सांगोल्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू
अडीच हजार रुपये दिवाळी भत्ता ही लाजिरवाणी गोष्ट
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला बस आगारामधून चालक-वाहक कर्मचारी यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी बस आगारामध्ये बेमुदत उपोषण 28 ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात आले आहे.
आंदोलकांनी विविध मागण्या लावून धरल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये शासनाने बोनस दिल्याने त्यामध्ये गोड तेलाचा डबा सुद्धा येत नाही त्यामुळे राज्य शासनाने एसटी कामगारांची चेष्टा लावल्यासारखा प्रकार आहे.
कोरोना कालावधीमध्ये 238 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलेला आहे. पगार न झाल्याने 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या गोष्टीकडे शासन गांभीर्याने बघताना दिसत नाही. अडीच वर्षाच्या कोरोना कालावधीमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून प्रवास वाहतुकीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेतला. परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच काळजी घेतली नाही. त्यामुळे विविध मागण्यांसाठी सांगोला बस आगारमधील चालक-वाहक इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण व संप सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी मालमत्तांचा संपूर्ण ताबा महाराष्ट्र शासनाने घ्यावा. संपूर्ण ताबा महाराष्ट्र शासनाने घेण्यासाठी संघटनांना प्रतिनिधित्व देण्यात यावे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व मालमत्तांचे शासकीय मुल्यकारांकडून बाजारमूल्याने मुल्यांकन करून घेऊन ताबा घेण्याच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख व्हावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचे सध्या वेतन, भत्ते, सेवाशर्ती संरक्षित करून, त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी / अधिकारी घोषित करावेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करून, त्यांची दिनांक १ जानेवारी 2006 पासून सुधारित वेतननिश्चिती करावी आणि निर्माण होणारी थकबाकी तातडीने देण्यात यावी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचा-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करावी. सर्व शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना रुपये १० लाखांचे वैद्यकीय विमा संरक्षण द्यावे. विहित तारखेस वेतन द्यावे. आत्महत्याग्रस्त एस. टी. कामगारांच्या कुटुंबाना रुपये ५० लाखाचे एकरकमी अर्थसहाय्य देण्यात यावे, तसेच वारसास अग्रहक्काने नोकरी देण्यात यावी. या मागण्या सर्व एस. टी. कामगारांसाठी त्यांच्या अस्तित्वासाठी कुटुंबाच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाच्या असून त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासन सोबत आपण करावा आणि एस. टी. कामगारांना न्याय मिळवून देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करावे अशा मागण्या समस्त सांगोला आगार कर्मचारीवृंद सांगोला यांच्यावतीने करून बेमुदत संप उपोषण करण्यात येत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर शासनाने अडीच हजार रुपये दिवाळीनिमित्त बोनस दिल्याने त्या किमतीमध्ये गोड तेलाचा एक डबा सुद्धा येत नाही. कोरोना कालावधीत मात्र प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून त्यांना सुखरूप ठिकाणी पोहोचवत होता. परंतु तरीही दरम्यानच्या कालावधीमध्ये पगार थांबविल्याने 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. 238 कर्मचाऱ्यांना कोरोना कालावधीत सेवा बजावत असताना कोरोना होऊन मृत्यू झाला. तरीही शासनाला जाग येत नाही. त्यामुळे अशा विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप जाहीर केला आहे.