सांगोला सूतगिरणीला भाई गणपतराव देशमुख यांचे नाव
वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडून मिळाली मंजूरी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आशिया खंडातील सर्वात उत्तमपणे चालणाऱ्या सांगोला शेतकरी सूतगिरणीला या सूतगिरणीचे संस्थापक तथा शेकापचे नेते कै. भाई गणपतराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. याबाबत सूतगिरणीने नामांतराबाबत केलेला ठराव पी. शिवा शंकर आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी मंजूर केला आहे.
या नामांतरानुसार सांगोला सूतगिरणी ही “शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोले ता. सांगोले, जि. सोलापूर” या नावाऐवजी “डॉ. भाई गणपतराव देशमूख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या, सांगोले ता. सांगोले, जि. सोलापूर” या नावाने ओळखली जाणार आहे.
सूतगिरणीने केली उपविधी दुरूस्ती
शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोले ता . सांगोले जि. सोलापूर या सूतगिरणीच्या दिनांक २२/० ९/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सूतगिरणीस भाई गणपतराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे असा ठराव मंजूर करण्यात आला होता.
शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोले ता. सांगोले, जि. सोलापूर या नावाऐवजी डॉ. भाई गणपतराव देशमूख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या , सांगोले, ता. सांगोले, जि. सोलापूर असे नामांतर करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला होता.
हा ठराव मंजुरीसाठी पी. शिवा शंकर आयुक्त , वस्त्रोद्योग , महाराष्ट्र राज्य तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार पी. शिवा शंकर आयुक्त , वस्त्रोद्योग , महाराष्ट्र राज्य यांनी या नामांतर ठरवाला नुकतीच मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतूदी अन्वये उपविधी दुरुस्ती क्रंमाक १.१ मंजूर करण्यात आले असल्याचे पत्र वस्त्रोद्योग आयुक्तालयाने जारी केले आहे.
या सूतगिरणीचे एकूण सभासद मतदार ११ हजार ५६० एवढे असून यात कापूस उत्पादक शेतकरी मतदार ७०९३ तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार ४४६७ आहेत. संस्था प्रतिनिधी मतदारांची संख्या ८१ आहे.
आशिया खंडातील अव्वल सूतगिरणी
भाई गणपतराव देशमुख यांनी १९८० साली सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी केली होती. ही सूतगिरणी सध्याच्या प्रतिकूल काळातही स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. शेकडो कोटींपेक्षा जास्त उलाढाल आहे. या सूतगिरणीकडून चीन, इजिप्त, मलेशिया, बांगलादेश आदी देशांना सूत निर्यात होते. राज्यात एका पाठोपाठ एक सूतगिरण्या बंद होत असताना आणि बहुसंख्य सूतगिरण्यांना अखेरची घरघर लागली असताना सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी केवळ व्यवस्थापन आणि सचोटीच्या कारभारामुळे उत्तम प्रकारे चालू आहे. नुकतीच या सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली.
खमके चेअरमन मिळाले
सांगोला सूतगिरणीची जबाबदारी सुरुवातीच्या काळात दिवंगत नेते ॲड. वसंतराव पाटील यांनी अतिशय कुशलतेने सांभाळली. अलिकडे सलग १५ वर्षे नानासाहेब लिगाडे यांनी या सूतगिरणीची धुरा तेवढ्याच नेटाने सांभाळून संस्थेला आर्थिक संकटाच्या चक्रातून बाहेर काढले होते. लिगाडे यांचा मूळ शिक्षकी पेशा होता. परंतु गणपतराव देशमुख यांच्या पारखी नजरेतून लिगाडे यांनी शिक्षकी पेशा सोडून सूतगिरणीची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नानासाहेब लिगाडे यांनी सूतगिरणीच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.
या सूतगिरणीचे एकूण सभासद मतदार ११ हजार ५६० एवढे असून यात कापूस उत्पादक शेतकरी मतदार ७०९३ तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार ४४६७ आहेत. संस्था प्रतिनिधी मतदारांची संख्या ८१ आहे.
आबासाहेबांच्या नावाने सूतगिरणी
भाई गणपतराव देशमुख यांनी अत्यंत कष्टातून सुरू केलेल्या या सूतगिरणीस त्यांच्या पश्चात त्यांचे नाव देण्याचा खूप महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यापुढे ही सूतगिरणी भाई गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखली जाणार आहे.
विक्रमवीर आमदार
महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार म्हणून भाई गणपतराव देशमुख यांची ओळख होती. सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. 1962 साली गणपतराव देशमुखांनी शेकापच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता ते सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्त्व करत होते.
1972 साली कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी, तर 1995 साली काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी भाई गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता. हे दोन पराभव वगळता त्यांनी सांगोल्यातून सतत विजय मिळवला.
आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकांवरच काढली. मात्र, 1978 आणि 1999 सालची सरकारं त्याला अपवाद राहिली. कारण 1978 साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती. तर 1999 साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात 55 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा 2017 साली सन्मान झाला होता.