सांगोला महावितरणने दलित शेतकऱ्यास वीज नाकारली
20 वर्षांपूर्वी कोटेशन भरूनही कनेक्शन देण्यास टाळाटाळ
सांगोला / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे. बेमुर्वतपणे कनेक्शन तोडणे, वीज पुरवठा खंडित करणे हे प्रकार राजरोस होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वी कृषी पंपासाठी कोटेशन भरलेल्या एका दलित शेतकऱ्यास वीज कनेक्शन देण्यास नकार दिला आहे. आज देतो, उद्या देतो असे म्हणत या कार्यालयाने वीस वर्षे टाळाटाळ केली. आता तर तुमचे पैसेही रिटर्न मिळणार नाहीत व कनेक्शनही मिळणार नाही अशी भाषा वापरली जात आहे. या त्रासाला कंटाळून या दलित शेतकरी कुटुंबाने सांगोल्यात महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शब्द न पाळण्यात पटाईत
दिलेला शब्द न पाळण्यात पटाईत असलेल्या सांगोला महावितरणचा जाच दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य शेतकरी सोडा या कार्यालयाने नेत्यांना फाट्यावर मारण्याचे धाडस केले आहे. हे कार्यालय अधिकाऱ्याची वैयक्तीक प्रॉपर्टी आहे की काय? असा प्रश्न जनतेला दिलेल्या वागणुकीतून पडतो.

नवीन कृषीपंपाला कनेक्शन मिळेना!
सांगोला तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे नवीन कृषी पंपासाठी मागणी अर्ज दिले आहेत. कोटेशनही भरले आहे. वर्ष उलटत आले तरी या बेफिकीर कार्यालयाने अद्याप वीज कनेक्शन दिले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. (याचा पर्दाफाश लवकरच थिंक टँक लाईव्ह करेल).
दलित शेतकऱ्यास वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ!
घेरडी येथील दलित कुटुंबातील अल्प भूधारक शेतकरी मऱ्याप्पा मारुती जगधने यांनी शेती पंपासाठी 15 मे 2001 साली कोटेशन भरले. गट नंबर 1833 येथील विहिरीवरील विद्युत पंपासाठी 5 हजार 349 रूपये इतके कोटेशनही भरले. याचा पावती क्रमांक 1329379 असा आहे. कोटेशन भरल्यानंतर महिनाभरानंतर मऱ्याप्पा जगधने यांचा मुलगा किरण हा महावितरण कंपनीकडे सतत हेलपाटे मारीत होता. आज देतो, उद्या देतो असे म्हणत या असंवेदनशील महावितरण कार्यालयाने वीस वर्षे उलटली तरी अद्याप वीज कनेक्शन दिले नाही.
कनेक्शन नाही, पैसेही रिटर्न मिळणार नाहीत!
वीज कनेक्शन मिळावे यासाठी या दलित शेतकऱ्याने या कार्यालयाकडे वीस वर्षे खेटा मारल्या. चप्पलचे अनेक जोड झिजून नवीन घेतले. तेही झिजले तरीही वीज कनेक्शन मिळाले नाही. शेतकरी बांधवांना दुःखाच्या खाईत ढकलून स्वतः मात्र सतत आनंदी असलेल्या या महावितरण अधिकाऱ्याने आता तुम्हाला कनेक्शनही मिळणार नाही व पैसेही रिटर्न मिळणार नाहीत असा पवित्रा घेतल्याचा आरोप दलित शेतकऱ्याने केला आहे. शेवटचा पर्याय म्हणून या दलित शेतकऱ्याने महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कनेक्शन मागणीचा प्रस्ताव देवून, कोटेशन भरून 20 वर्षाचा कालावधी उलटला पण काही केल्या याची कोणी दाद घेईना. शेवटचे एक स्मरणपत्र म्हणून किरण जगधने यांनी 23 नोव्हेंबर2021 रोजी अर्ज दिलेला आहे. त्यानंतर उपअभियंत्याने आता वीज कनेक्शनही नाही व भरलेले पैसेही मिळणार नाहीत, अशी भाषा वापरलेली आहे. त्यामुळे हे दलित कुटुंबीय हतबल झाले आहे. त्यांनी ऊर्जा मंत्री, जिल्हा ग्राहक मंच, आमदार व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. हे कुटुंब पूर्णपणे हतबल झाले असून, सांगोल्यात महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.
फोन कॉलला प्रतिसाद नाही
या प्रकरणी थिंक टँक लाईव्हच्या प्रतिनिधीने महावितरणचे सांगोला अभियंता आनंद पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कॉल स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे महावितरणची बाजू समजू शकली नाही.