सांगोल्यात आली ‘गद्दार मटण थाळी’
शिरभावी येथील हॉटेलचालकाने दिले नाव
थिंक टँक / नाना हालंगडे
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ या विधानामुळे राज्यभरात चर्चेत असलेला सांगोला तालुका आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सांगोल्यात ‘गद्दार मटण थाळी’ या नावाची प्रसिद्ध सुरू झाली आहे. आपण गद्दार मटणथाळीला जरी नाव ‘गद्दार मटणथाळी’ असे दिले असलेतरी जेवण मात्र आपण गावरान व चांगल्या प्रकारे देणार आहोत. त्यात आपण गद्दारी करणार नाही, असे सांगायला हॉटेल मालक विसरला नाही.
सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणाचा कोण कसा फायदा घेईल सांगता येत नाही. सत्तेच्या मागे राजकारणी फिरत असलेले आपणास दिसत असले तरी सध्या या राजकीय वातावरणाचा फायदा घेण्यासाठी एका हॉटेल चालकाने चक्क आपल्या मटन थाळीला ‘गद्दार मटन थाळी’ असे नाव दिले असून हा चांगला चर्चेचा विषय बनला आहे. ही थाळी कशीही असली तरी मात्र या नावामुळे चांगलीच प्रसिद्ध होतेय.
हे हॉटेल वेगळ्या थाळीमुळे कायमच प्रसिद्ध
शिरभावी (ता. सांगोला) येथील समाधान सलगर यांचे ‘कांचन रिसॉर्ट’ नावाचे हॉटेल आहे. ग्रामीण भागात हे हॉटेल असूनही आपल्या वेगळ्या थाळीमुळे कायमच प्रसिद्ध असते. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा घेण्यासाठी हॉटेल चालक समाधान सलगर यांनी आपल्या एका मटण थाळीला चक्क ‘गद्दार मटन थाळी’ असे नाव दिले आहे.
गणपती विसर्जनानंतर ही मटन थाळी सुरू केली असली तरी त्या अगोदरच त्यांनी दिलेल्या थाळीच्या नावांमुळे ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. याअगोदर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या ‘काय झाडी, काय हॉटील…’ या विधानांमुळे आमदार शहाजीबापू पाटील सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. त्यातच त्यांच्याच तालुक्यात आज शिरभावी सारख्या गावात ‘गद्दार मटन थाळी’ नावाने थाळी सुरू झाल्याने एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे
जोरदार चर्चा
गणेश विसर्जनानंतर शिरभावी येथील कांचन रिसॉर्ट हॉटेलमध्ये सुरू होणार असल्याचे अगोदरच सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाले होते. या नावामुळेच या थाळीबाबत व जेवणाबाबत अनेक कमेंट येऊ लागल्या होत्या. ही थाळी, हॉटेल याबाबत कोणतीही चौकशी न करता त्या थाळीला दिलेल्या नावामुळे याबाबतच अधिक चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
पाहा खास व्हिडिओ