सांगोल्यात आबांच्या साथीने बापूंचे राजकारण
वाचा खणखणीत राजकीय वार्तापत्र
सांगोला / डॉ.नाना हालंगडे
1962 पासून शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख, विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत आहे. सध्याच्या स्थितीला शहाजीबापू आणि दीपकआबा यांनी एकत्र येत राजकीय कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आबा – बापू गटाने चमत्कार दाखविला आहे. या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या एकत्रित येण्याने तालुक्याच्या आगामी राजकारणाचे कंगोरे पुढे येत आहेत.
भाई गणपतराव देशमुख यांनी एकनिष्ठेतून, तर सातत्याने पक्षांतर करून आमदार शहाजी पाटील यांनी तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरू ठेवली आहे. या दोन्ही आमदारांना धरून दीपकआबा यांनी तालुक्याच्या विकासाबरोबर स्वतःचा गट शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवंगत भाई गणपतराव देशमुख हे 55 वर्षे संगोल्याचे आमदार होते. त्यांनी त्यांच्या काळात एक पक्ष एक झेंडा घेऊन जनतेशी एकनिष्ठ राहून 2019 पर्यंत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला. ते सातत्याने म्हणत असत की दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार नाही. हे त्यांनी टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवा सांगोला शाखा चे पाणी आणून तालुका सुजलाम सुफलाम करून खरे करून दाखवले आहे.
कृष्णा कोयना, वीर भाटघरचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचूनच त्यांनी प्राण सोडला. हे सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या त्या कामाच्या पुण्याईवर त्यांच्या पक्षाचे चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख हे सातत्याने जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवून चळवळ प्रभावी बनवून पक्ष वाढवण्याचा व पुन्हा सर्व संस्थावर पक्षाचे पूर्वीप्रमाणे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे कोणत्याच पक्षाशी नेत्याशी एकनिष्ठ न राहता तालुक्यातील जनतेसाठी व विकासासाठी पक्षांतर करून अडीच वर्षात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काय झाडी काय डोंगर असे म्हणत 1000 कोटी रुपये शासनाचा निधी आणून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना योजनांचे पाणी आणून दुष्काळी तालुका म्हणून लागलेला कलंक पुसून टाकण्याचा विडा उचललेला दिसून येत आहे. 1990 पासून तालुक्याच्या राजकारणात विविध प्रश्नाच्या माध्यमातून व नेत्यांच्या संपर्कातून विकास करण्याचा प्रयत्न ते करीत आहे.
भाई गणपतराव देशमुख यांनी 2000 साली दुष्काळी तालुक्यातील तहानलेल्या जनतेला व पशुला भीमा नदीतून उचलून 81 गावांना शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे पिण्याच्या पाण्याची योजना राबवली. 2030 सालापर्यंत पाईपलाईनची मुदत असतानाही केंद्र व राज्य शासनाकडून आमदार शहाजीबापू पाटील यांनी नवीन पाईपलाईन मंजूर करून घेऊन सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम जलद गतीने चालू असून ते सांगोलापर्यंत आले आहे. 2055 ची लोकसंख्या गृहीत धरून काम चालू आहे. विकासाच्या योजनांच्या कामाचा धडाका सुरू आहे.
दिवंगत देशमुख हे सब्र का फल मीठा होता है या पद्धतीने त्यांनी विकासकाम केले. अधिवेशनापूर्वी गावभेट दौरा आयोजित करून जनतेचे प्रश्न समजावून घेत व सोडवीत असत. राहिलेले प्रश्न अधिवेशनात मांडून ते सोडून घेत होते. ते गावभेट दौऱ्याप्रसंगी तालुक्यातील इतर नागरिकांच्या अडचणी येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जात नव्हते. त्यांना त्यांच्या कार्यालयातच थांबून जनतेचे प्रश्न तेथे सोडवा असे सांगत होते.
तर आमदार शहाजी भाऊ पाटील हे जनतेला तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे होता कामा नये गावातच प्रश्न सुटावेत म्हणून अधिकाऱ्यांना दौऱ्याप्रसंगी घेऊन जाऊन तेथे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेची व दोन वर्षांवर विधानसभेची निवडणूक आल्याने दौरे वाढलेले दिसत आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गट 1967 पासून शेकाप बरोबर होता. पूर्वी जिल्ह्यात काँग्रेस पक्षात नामदेवराव जगताप व शंकराव मोहिते पाटील हे दोन गट होते. त्यातील मोहिते पाटील गटाची मैत्री गणपतराव देशमुख बरोबर होती. 1967 साली नामदेवराव जगताप गटाचे संभाजीराव शेंडे हे पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्यावर शेकाप व मोहिते पाटील गट म्हणजेच काकासाहेब साळुंखे यांचे बरोबर युती करून अविश्वास ठराव आणला व त्यांना पदच्युत केले.
तेव्हापासून आजपर्यंत पंचायत समितीवर शेकापचा झेंडा आहे. 1995 पासून दीपकआबा साळुंखे-पाटील व शेकापची सर्व संस्था बरोबर युती होती. ती आजपर्यंत होती. 2019 ला विधानसभा निवडणुकीत दिवंगत गणपतराव देशमुख उमेदवार नसल्याने साळुंखे-पाटील यांनी उमेदवारी मागणी करूनही उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला व ते विजयी झाले.
गणपतराव देशमुख आमदार असले तरी गाव भेट असो अथवा कोणताही कार्यक्रम असो तेथे देशमुख व साळुंखे पाटील हे 2019 पर्यंत एकत्र असत व सारथीची भूमिका साळुंखे पाटील करीत होते. त्यामुळे अधिकारी वर्गावर या दोघांचा दबदबा राहत होता व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे होत होती. यातून साळुंखे-पाटील यांना मानणारा मतदार वाढत होता.
आमदार शहाजी पाटील व दिपक आबा साळुंखे पाटील हे दोघेच संयुक्तरित्या गाव भेट दौरे, उद्घाटने आदी कामात उपस्थित असतात. येथेही सारथीची भूमिका साळुंखे-पाटील करीत आहेत. गेली 35 वर्ष साळुंखे-पाटील आमदार नसले तरी अधिकारी वर्गावर अंकुश मात्र त्यांचाच राहिला आहे. सहा वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांचा सातत्याने मतदारांशी संपर्क व अधिकारी वर्गावरील अंकुश यामुळे त्यांना मानणारा वर्ग वाढत आहे त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांची ताकद दिसून येणार आहे.
भाजप पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. परंतु तालुक्यात मात्र या पक्षाचे कुठे अस्तित्व दिसून येत नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले ते निष्ठावंत कार्यकर्ते सध्या अडगळीला आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून आयात केलेले नेते गेली सहा वर्ष तालुकाध्यक्ष आहेत. मात्र हा पक्ष तालुक्यात वाढताना दिसत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे नेते काय भूमिका घेतात व स्वतःचे व पक्षाचे वर्चस्व तालुक्यात निर्माण करतात का नाही याकडे निष्ठावंतांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा