सांगोल्यातील इमडेंचा गोधनावर ‘विजय’
जर्सीच्या गळ्यात सेन्सर अन् टॅग, गोठ्यात सीसी टीव्ही
स्पेशल स्टोरी/ डॉ.नाना हालंगडे
माणदेशातील दुष्काळी सांगोला तालुक्याची ओळख डाळिंबामुळे तर झालीच पण, आता दुधाचा महापूर सांगोला तालुक्यातही वाहू लागला आहे. अनेक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीबरोबर दूध व्यवसायच स्वीकारला आहे. तालुक्यातील सावे गावातील तरुण उद्योजक, विजय प्रकाशबापू इमडे यांनी गोधन सांभाळून महिन्याला लाखोंची कमाई सुरू केली आहे. मात्र हा गोठा साधासुधा नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानानाने युक्त या गोठ्यात जर्सीच्या गळ्यात सेन्सर अन् टॅग आहेच. शिवाय गोठ्यात सीसी टीव्हीचे जाळे आहे. जिद्द आणि चिकाटीतून पुढे कसे जायचे याचा वस्तुपाठच इमडे कुटुंबीयांनी घालून दिला आहे.
लाख मोलाचं पशुधन आणि कोटींची कमाई असलेल्या विजय इमडे यांच्या व्यवसायाची कहाणी पशुपालकांना नेवचेतना देणारीच ठरीत आहे. सावे येथील इमडे वस्ती येथे विजय प्रकाशबापू इमडे यांचा १७५ संकरित गायींचा गोठा आहे. यांनी चांगल्या प्रकारे पशुधन सांभाळून समृद्धीचा प्रकाश पडला आहे. लाख मोलाच्या पशुधनान या परिवाराला नुसतं लखपती नव्हे तर करोडपती बनविले आहे.
सावे येथील प्रकशबापू इमडे यांचे सामान्य कुटुंब. यांच्याकडे सोळा एकर जिराईत शेतजमीन. इमडे कुटुंबीयांनी १९९८ पासून संकरित (जर्सी) गायी पालनाचा व्यवसाय सुरू केला. तर मागील सात वर्षांपासून मुक्तसंचार गोठा पद्धत त्यांनी राबविली आहे.
१७५ गाईंचे व्यवस्थापन
याच गोठ्यात सध्या दुभत्या, गाभण,पाड्या अशी एकूण १७५ गायी आहेत. सध्या यातील दुभत्या गायीपासून दैंनदिन आठशे लिटर दूध मिळत आहे. तर ५० गायी वेतास झालेल्या आहेत.
सद्या दर चांगला असल्याने दरमहा लाखोचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे कुटुंबीयच यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करीत असल्याने गायी पाहण्या सारख्याच आहेत.
विजय इमडे हे चालत-बोलत विद्यापीठ आणि गोठ्यातील पीएच.डी असलेले तरुण उद्योजक आहेत. वडिलांकडून बाळकडू मिळाल्याने सांगोला तालुक्यात दूधक्रांती करण्यात विजय इमडे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी तालुका दूध संघाचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. सरळ साधे राहणीमान, स्पष्ट बोलणे,सतत मार्गदर्शन यामुळे विजय इमडे यांचा गायी पालनामध्ये तालुकाभर बोलबाला आहे.
या दूधक्रांतीचे गुपित सांगताना विजय इमडे म्हणाले की, “आमच्या गोठ्यात आधुनिक तंत्रज्ञान आहे. गायीने साधं पाणी पिल नाही तरीही मोबाईल मेसेज येतो. याच गोठ्यात सेन्सर आणि अंटेना ही दोन साधन आहेत. गायींच्या गळ्यात बांधलेल्या पट्ट्यात सेन्सर बसविला आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती मोबाईल तात्काळ मिळत आहे.
