
थिंक टँक / नाना हालंगडे
भाजप – शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढविणारी राजकीय खेळी आगामी काळात महाराष्ट्रात खेळली जाण्याची शक्यता दिसत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समितीसह शेतकरी कामगार पक्ष तसेच अन्य काही पक्षांनी मिळून एक मजबूत तिसरी आघाडी बनविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ही आघाडी प्रत्यक्षात निर्माण झाल्यास सांगोला मतदारसंघात शेकापला मोठे बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लवकरच आघाडीची घोषणा
राज्याच्या राजकारणात आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे एकत्र येणार आहेत. त्यादृष्टीने चर्चा झाली असून यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समितीसह अन्य काही पक्षांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच या सर्व पक्षांच्या आघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.
बिनीच्या शिलेदारालाच भाजपने फोडले
स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडी आणि भाजप व शिवसेना युतीबरोबर काही काळ होती. मात्र या दोन्ही पक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अपेक्षाभंग झाला. सदाभाऊ खोत या बिनीच्या शिलेदारालाच भाजपने फोडले. राजू शेट्टी यांचा पदोपदी अपमान करण्यात आला.
यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका मागील दोन वर्षापासून घेतली आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील रासप सध्या भाजपसोबत नावालाच आहे. त्यांच्याकडेही भाजपने दुर्लक्ष केले आहे. यामुळे जानकरही नाराज दिसत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचीही महाविकास आघाडीकडून अशीच घोर निराशा करण्यात आली. मोठ्या अपेक्षेने या पक्षांसोबत गेलेले हे छोटे पक्ष सध्या कमालीचे नाराज आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मूळची शिवसेनाही गलितगात्र
भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून हा पक्ष व पक्षाचे चिन्ह बळकावल्याने मूळची शिवसेनाही गलितगात्र झाली आहे. महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती असल्याचे वरवर दिसत असले तरी या आघाडीने आपल्या सोबतच्या पक्षांना नेहमीच तुच्छतेने वागविले आहेत. याचाही राग या सर्वांच्या मनात आहे.
हे मोठे पक्ष हे छोट्या पक्षांना गृहित धरून राजकारण करत असल्याने त्यांनी आता उपद्रवमूल्य वाढविण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वांनी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
हालचाली सुरू
नव्या आघाडीच्या स्थापनेची पहिली पायरी म्हणून स्वाभिमानी आणि रासप यांनी आघाडीसाठी चर्चा सुरू केली आहे. सोबत शेकाप, भारत राष्ट्र समिती यासह अन्य काहींना घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानीची पश्चिम महाराष्ट्रात ताकद आहे. रासपची सर्व मतदार संघात मते आहेत.
के. सी. राव महाराष्ट्रात पाय रोवणार!
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून के. सी. राव महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकणात अजूनही शेकाप आहे. हे सारे एकत्र आल्यास निवडून येण्याची शक्यता कमी असली तरी पाडापाडीत काही ठिकाणी ते निश्चितच यशस्वी होऊ शकतील. असे झाल्यास महाविकास आघाडीसह भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
रासपची राज्यभर ताकद
“स्वाभिमानी आणि रासपची राज्यभर ताकद विखुरली आहे. आमच्यासह अन्य काही पक्षांना सोबत घेऊन नवी आघाडी आम्ही स्थापन करणार आहे. त्या दृष्टीने पहिली बैठकही झाली आहे. लवकरच याला वेग येईल.” अशी प्रतिक्रिया रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सांगोल्यात कसे असेल चित्र?
सांगोला मतदार संघ हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. अकरा वेळा भाई गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र २०२९ च्या निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख हयात असतानाच शेकापला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दुसरीकडे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांची सांगोला मतदारसंघ, तसेच राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने त्यांच्यावर मात करण्यासाठी शेकापचे अस्तित्त्व पणाला लागणार आहे.
सांगोला मतदारसंघात शेकापचा उमेदवार कोण?
अशातच या सर्व पक्षांची आघाडी झाल्यास त्याचा सांगोला मतदारसंघात शेकापला मोठा फायदा होईल असे दिसते. त्यांच्या दृष्टीने ही जमेची बाजू असली तरी सांगोला मतदारसंघात शेकापचा उमेदवार कोण हे जोवर अगदी स्पष्ट होणार नाही तोवर यश – अपयशाची गणिते मांडणे सोपे नाही, हेही तितकेच खरे आहे.