सांगोल्याची पेरु बागायती डांबऱ्या रोगाने उद्ध्वस्त
डाळिंबासोबत पेरूचीही वाट लागणार? २४० हेक्टर क्षेत्र धोक्यात
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला तालुक्याचे अर्थकारण अवलंबून असलेली डाळिंब बागायती तेल्या रोगाने पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना पर्यायी पीक म्हणून पेरू शेतीकडे वळलेला शेतकरी पेरूवरील डांबऱ्या रोगामुळे पुरता अडचणीत आला आहे. सांगोला तालुक्यातील सुमारे २४० हेक्टर पेरू क्षेत्र धोक्यात आले आहे. वाचा “थिंक टँक लाईव्ह”चा स्पेशल रिपोर्ट.
डांबऱ्याचा झटका
कमी पाण्यावर, कोणत्याही जमिनीत येणाऱ्या पेरू या फळाच्या झाडाला सध्या डांबऱ्या रोगाने ग्रासले असून ,दोनशे हेक्टरवरील फळे डांबऱ्या रोगाने उद्ध्वस्त झाली आहेत. कृषी विभागाकडून कोणतेच सल्ले मिळत नसून, दस्तुरखुद्द तालुका कृषी अधिकाऱ्यांना या रोगाविषयी माहिती नाही, अशी परिस्थिती आहे.
फळबागायती सांगोल्याला मानवेना
सांगोला तालुका हा फळ लागवडीमध्ये अव्वलस्थानी असून, सतत या फळबागांना रोगराईने घाला घातला जात आहे. आता डाळिंब बागा तर 80 टक्के तेल्या, मर व कुजव्याने उद्धवस्त झाल्या आहेत. द्राक्ष बागांची अवस्था ही अशीच आहे. अशातच आत्ता पेरूवरही तेल्यासारखाच डांबऱ्या रोग पसरलेला आहे. यामुळे संपूर्ण पेरूवर काळे डाग, व फळे उलने सुरू आहे.
240 हेक्टरवर पेरूची लागवड
तालुक्यात पेरू लागवडीचे 240 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये जी विलास, तैवान, सरदार, रेड डायमंड, थाई व व्हीएनआर अशा जातीचा समावेश आहे. सध्या या डांबऱ्या रोगाला तीन जाती मोठ्या प्रमाणात बळी पडल्या असून, कृषी विभागाकडून कोणतेच सल्ले, मार्गदर्शन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या रोगाबाबतची माहिती, तुळजाई हायटेक नर्सरीचे मालक समाधान मुंडे यांनी सांगितली.
तालुका कृषी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती विचारली पण त्यांना हा कोणता रोग आहे? याची माहिती सांगता आली नाही. २४० हेक्टर पैकी दोनशे हेक्टर पेरू सध्या रोगाचे बळी पडले आहे. ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे हा डांबऱ्या रोग बळावला आहे, असे कृषी तज्ञ मुंडे यांनी सांगितले.
या रोगामुळे ऐन हंगामात आत्ता पेरू बागा उद्धवस्त झाल्या असून, घेरडी येथील प्रा. भारत गरंडे यांच्या बागेतील 300 झाडे या डांबऱ्या रोगाने बळी पडली आहेत. त्यांनी तैवान या जातीची लागण केली असून, यांच्या बागेत चारशे झाडे आहेत. आता पेरूवरही रोग पडल्याने बळीराजा धास्तावला आहे.
कृषी विभाग कुचकामी
कृषी विभाग तालुक्यात कुचकामी ठरीत असून, लोकप्रतिनिधी लक्ष घालून याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
उष्ण हवामान असलेल्या भागात वाढ
पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात. तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते. कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होतेे.
पेरू पोर्तुगिजांनी देशात आणला
खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास “जाम’ किंवा “अमरूद’ असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर “क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या “व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे.
आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकडो माणसात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील “क’ जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
पेरू पासून आईसक्रिम व गोळ्या बनविल्या जातात.पेरूला इंग्रजी मध्ये guava असे म्हणतात.