प्रारंभी एका गायीने दहा गायी दिल्या. त्यातूनच १७५ गायी सध्या गोठ्यात झालेल्या आहेत. घरातील पाचजण आणि सात मजूर यांच्याद्वारे हे सर्व नियोजन केले जाते. आज यांचे नियोजन चांगल्या प्रकारे केले असल्याने सगळे चांगले प्रकारे सुरू आहे. खरे तर दिवसाला ५० लिटर दूध देणाऱ्या गायी तयार होणे आवश्यक आहे.
साधारण १० लिटर दूध देणारी गायीही तेवढाच चारा आणि पाणी पिते. त्यामुळे उच्च वंशावळीच्या गायी तयार होणे गरजेचे आहे. यासर्व पशुधनामुळे वर्षाला आठ लाखाचे शेणखत विकले जात आहे.त्यांचा हा मुक्तसंचार गोठा पाहण्यासारखाच आहे. सावेच्या या पठ्ठ्याने दूधक्रांतीच केली असून,सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
सरोगसी पॅटर्न
विजय इमडे यांनी आपल्या गोठ्यात मुलांसाठी टेस्ट ट्यूब बेबी,सरोगसी पद्धती ज्याप्रमाणे महिलांमध्ये राबविली जाते त्याप्रमाणे राबविली आहे. नाशिकच्या गोदरेज मॅक्स मिल्क कंपनीच्या गोठ्यातील उच्य वंशाच्या दिवसाला 50 लिटर दूध देणाऱ्या गायीमधील बीज आणि उच्च वंशातील वळूतील शुक्रजंतू यांच्या संयोगातून तयार झालेलं हस्तांतरित भ्रूण यांनी गोठ्यातील 20 गाईंमध्ये भरविले आहे. त्यातून चांगल्या उत्पन्न तयार झाले आहे. याच जर्सी गायीबरोबर जर्सी वळूही चांगल्या प्रकारे सांभाळले आहेत.
आठ लाखांचे शेणखत
विजय यांच्या गोठ्यातील वर्ष भरातून आठ लाख रुपयाचे शेणखत विकले जात आहे. त्यामुळे त्यांची १६ एकर शेतजमीन ही सुधारली आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी कोटीचा बंगला बांधला आहे.यांच्या घरात पाचच व्यक्ती आहेत. सारा डोलारा हीच मंडळी सांभाळत आहे.
सेन्सॉर प्रणाली
विजय इमडे यांनी आपल्या गायीच्या गळ्यातील पट्ट्यामध्ये सेन्सॉर बसविले आहेत. गायीने साधे पाणी जरी पिले नाही तरी यांना मेसेज येतो. काऊ मॉनिटरिंग सिस्टीम बसविली असून, सेन्सॉर आणि अँटेनामुळे गोठ्यातील सर्वच गोष्टींची माहिती पटकन समजते. एक मजूर 40 ते 50 गायींच्या धारा अवघ्या दोनच तासात काढतो. पहाटे साडेतीन वाजता दूध काढण्यास सुरुवात होते. तर सायंकाळी 4 वाजले पासून दूध काढले जाते.
खतरनाक जर्सी बैल
इमडे यांच्या १७५ गायींच्या गोठ्यात एक भला मोठा जर्सी बैल आहे. दिसता क्षणी उरात धडकी भरते अशा तब्येतीची हा बैल आहे. याचा खुराकही जबरदस्त आहे. गेली सात वर्षांपासून हा बैल यांनी सांभाळला आहे.
“माझ्याकडे सुरुवातीला मोजक्याच जर्शी गाई होत्या. उत्पनातून गुंतवणूक करत त्यात वाढ केली. सध्या आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहे. त्याचा मला चांगला फायदा होतो. दूध उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय न करता आधुनिकता स्विकारावी”, असे विजय इमडे यांचे मत आहे.
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास
सांगोला पाऊस : शहाजीबापूंच्या मंडलात पावसाचा हात आखडता, संगेवाडीत सर्वाधिक बरसात