सांगोल्यात शेकापला हादरा; बाबा करांडे पक्षाला करणार लाल सलाम

२७ सप्टेंबरपासून ओबीसी, अल्पसंख्याक ऑर्गनायझेशन सेलचे करणार काम

Spread the love

सांगोला (एच. नाना) : सांगोला तालुक्यात अनेक दशके एकहाती वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षात अंतर्गत धुसपूस वाढत असल्याचे दिसत आहे. माजी आ. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर मतभेदाचे प्रमाण वाढत आहे. शेकापचे माजी जि.प. सदस्य, लेबर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तसेच कै. गणपतराव देशमुख यांच्याशी आयुष्यभर एकनिष्ठ असलेले नेते बाबा करांडे यांनी पक्षांतर्गत कारणांना कंटाळून शेकापला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती स्वत: बाबा कारंडे यांनीच ‘थिंक टँक लाईव्ह’शी बोलताना दिलीय.

शेकाप सोडून इतर पक्षात जाणार का? असा सवाल करताच अद्याप तसा कोणताही निर्णय नाही. मात्र, २७ सप्टेंबरपासून ओबीसी, अल्पसंख्याक ऑर्गनायझेशन सेलचे पूर्णवेळ काम करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

कोण आहेत बाबा करांडे?
बाबा करांडे यांची आजवरची वाटचाल थक्क करणारी आहे. ते १९७४ साली घेरडी-वाकी रस्त्याच्या कामात मैलमजूर म्हणून काम करीत होते. १ जून १९७६ साली ते जिल्हा परिषदेच्या वाहनावर क्लिनर म्हणून नोकरी करू लागले. १९७८ सालापासून त्यांना जि.प.च्याच वाहनावर ड्रायव्हर म्हणून घेण्यात आले. दरम्यान, ते राज्य कर्मचारी संघटनेच्या संपर्कात आले. सदस्य म्हणून काम करीत असतानाच त्यांचा अभ्यास, नेतृत्वगुण ओळखून त्यांच्यावर १९७९ साली राज्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९३ साली राज्य अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली.

शेकापमध्ये केला प्रवेश
१९९९ साली राज्य कर्मचारी संघटनेचे वार्षिक अधिवेशन नांदेड येथे भरविण्यात आले होते. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे शेकापचे तत्कालिन आमदार भाई गणपतराव देशमुख होते. या अधिवेशनात बाबा करांडे यांनी आक्रमकपणे भाषण केले. हे राज्य बिहारपेक्षा वेगळे नसल्याचे सांगून त्यांनी तत्कालिन सरकारवर तोफ डागली. त्यांचे अभ्यासपूर्ण, जोशपूर्ण भाषण एेकून भाई गणपतराव देशमुख प्रभावित झाले. देशमुखांनी त्यांच्या भाषणातच बाबा करांडे यांना ‘तुम्ही आमच्या सांगोल्याचे आहात. तुमच्या सारख्या अभ्यासू कार्यकर्त्याची सांगोल्याला गरज आहे. तुम्ही शेकापमध्ये माझ्यासोबत या. तुम्हाला सन्मानाची वागणूक देऊ’ असा शब्द दिला. करांडे हे तेव्हा सरकारी नोकरीत पर्मनंट होते. महत्प्रयासाने मिळालेली नोकरी सोडून राजकारणात जाणे जोखमीचे होते. मात्र करांडे यांनी त्याची पर्वा न करता भाई गणपतराव देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून २००० साली नोकरीचा राजीनामा दिला व शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

जिल्हा परिषद सदस्यत्व
बाबा करांडे यांनी शेकापमध्ये प्रवेश करताच पक्षीय कामाला जोमाने सुरुवात केली. ते स्वत: लोणारी समाजाचे असल्याने तसेच सांगोला तालुक्यात लोणारी समाज धनगर समाजाच्या बरोबरीने संख्यात्मक दृष्ट्या मोठा असल्याने त्यांना लोणारी समाजासह इतर समाजातून मोठा पाठिंबा मिळू लागला. महूद व आसपासच्या शेकडो गावामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यांनी कर्मचारी संघटनेत दीर्घकाळ काम केल्याने त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ओळखी होत्या. लोकांची कामे पटापट मार्गी लागू लागली. भाई गणपतराव देशमुखांच्या कार्याला बळ मिळाले. करांडे यांच्यातील राजकीय क्षमता पाहून शेकापकडून त्यांना २००७ साली महूद जि.प. गटातून तिकीट देण्यात आले. त्या संधीचे सोने करून करांडे यांनी महूद गटातून मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन केला.

