला आता हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही”. अशाप्रकारे सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्या फ्लॅटसाठी भाडेकरू मिळत नाही आहेत. लवकरच हा फ्लॅट विकला जावा अशी मालकांची इच्छा आहे.
सुशांत सिंह राजपूतचा जीवनप्रवास
पाच बहिण भावांमध्ये सुशांत सिंह राजपूत हा सर्वात छोटा होता. सुशांतचे टोपण नाव हे ‘गुलशन’असं होतं. सुशांत बालपणी आभ्यासात फार हुशार होता. सुशांतनं भौतिकशास्त्र या विषयात राष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकले होते. सुशांत सिंग राजपूतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्सला प्रवेश घेतला होता. पण सुशांतची आवड इंजिनिअरिंगमध्ये कमी आणि अभिनयात जास्त होती.कॉलेजमध्ये शिकत असताना सुशांत हा शामक डावर यांच्या डान्स क्लासमध्ये जात होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सुशांतनं कॉलेज सोडून कला क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
कॉलेज सोडल्यानंतर सुशांतनं एका थिएटर ग्रुपमध्ये सहभाग घेतला. छोट्या पडद्यावरील ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमध्ये सुशांतनं प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली. या मालिकेनंतर सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली. केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
पीके चित्रपटासाठी केवळ 21 रुपये मानधन
पीके चित्रपटामध्ये 15 मिनीटांचा रोल करण्यासाठी सुशांतनं 21 रुपये मानधन घेतलं होतं. त्यावेळी तो एका चित्रपटाचे जवळपास 5 कोटी मानधन घेत होता. पण दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याकडून सुशांतनं 21 रुपये मानधन म्हणून घेतले.
आलिशान गाड्यांची आवड
राजपूत जवळजवळ 59 कोटींचा मालक होता. यासोबतच त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या होत्या. बीएमडब्ल्यू के 1300 आर मोटारसायकल, Maserati Quattroporte आणि लॅंड रोवर रेंज रोवर एसयूवी सारख्या आलिशान गाड्या सुशांतकडे होत्या. एका सिनेमासाठी सुशांत 5 ते 7 कोटींचे मानधन घ्यायचा.
सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी ओळख मिळाली. 2013 मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘काय पो छे'(Kai Po Chhe) हा त्याचा पहिला सिनेमा होता. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. तर सिनेसृष्टीदेखील हादरली होती. सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘किस देश मे है मेरा दिल’ या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’मधील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.
2009 ते 2011 पर्यंत ही मालिका सुरू होती. या मालिकेतील अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. 2013 साली ‘काय पो चे’ या सिनेमाच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्याचं नॉमिनेशनही मिळालं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमात सुशांत झळकला होता. या सिनेमात सुशांतसिंहसोबत परिनिती चोप्राही होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं एकाएकी या जगाचा निरोप घेणं विश्वास ठेवण्यायोग्य नसलं तरीही आता ही बाब अनेकांनीच स्वीकारली आहे. सुशांतच्या जवळच्या अनेक व्यक्तींसाठी दरम्यानचा काळ ही बाब पचवण्यास अत्यंत कठीण होती.
सुशांत हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या निमित्तानं झळकलेला सुशांत सहकलाकार अंकिता लोखंडे हिच्यासोबत काही वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होता. काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या या नात्याला गालबोट लागलं आणि दोघांनीही आपल्या वाटा बदलल्या.