सांगोल्यात शेकाप-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार?
नेत्यांचे सूतोवाच, कार्यकर्ते मात्र संभ्रमात
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीत प्रत्येक निवडणुकीत साथ देणारे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापला मदत करणार? की जुने मित्र आ. शहाजीबापू पाटील यांना निवडून आणणार? या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मात्र, “नेत्यांचे सूतोवाच, कार्यकर्ते मात्र संभ्रमात” अशीच काहीशी स्थिती सध्या दिसून येत आहे.
त्याचे झाले असे की, सांगोला तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी पाठीशी घालणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी त्यांना निलंबित करण्यात यावे, यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
पत्रकार परिषदेत बोलताना जलजीवनच्या कामाच्या राजकीयच नाही तर अधिकारी वर्गाचीही चौकशी झाली पाहिजे. आम्ही विकासकामांत राजकारण करत नाही, असे कारंडे यांनी नमूद केले. त्यासंदर्भाने पत्रकारांनी कारंडे यांना आबासाहेबांच्या (भाई गणपतराव देशमुख) अंत्यविधीवेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांना बोलू न देणे हे राजकारण नव्हते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कारंडे यांनी माजी आमदार साळुंखे यांची माफी मागितली.
कारंडे म्हणाले की, “आबासाहेबांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमावेळी साळुंखे श्रद्धांजली वाहत असताना काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत आम्ही त्यावेळीही माफी मागितली होती. त्यानंतर आजही जाहीर माफी मागतो.”
नेमके प्रकरण काय?
माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या अंत्यविधीवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले होते. त्यावेळी शेकापच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना बोलू दिले नव्हते.
कारण, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे प्रत्येक निवडणुकीत गणपतराव देशमुख यांच्यासोबत होते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहाजी पाटील यांच्यासोबत युती केली होती. त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार आणि देशमुख यांचे नातू अनितकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव झाला होता. तो राग कार्यकर्त्यांच्या मनात होता. त्यातून हा प्रकार घडला होता. ही घटना अजूनही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत.
दोघांच्याही मनात राग
सदरची घटना दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विसरले नाहीत, असे विविध प्रसंगांवरून दिसते. मागील निवडणुकीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना उघडपणे सहकार्य केले होते. त्यामुळे बापू हे दणदणीत निवडून आले. माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यामुळेच आपल्या उमेदवाराचा पराभव झाला असा शेकाप कार्यकर्त्यांत राग आहे.
तर दुसरीकडे भाई गणपतराव देशमुख यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना शोकसभेत बोलू दिले नाही, जाहीर अपमान केला, असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राग आहे.
भाई गणपतराव देशमुख यांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो, असे शेकापच्या नेत्याने म्हटले असल्याने या प्रकरणावर पडदा पडेल असे अनेकांना वाटते.
शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा कारंडे यांनी माफी मागून हा विषय संपवला असला तरी हा विषय संपला नव्हे तर आता सुरु झाला आहे. राष्ट्रवादी आणि शेकाप या दोन्ही नेत्यांकडून याप्रश्नी कसा प्रतिसाद मिळतोय, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.