सांगोला पाऊस : शहाजीबापूंच्या मंडलात पावसाचा हात आखडता, संगेवाडीत सर्वाधिक बरसात
सांगोला/नाना हालंगडे
यंदाच्या हंगामातील उच्चांकी पाऊस काल पडला आहे. पर्जन्यमापक यंत्रात याबाबतची नोंद झाली आहे. सांगोला तालुक्यात एकूण 568.7 मि.मी. पाऊस पडला. यापैकी सर्वाधिक पाऊस संगेवाडी मंडलात पडला आहे. जवळ्यातही पावसाने दमदार बरसात केली आहे. याबाबतची आकडेवारी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
मागील दोन दिवसांपासून सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी या पावसाने कहर केला. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र या पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडला आहे. सांगोला तालुक्यात एकूण 568.7 मि.मी. पाऊस पडला. तालुक्याने पावसाची सरासरी शंभरी पार केली आहे.
यापैकी सर्वाधिक पाऊस संगेवाडी मंडलात पडला आहे. तालुक्यात मागील चोवीस तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे. एकूण पाऊस व कंसात टक्केवारी.
सांगोला : 510.9 (94.5%)
शिवणे : 472.0 (87.3%)
जवळा: 599.5 (110.9%)
हतीद: 529.7 (98.0%)
सोनंद: 623.7 (115.4%)
महुद : 429.5 (79.4%)
कोळा: 600.0 (111.0%)
नाझरा: 436.4 (80.4%)
संगेवाडी: 914.0 (169.1%)
शहाजीबापूंच्या महूदमध्ये सर्वात कमी पाऊस
सांगोला तालुक्यातील 9 नऊ मंडलातील पावसाची आकडेवारी हाती आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस संगेवाडी मंडलात पडला आहे. जवळ्यातही पावसाने दमदार बरसात केली आहे. मात्र काय झाडी… काय डोंगार… फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या महूद मंडलात सर्वात कमी पाऊस पडला आहे. महुदमध्ये मागील चोवीस तासांत 2.3 मी मी पाऊस झाला. तेथे एकूण पाऊस 429.5 मिमी एवढं झाला आहे. तेथील एकूण आकडेवारी 79.4 टक्के एवढीच आहे. अख्ख्या महाराष्ट्राला गुवाहाटीचे वेड लावणाऱ्या बापूंच्या गावात मात्र पावसाने हात आखडता घेतला असल्याचे दिसून येत आहे.
सांगोला तालुक्यात मंडळ निहाय असलेली यंत्रे ही सदोष आहेत. त्यामुळे आकडेवारी बरोबर येत नाही. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली,पण आकडेवारी बरोबर पहावयास मिळत नाही. सलग दुसऱ्या दिवशीही असाच पाऊस पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी 5:30 नंतर आकाश झाकोळले होते.याच पावसामुळे खरिपातील पिके पाण्यात तर रब्बीच्या पेरण्या केलेल्या वाया गेल्या आहेत.