आ. गणपतराव देशमुखांच्या प्रचाराची धुरा
२०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गणपतराव देशमुख यांच्या प्रचाराची धुरा बाबा करांडे यांच्यावरच होती. करांडे हे प्रचारप्रमुख होते. गणपतराव देशमुख यांच्या भाषणाअगोदर बाबा करांडे हे सभा दणाणून सोडत असत. त्यांच्या भाषणामुळे माहोल तयार होत असे. बाबा करांडे हे स्वत: लोणारी समाजातून आले असल्याने लोणारी समाजाचा व बाबा करांडे यांना मानणाऱ्या इतर समाजातील मतदारांचा थेट फायदा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत होत होता. ही गोष्ट स्वत: भाई गणपतराव देशमुखही बोलून दाखवत असत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सहा महिने अगोदर भाई गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीत संपूर्ण तालुकाभर २१ दिवस जनजागरण मोहिम राबवण्यात आली होती. या जनजागण मोहिमेच्या नियोजनाची धुरा बाबा करांडेंवरच होती. ते १९ दिवस विविध गावांतील मुक्कामांत भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबतच असत. बाबा करांडे यांनी माजी खासदार प्रतापसिंह मोहिते-पाटील हे हयात असताना त्यांच्या जनसेवा संघटनेतही राज्य चिटणीस म्हणून काम केले आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची ऑफर
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाबा कारंडे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाची ऑफर देण्यात आली होती. ही गोष्ट करांडे यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या कानावर घातली. देशमुख यांनी करांडे यांची समजूत काढून तुमची पक्षाला गरज असल्याचे सांगून ऑफरला नकार देण्यास भाग पाडले.

“माझ्या आयुष्यभराच्या राजकीय वाटचालीत भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले. पदाची कधीही अपेक्षा केली नाही. गोरगरीब, वंचित, शेतकरी, शेतमजूर यांची कामे मार्गी लावली. आजही मला जिल्हा परिषदेत सन्मानाची वागणूक त्यामुळेच मिळते. मी पक्षात काम करीत असताना अलिकडील काळात ओबीसी, अल्पसंख्याक समाजाला दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्याचे मली वाईट वाटते. माझी कोणावरही नाराजी नाही. न्याय मिळावा, आपली कामे मार्गी लागावीत यासाठी सर्वसामान्य लोक आपल्याकडे येत असतात. मात्र याच गोष्टीला पक्षात तिलांजली दिली जात असेल तर आपला मार्ग आपण निवडलेला बरा. यास्तव मी शेकापपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. १६ सप्टेंबर रोजी शेकापची पत्रकार परिषद सांगोल्यात होत आहे. ही माझी शेवटची बैठक असेल. २७ सप्टेंबरपासून मी ओबीसी, अल्पसंख्याक ऑर्गनायझेशन सेलचे काम राज्यभर करण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणासोबतच इतर अनेक सामाजिक कामे मला आगामी काळात करायची आहेत. – बाबा करांडे (शेकाप नेते, माजी जि.प. सदस्य)

 

शेकापची आज महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक २५ व २६ सप्टेंबर रोजी सांगोल्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी सांगोल्यात सकाळी ११ वाजता सूतगिरणीच्या सभागृहात पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेस शेकापचे राज्याचे कार्यालयीन चिटणीस भाई राजेंद्र कोरडे हे संबोधित करणार आहेत. याच पत्रकार परिषदच्या पूर्वसंध्येला ‘थिंक टँक’च्या हाती आलेल्या या बातमीने चांगलीच खळबळ उडाली आहे.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका