सार्वजनिक गणेशोत्सवास सोलापूरात झाली होती प्रथम सुरुवात
मानाचा सार्वजनिक आजोबा गणपती हा महाराष्ट्रातील पहिला गणपती
सोलापूरच्या शुक्रवार पेठेतील श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीचे हे 135 वे वर्ष. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवास 1893 मध्ये पुण्यात सुरुवात झाली. परंतु तत्पूर्वी 8 वर्षे अगोदर सोलापुरात शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी शेटे वाड्यासमोर सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्रातील हे पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.
लोकमान्य टिळक व सोलापूरचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. लोकमान्य 1875 पासून सोलापुरात येत होते. सोलापुरात त्यांचा मुक्काम इंद्रभुवनचे निर्माते कै. अप्पासाहेब वारद यांच्या निवासस्थानी असे. सोलापुरात आल्यानंतर घरगुती गणेशोत्सवात गौरीसमोर केलेली सजावट पाहण्यासाठी व पानसुपारी कार्यक्रमासाठी ते वारद यांच्यासमवेत जात असत. त्यामुळे लोकमान्य यांना गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची प्रेरणा आजोबा गणपतीपासून मिळाली असावी, असा अनुमान सोलापुरात काढला जातो.
सोलापूरच्या सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना 1885 मध्ये शुक्रवार पेठेतील त्यावेळचे प्रमुख कार्यकर्ते कै.मल्लिकार्जुनप्पा कावळे, कै महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेचरी, काटकर, म्हमाणे, ओनामे , दर्गो पाटील, श्रीगिरी, नंद्याल, आवटे आदी घराण्यातील प्रमुख व्यक्तींनी एकत्रित येऊन भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहाने केली होती. कामट्या, रद्दी कागद, खळ, चिंचुक्याचे पीठ, कापड आदी वस्तूच्या मदतीने आजोबा गणपतीची पर्यावरणपूरक मूर्ती त्याकाळात कै. निलाप्पा उजळंबे, आडव्याप्पा माळगे, औटे या मूर्तिकरांनी मिळून तयार केली.
सुरुवातीला काही वर्षे शेटे यांच्या घरासमोर व त्यानंतर त्रिपुरातकेश्वर मंदिरात आजोबा गणपतीचा गणेशोत्सव साजरा केला जात असे. आजोबा गणपती गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी दुसऱ्या पिढीकडे आल्यानंतर खास म. बसवेश्वर मंडळाची स्थापना करण्यात अली कै.पंचप्पा जिरगे, कैै. सिद्रामप्पा फुलारी, इरय्या स्वामी , अण्णाराव वजीरकर, हत्तुरे, नंदीमठ, कळमनकर आदी घराण्यातील प्रमुख व्यक्तींचा या मंडळामध्ये सहभाग होता.
यानंतर आजोबा गणपती उत्सवाची सूत्रे श्रद्धानंद समाजाकडे आली. लाहोर उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील लाला मुन्शीराम यांनी दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी श्रद्धानंद या नावाने ओळखले जात असत. एका माथेफिरू तरुणाने त्यांची 18 डिसेंबर 1926 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हत्या केली होती. त्यानंतर सोलापुरात या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. सिद्रामप्पा फुलारी, रेवनसिद्धप खराडे , नागप्पा शरणार्थी , नागय्या धोत्री , इरय्या कोरे आदींनी देवालयात एकत्र येऊन श्रद्धानंद समाजाची स्थापना सोलापुरात केेली.
या समाजातर्फे तरुणांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्र प्रेम निर्माण करण्यासाठी लाठी, तलवार व दांडपट्टा चालविण्याचा वर्ग सुरु करण्यात आला व एक व्यायामशाळा ही सुरु करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यासाठी व लोकजागृती करण्यासाठी श्रद्धानंद समाजाच्या गणेशोत्सवातील मेळे भरविले जात असत. हुतात्मा कै. मल्लाप्पा त्याचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत असत. शुक्रवार पेठेत त्यामुळेच स्वातंत्र्यसैनिकांची संख्या जास्त आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरातील शुक्राच्या कामासाठी केरळचे कलाकार 1983 मध्ये सोलापुरात आल्यानंतर आजोबा गणपतीची मूर्ती जीर्ण झाल्याने माजी महापौर कै. विश्वनाथ बनशेट्टी अप्पा यांनी आजोबा गणपतीची नवीन मूर्ती त्यांच्याकडून तयार करून घेतली. त्यानंतर जुन्या मूर्तीचे टाकळी येथे भीमा नदीत विसर्जन केले. शुक्रवार पेठेतील बनशेट्टी यांच्या ट्रंक कारखान्याच्या मोकळ्या जागेत बरीच वर्षे गणेशोत्सवात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली जात असे.
त्यानंतर सध्याच्या जागेत आजोबा गणपती मंदिराची आकर्षकरित्या उभारणी करण्यात आली. त्यासाठी श्रद्धानंद समाजाचे अध्यक्ष गौरीशंकर फुलारी , रेवण सिद्ध बनशेट्टी व सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले श्रद्धानंद समाजात काम करणारे कै सिद्रामप्पा फुलारी , कै विश्वनाथ बनशेट्टी ,कै चंद्रशेखर म्हमाणे , प्रभाकर वनकुद्रे , चिदानंद वना रोटे , रोहिणी तडवळकर , स्नेहल निंबाळे , शोभा बनशेट्टी आदी पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
श्रद्धानंद समाजाने स्वातंत्र्य चळवळीत मोलाची कामगिरी केली. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य होता. हे श्रद्धानंद समाजातील कार्यकर्त्यानी स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योग दानावरून सिद्ध होते.